२१ वर्षाच्या सरपंचाने कोरोनामुक्तीचं गावात उभं केलेलं मॉडेल राज्यात राबवायला हवं…

महाराष्ट्रात सध्या पुणे, मुंबई या शहरी भागातील कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. इथं बाधित रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच रुग्ण संख्येत कमालीची घट होताना बघायला मिळत आहे. पण दुसरीकडे कोरोनाबाबत सगळ्यात जास्त चिंतेचं वातावरण आहे ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवताना देखील ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या हेच कारण सांगितलं होतं. जर आकडेवारीत बघायचं म्हंटलं तरी SBI च्या रिसर्च नुसार देशातील ग्रामीण भागात सर्वात जास्त रुग्ण असलेल्या टॉप १५ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील एक-दोन नाही तर तब्बल ६ जिल्हे आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाला हा बसलेला विळखा सैल करण्यासाठी प्रशासनानं देखील कंबर कसली आहे.

मात्र अशातच महाराष्ट्रातील एका २१ वर्षाच्या सरपंचानं अख्खा गाव कोरोना मुक्त करण्यासाठी एक मॉडेलचं उभं केलं, आणि नुसतं उभं केलं नाही तर त्यातून त्यानं गाव कोरोना मुक्त करून पण दाखवलं. त्यामुळेचं सध्या त्याच्या या ग्रामीण मॉडेलची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे. 

मग प्रश्न असा पडतो कि जर खरंच हे मॉडेल एवढं बेस्ट असेल तर राज्याच्या इतर ग्रामीण भागात लावण्याबाबत विचार करण्यास काय हरकत आहे?

त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हे बहुचर्चित मॉडेल नेमकं काय आहे याची माहिती करून घ्यायला हवी.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे गाव. जेमतेम २ हजार लोकसंख्या. यावरुन गाव लहान वाटतं असलं तरी गावानं एक वैशिट्यपूर्ण काम केलं आहे. ते म्हणजे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावानं २१ वर्षाच्या तरुण ऋतुराज देशमुख याला सरपंचपदी बसवलं आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण सरपंच होण्याचा मान सध्या त्याच्याकडे आहे.

याच ऋतुराजने घाटणे गावात राज्याला आदर्श ठरणार कोरोनमुक्तीच मॉडेल उभं केलं आहे.

मागच्या वर्षी साधारण मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली.  त्यानंतर सगळीकडे हा आकडा वाढतचं गेला. पण घाटणे गाव मात्र याला अपवाद ठरलं होतं. कारण राज्यात पहिला रुग्ण सापडून वर्ष उलटलं तरी गावात एकही रुग्ण नव्हता. या काळात ग्रामपंचायतीवर प्रशासक होते.

मात्र हा अपवाद एप्रिलमध्ये खोटा ठरला. पहिल्याच आठवड्यात गावात २ रुग्ण आढळून आले. आणि हळू हळू संख्या वाढली देखील. गावात एव्हाना १३ रुग्ण झाले होते. अशातच २ रुग्णांनाच मृत्यू झाला. त्यामुळे गावातील लोक घाबरुन राना-माळावर राहायला जाऊ लागली. 

पण ऋतुराजने मात्र पावलं उचलतं सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी यांना हाताशी धरत एक मोहीम आखली. नाव दिलं,

‘बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’

या मोहिमेंतर्गत एकूण ५ उपाय ठरवण्यात आले. यात पहिला म्हणजे ट्रेसिंग, त्यानंतर टेस्टिंग आणि ट्रिटमेंट, तिसरा उपाय सेफ्टी, चौथा क्वारंटाईन आणि पाचवा उपाय म्हणजे लसीकरण.

उपाय तसे बघितले तर जे आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत तेच होते. केंद्र सरकार-राज्य सरकार यांनी जे सांगितले तेच होते. मात्र यात घाटणे गावानं वेगळं काय केलं असेल तर या उपायांची अंमलबजावणी, आणि हीच प्रभावी अंलबजावणी कोरोनामुक्तीचं कारण ठरलं. 

तालुक्याचं ठिकाण असलेल्या मोहोळ पासून गावं अवघं ५ ते ६ किलोमीटर अंतरावर. त्यामुळे गावातील अनेक लोकांचं कामानिमित्त बाहेर येणं – जाणं होतं असायचं. त्यामुळे या मोहिमेतून ज्यांचं बाहेर येणं जाणं असायचं त्यांचं आणि कोरोना पेशंट आढळलेल्या कंटेनमेंट झोनमधील अशा सगळ्या लोकांच्या दर ३ ते ४ दिवसांनी प्रशासनाकडून फ्रीमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या गेल्या.

यात आतापर्यंत जवळपास ५५ ते ६० टक्के नागरिकांचं टेस्टिंग झालं. यामुळे काय झालं तर पॉजिटीव्ह रुग्ण असल्यास त्याला शोधणं खूप सोपं झालं.

गावात ३ वॉर्ड आहेत, आणि २ आशा सेविका तर २ अंगणवाडी सेविका. या मोहिमेतून गावातील प्रत्येक घरामध्ये एक दिवसाआड तरी पोहोचायचं असं लक्ष ठेवण्यात आलं. या चारी सेविकांनी एक दिवसाआड प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची ऑक्‍सिजन लेव्हल, तापमान या गोष्टी चेक करायच्या, ज्यांना १०० च्या वर ताप किंवा ९३ च्या खाली ऑक्सिजन लेव्हल येत आहे अशांची त्याच दिवशी रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या जायच्या. 

यामुळे गावातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष राहू लागलं, लक्षणांची माहिती मिळू लागली. तपासणी होऊ लागल्या.

यानंतर ग्रामपंचातीनं “कोरोना सेफ्टी किट’ हा उपक्रम सुरु केला. यातून पंचायतीच्या माध्यमातुन प्रत्येक कुटुंबाला व्हिटॅमिन गोळ्या, सॅनिटायझर, कुटुंबात जेवढे सदस्य असतील तेवढे मास्क, साबण अशा गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्या संपल्यानंतर ग्रामपंचातीमधूनच मागेल त्याला ‘सेफ्टी किट’ देण्यात येऊ लागलं. 

May be an image of child

थोडे पैसे खर्च केले पण ग्रामपंचातीनं माझं गाव माझी जबाबदारी म्हणतं गावकऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिलं.

याच मोहिमेंतर्गत जे बाहेर येणारे लोक असतील त्यांच्यासाठी गावात तीन दिवसांचं क्वारंटाईन सक्तीचं केलं, कोणत्याही परिस्थितीमध्ये या लोकांनी गावाच्या कोणाच्याही संपर्कात यायचं नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आशा सेविकांवर दिली. तीन दिवस सलग या लोकांची ऑक्सिजन लेव्हल, तापमान तपासून शेवटच्या दिवशी टेस्ट असं नियोजन केलं आणि ते अंमलात देखील आणलं.

यामुळे कोरोनाची चेन ब्रेक होण्यासाठी मदत झाली. बाहेर येणारा संसर्ग गावात पसरला नाही.

यानंतरची उपाययोजना म्हणजे लसीकरण. सध्या गावाला एकाच टप्प्यात फार थोड्या लसी प्राप्त झाल्या. पण ५० वर्षावरील जे शक्य होतील अशांचं तातडीनं लसीकरण करून घेतलं. राज्याच्या इतर भागात ४५ वर्ष हि वयोमर्यादा असताना घाटणे गावानं मात्र ५० च्या वरील लोकांना प्राधान्य दिलं.

या सगळ्या प्रयत्नांमुळे गावात सध्या कोरोनाची चेन पूर्णपणे ब्रेक झाली असून अवघ्या दिड महिन्यात गाव कोरोनामुक्त झालं आहे. मागच्या ८ ते ९ दिवसांपासून गावात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सगळ्या तालुक्यात ऋतुराजच्या या प्रयत्नांची चर्चा सुरु आहे.

आता मुख्य बाब म्हणजे हे मॉडेल महाराष्ट्राच्या इतर ग्रामीण भागात उभं करायला हवं.  

कारण आज ही महाराष्ट्रात अनेक खेडी अनेक गाव अशी आहेत जिथं एक ही हॉस्पिटल नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र नाही कि साधं उपकेंद्र नाही. घाटणे गाव देखील असचं आहे. आज गाव कोरोना मुक्त असलं तरी गावात एकही हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र देखील नाही. मात्र तरीही त्यांनी कोरोना मुक्त होऊन दाखवलं.

सरपंच ऋतुराज देशमुख ‘बोल भिडू’शी बोलताना सांगतो,

मी आल्यावर आरोग्य केंद्रासाठी प्रस्ताव पाठवला आहे. पण सध्या तरी आशा सेविकाचं आमच्यासाठी देवदूत आहेत. कोरोनाच्या या काळात त्यांच्यामुळेच गावं सुरक्षित राहू शकलं आहे.

सोबतच बाहेर जावून येणाऱ्या, बाधितांच्या संपर्कातील लोकांचं टेस्टिंग ही गोष्ट तशी खूप कॉमन. पण हेच टेस्टिंग २ ते ३ दिवसांनी करणं हे घाटणे गावातील वेगळेपण आहे. हेच जर इतर ग्रामपंचायतींनी आपल्या गावात सुरु केलं तर कोरोना आटोक्यात येण्यास वेळ लागणार नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे अनेक गावांमध्ये मास्क नाही म्हणून पावत्या फाडल्या जातात, घाटणे गावात देखील फाडल्या गेल्या, पण पावत्या फाडण्यासोबतच ग्रामपंचायतींनी थोडे फार पैसे खर्च करून गावातील लोकांना मास्कचं वाटप केलं. सॅनिटायझर वाटले. ते देखील घरात जाऊन. 

आशा सेविका, अंगणवाडी सेविका प्रत्येक गावात आहेत. मात्र प्रशासनाची जर साथ मिळाली तर त्या गावाला कोरोनामुक्त ठेऊ शकतात. कारण प्रत्येक दिवसाआड गावातील प्रत्येक लोकांची तपासणी हे तस पाहिलं तर अवघड काम. पण प्रशासनाच्या मदतीनं घाटणे गावातील सेविकांनी हे शक्य करून दाखवलं आहे.

म्हणूनच छोट्या उपायांचं पण मोठे परिणाम देणाऱ्या या मॉडेलला राज्यातील इतर भागात राबवायला हवं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.