आदर्श म्हणवल्या जाणाऱ्या गावातच निवडणूका लागलेत
गावातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हंटल की त्यात भले भले भाग घेतात. अगदी आमदार, खासदरांपासून यात स्वतः जातीने लक्ष ठेवून असतात. कोणाचा कोणता गट, कोण कोणाच्या विरोधात उभं राहणार आहे याचा बरोबर अंदाज घेतात. राजकीय पकड घट्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातूनच कधी कधी राडा पण होत असतोय.
राज्यात डिसेंबरमध्ये १४ हजार ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा झाली, आणि कायम दिसणार हे चित्र यावेळी मात्र काही ठिकाणी बदलायला लागलं. कोरोनाचा काळ असल्यामुळे नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन करायला सुरुवात केली. जिथं गटातटाच्या राजकारणात गाव विभागलेलं होत तिथं यंदा बिनविरोध करण्यासाठी बैठका व्हायला लागल्या.
सर्व पक्षीय नेते मंडळी गावात येऊन २५ लाख, ३० लाख अशा रकमेची बक्षीस देण्याची घोषणा करायला लागले. भाषण करताना यापूर्वी अनेक वर्ष बिनविरोध होत असलेल्या आदर्श ग्रामपंचायतींची उदाहरण द्यायला लागले. यात सुरुवातीच्या काही दिवसात ३ उदाहरण हमखास होतीच.
त्यातलं पाहिलं म्हणजे राळेगणसिद्धी, दुसरं हिवरे बाजार आणि तिसरं पाटोदा. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पदमश्री पोपटराव पवार, आणि भास्करराव पेरे पाटील या तिघांची हि गाव.
पण भिडूनों, हि एका बाजूला ही उदाहरण द्यायची चालू होती, आदर्श ग्रामपंचायत, जेष्ठ समाजसेवकांच्या ग्रामपंचायत म्हणून कौतुक करणं चालू होतं त्याचवेळी दुसऱ्या बाजूला या गावातील एका गटाकडून निवडणुका घेण्याची तयारी केली जात होती. आणि त्यानुसार पुढच्या काही दिवसातच तश्या निवडणूक लागल्यात देखील.
होय, राज्यात आदर्श गाव म्हणवल्या जाणाऱ्या राळेगणसिद्धी, हिवरे बाजार आणि पाटोदा या तीन गावांमध्ये सध्या निवडणूका लागल्या आहेत.
कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना अशा सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी विरोधच राजकारण विसरून स्वत:च्या गावातील किंवा प्रभाव क्षेत्रातील शेकडो निवडणुका बिनविरोध केल्या देखील. मात्र दुसऱ्या बाजूला अण्णा हजारे, पोपटराव पवार आणि भास्करराव पेरे पाटील यांना मात्र आपल्या ग्रामपंचायती बिनविरोध करता आलेल्या नाहीत.
त्यामुळे जे राजकीय नेत्यांना जमलं ते या ज्येष्ठ समाजसेवकांना आपल्याच गावात जमलेलं नाही.
अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव. देशाच्या आणि परदेशाच्या विविध भागातून लोक इथं येऊन आदर्श गाव कसं निर्माण करायचं याचा धडा शिकतात. अण्णा हजारेंना आपला आदर्श मानतात. पण गावातल्याच तरुणांनी मागील अनेक वर्षांपासून चालू असलेली बिनविरोधाची परंपरा थांबवून इथे निवडणून घेण्याची मागणी केली.
राळेगणसिद्धीत शेवटची निवडणूक ३५ वर्षापूर्वी झाली होती. त्यानंतर आता इथे यावर्षी निवडणूक लागली आहे. इथल्या सात जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत. केवळ दोन उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात अण्णा हजारेंना यश आलं आहे.
विशेष म्हणजे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावाला आमदार निधीतून २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी पहिला प्रतिसाद राळेगणसिद्धीतून आला होता. स्वत: हजारे यांनी या योजनेचे कौतुक करून याचा आपण स्वत: प्रचार करणार असल्याचे म्हटले होते.
पण शेवटच्या दिवसात त्यांच्याच गावात निवडणूक घेण्याची वेळ आली.
यावर अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की,
गावातील तरुण पिढीला निवडणूक हवी असून त्याशिवाय आम्हाला लोकशाही प्रक्रिया कशी समजणार, अशी विनंती तरुणांनी त्यांच्याकडे केली होती. त्यावर अण्णांनी निवडणूक होऊ द्या पण ती शांततेत पार पाडा, अशा शब्दांत परवानगी दिली.
तर हिवरे बाजार गावात शेवटची ग्रामपंचायत निवडणूक १९८५ साली झाली होती. त्यानंतर पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे १९९० पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू झाली. ती आजतागात टिकून होती.
गाव आदर्श गावांच्या यादीत अनेक पुरस्कार मिळत गेले. पोपटराव पवारांचं काम बघून त्यांना पदमश्री देण्यात आला. सोबतच राज्याच्या आदर्श गाव समितीचे अध्यक्षपद देखील देण्यात आलं.
पण यंदा मात्र ग्रामपंचायतीच्या सातच्या सात जागांसाठी १४ उमेदवार मैदानात आहेत. पोपटराव पवार यांना स्वत:लाही निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे. त्यांच्या वॉर्डात एका खासगी संस्थेत शिक्षक म्हणून काम करणारे किशोर संबळे निवडणूक लढवत आहेत.
यावर गावचे सरपंच पोपटराव पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते कि,
हिवरेबाजार गावचा विकास झाला. म्हणून तेथे निवडणूक होत आहे. कायम निवडणुका बिनविरोध झाल्याने काही लोक नाराज होते. दर महिन्याला ग्रामपंचायत हिशोब जाहीर करीत होती. तर ३१ डिसेंबरला ग्रामसभा होऊन त्यात सर्व चर्चा होत असे. यापूर्वी कधी विकास कामे अथवा सुधारणांना विरोध झाला नाही. पण यंदा निवडणूक होत आहे.
तर औरंगाबाद जिल्हयातील आदर्श गाव पाटोदा. गावात ग्रामपंचायत स्थापन झाली १९९५ साली. तेव्हापासून इथले सरपंच भास्करराव पेरे पाटील आहेत. याकाळात गावात त्यांनी गावाला विवीध उपक्रमांनी स्वयंपुर्ण बनवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. कर संकलन वाढवलं. त्यातुन हे गाव देशात आदर्श म्हणून नाव मिळवलं.
या २५ वर्षात ग्रामपंचायत निवडणूक देखील होत होती. पण यंदा कोरोनाच्या सावटावर ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न निवडणूकीच्या सुरुवातीला पेरे पाटील यांनी केला.
त्यातुन अर्ज मागं घेण्याच्या आदल्या दिवशी पर्यंत ११ पैकी ८ सदस्य बिनविरोध झाले. पण संपुर्ण ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश आलं नाही. ३ जागांसाठी इथे निवडणूक जाहिर झाली आहे. त्यामुळे सुरुवातीला मतदान जाहिर होणार नाही अशी बांधलेली अटकळ फोल ठरली आहे.
विषेश म्हणजे यंदा त्यांनी निवडणूकीतुन पण माघार घेतली आहे आणि स्वतःच पॅनेल देखील उभं केलेलं नाही.
देशभरात फिरुन आपल्या आदर्श गावाचा महिमा सांगणाऱ्या तीन गावांना यंदा बिनविरोध करुन आणखी एक आदर्श उभा करण्याची संधी नक्कीच होती. पण या गावांमध्येच निवडणूक जाहिर झालेत. त्यामुळेच जे राजकीय नेत्यांना जमलं ते यांना जमलं नाही हे देखील तितकचं खरं आहे.
हे हि वाच भिडू.
- ४५ हजार लोकसंख्या अन् ७ कोटीचं बजेट असणाऱ्या अकलूजमध्ये अजून ग्रामपंचायत का आहे?
- हे १७ जण ग्रामपंचायतीतून पुढे आले आणि राज्याचे नेते बनले
- १२०० कोटींचा टर्नओव्हर असणाऱ्या कंपनीने ४ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.