लसीकरणासाठी ३ दिवस राहिले, मात्र राज्यांचे अजूनही फोन आणि विनंत्याच चालू आहेत…

आपल्या घरात एखादा मोठा कार्यक्रम असेल, कोणाच मोठं लग्न असेल तर आपण त्या तारखेच्या साधारण दोन दिवस आधी तरी सगळी तयारी पुर्ण करुन ठेवतं असतो. का? तर ऐनवेळी कोणतीही धावपळ नको, गडबड आणि गोंधळ व्हायला नको.

असाच एक मोठा कार्यक्रम देशभरातील सर्व राज्यांमध्ये १ मे पासून सुरु होणार आहे. तो आहे १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाचा. मात्र हा कार्यक्रम सुरु होण्यास अवघे तीन दिवस राहिले तरी अजून ही अनेक राज्य लस मिळवण्यासाठी पत्र, फोन आणि विनंत्याच करत आहेत.

त्याचं कारणं सांगितलं जातं आहे कंपन्यांकडून वेळेत आणि सुरळीत लस पुरवठा न होणे.

१ मे पासून केंद्रानं सर्व राज्यांना लसीकरणासाठी स्वायत्तता दिली आहे. त्यानुसार राज्य स्वतः थेट कंपन्यांकडून लस खरेदी करु शकणार आहेत. मात्र राज्यांनी ऑर्डर देवून देखील सीरम आणि भारत बायोटेकने आपण या राज्यांना १ मे या नियोजीत वेळेपर्यंत लस देवू शकणार नसल्याचं स्पष्टपणे कळवलं आहे.

कोणकोणत्या राज्यांनी १ मे पासून लसीकरण सुरु करण्याबाबत शंका व्यक्त केली आहे?

१. महाराष्ट्र :

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी बोलताना १ मे पासून सर्व राज्यात लसीकरण सुरु होईल का याबाबत शंका वाटतं असल्याचं म्हंटलं आहे.

ते म्हणाले,

राज्यातील सर्व नागरिकांना लस मोफत द्यावी का या संदर्भातील निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे, आणि तो मुख्यमंत्री जाहीर करतील.

मात्र त्याच वेळी टोपेंनी १ मे पासून सुरु होणाऱ्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी लस उपलब्धतेवर शंका व्यक्त केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्याकडून लस उपलब्ध करुन देण्याबद्दल सीरम आणि भारत बायोटेक यांना पत्र लिहीली आहेत. मात्र दोन्ही कंपन्यांकडून उत्तर आलेलं नाही. याआधी सीरमनं राज्याला २० मे नंतरचं लस देवू शकू असं कळवलं आहे.

२. झारखंड :

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मोठा निर्णय घेत १ मे पासून आपण १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस देणार असल्याचं घोषित केलं होतं. मात्र अवघ्या २ दिवसातचं सरकारनं हात वर केले आहेत. राज्य सरकारचं मत आहे की, केंद्र सरकारनं दोन्ही लस उत्पादनांना हायजॅक केलं आहे.

आम्ही लस खरेदी करु शकत नाही. तरीही विकत घेत आहोत. त्यामुळे केंद्राला विनंती आहे की, या लसी कॉंग्रेसशासित राज्यांना देखील द्यायला हव्या.

३. राजस्थान :

राजस्थानमध्ये १८ ते ४४ वयातील २ कोटी ९० लाख नागरिकांच लसीकरण मोफत होणार आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी लसीकरणारसाठी ३ हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी असल्याचं सांगितलं आहे. मात्र राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा म्हणाले, जेव्हा आम्ही लसीसाठी सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडियाशी बोललो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की,

भारत सरकारनं यापुर्वी जी काही ऑर्डर दिली आहे त्याला पुर्ण करण्यासाठी १५ मे पर्यंतचा वेळ लागू शकतो. ते राजस्थानला या वेळेच्या आधी लस देऊ शकत नाही

४. छत्तीसगड :

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील सांगितलं आहे की ते १८ वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यास तयार आहेत. पण १ मे पासून लसीकरण सुरू केले जाऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी याचं कारण लसचं उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री टी. एस सिंह यांनी पण हेच सांगितलं आहे. ते म्हणाले,

आमच्या जवळ लसचं उपलब्ध नाही. त्यामुळे एक मे पासून सुरू होणारा लसीकरण कार्यक्रम आम्ही सुरू करू शकत नाही. कंपन्यांनी ऑर्डर दिलेली लस नियोजीत वेळेत पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे.

५. पंजाब :

पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी सांगितलं आहे की, आमच्या जवळच चार लाख लसीचं शिल्लक आहेत. आता जोपर्यंत केंद्र सरकारकडून आम्हाला लसं उपलब्ध करून दिली जात नाही तो पर्यंत एक मे पासूनच लसीकरण कसं सुरु करायचं हा एक मोठा प्रश्नच आहे. राज्याचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग सिद्धू यांनी म्हंटलं आहे की,

जर लस उपलब्धच नसेल तर आम्ही ते कुठून देणार आहोत केंद्र सरकारला सांगितले आहे एक मेपासून सगळ्यांना व्यसन दिली जाईल पण उपलब्धच नसेल तर काय करायचं? त्यामुळे आता केंद्रानचं यावर विचार करावा.

६. कर्नाटक

कर्नाटकच्या आरोग्यमंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी घोषणा केली आहे की कर्नाटक सरकार ४०० कोटी रुपये खर्च करून एक कोटी लसी खरेदी करणार आहे. पण लस उपलब्ध होण्यात अनेक अडचणी आहेत. राज्य केंद्राकडून मदत मिळण्याची किंवा लस कधी मिळेल याच्या प्रतिसादाची अद्याप वाट बघतं आहे.

सध्या राज्याकडे ७ लाख लसी शिल्लक असून १ कोटी लसीची आर्डर दिली आहे.

७. आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी फोनवरुन सीरम इंस्टिट्युटच्या आदर पुनावाला, भारत बायोटेकच्या डॉ. कृष्णा इला यांना फोन करुन आपल्याला लस देण्याची विनंती केली होती.

त्यानंतर शनिवारी राज्याचे मुख्य सचिव मुद्दाडा रविचंद्रा यांनी सरकारच्या वतीनं आदर पुनावाला, डॉ. कृष्णा इला, आणि रेड्डीज लॅबच्या डॉ. दिपक सप्रा यांना पत्र लिहून २ कोटी ४ लाख लोकांच लसीकरण करण्यासाठी आपल्याला ४ कोटी ८ लाख लसींची आवश्यकता असल्याचं कळवलं आहे. मात्र अद्याप ही आंध्रप्रदेश प्रतिक्षेत आहे.

८. आसाम

आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच लसीकरण १ मे पासून सुरु करण्यावर शंका व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी २ अडचणी असल्याचं सांगितलं. एक तर लसीची उपलब्धता आणि दुसरं म्हणजे २ मे रोजी राज्य विधानसभेचे जाहीर होणार निकाल.

ते म्हणाले, आम्ही सिरम आणि भारत बायोटेकला ऑर्डर दिली आहे, पण ते जेव्हा लस पुरवठा करतील तेव्हाच आम्ही लसीकरण  शकतो. २ मे रोजी  निकाल आहेत आणि ४ मे पर्यंत कंपन्यांना ऍडव्हान्स पैसे द्यायचे आहेत, या सगळ्या प्रक्रियेदरम्यान मला नाही वाटत कि, १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होईल. पण रजिस्ट्रेशन सुरु असले असं देखील सर्मा यांनी सांगितलं आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.