या 3 कारणांमुळे फडणवीसांची केंद्रातून पद्धतशीर गेम करण्यात आली असावी..

एकनाथ शिंदे अचानकपणे मुख्यमंत्री झाले, हा धक्का महाराष्ट्र सहन करतच होता तोच देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. सुरवातीला एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा करत असताना मी स्वत: या मंत्रीमंडळातून बाहेर राहणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली होती. मात्र केंद्रातून फोन आल्यानंतर केंद्रिय नेतृत्वाचा आदेश म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली..

काही काळापूर्वी देंवेंद्र फडणवीस हे राज्याचे किंगमेकर होते, चाणक्य होते.

सर्व स्तरातून महाविकास आघाडी सरकार फोडण्याचे श्रेय निर्विवादपणे फडणवीस यांच्याकडे जात होते. पण आत्ता उपमुख्यमंत्री झाल्यामुळे फडणवीस यांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम केंद्रानेच केलाय का? भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाने उपमुख्यमंत्री स्वत:कडे घेवून नेमकी कोणती गोष्ट साध्य केली आहे? अन् पहिले अडीच वर्ष शिवसेनाला अन् आत्ता पुढचे संभाव्य अडीच वर्ष देखील शिवसेनेलाच मुख्यमंत्रीपद मिळाल्याने शिवसेनाचाच हा मास्टरस्ट्रोक ठरलाय का?

पहिला मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय का घेतला असावा..

एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल असणारी सहानभूतीची लाट आपोआप ओसरायला सुरवात होईल. शेवटी मुख्यमंत्री सेनेचाच झाल्याने शिवसैनिकांचा राग शांत होईल व जेव्हा मुख्यमंत्रीपदाची वेळ आली तेव्हा सामान्य शिवसैनिकांला मुख्यमंत्री पद न देता उद्धव ठाकरेंनी ते स्वत:कडे घेतलं पण भाजपने मनाचा मोठ्ठेपणा दाखवला व हे पद सामान्य शिवसैनिकाला दिलं हे हे पर्सेप्शन लोकांमध्ये जाईल.

सोबतच येत्या महानगरपालिका निवडणूकीत शिवसेना फोडल्याचा फटका भाजपला बसू नये म्हणून मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे देण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाने घेतला असावा असा अंदाज मांडला जातोय..

पण त्याहूनही अधिक महत्वाचं आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी…

सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आपण या मंत्रीमंडळात सहभागी होणार नाही असही त्यांनी सांगितलं. मात्र काही काळानंतर जेपी नड्डा, अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस देखील मंत्रीमंडळात सामील होत असल्याचं ट्विट केलं.

त्यानंतर फडणवीस यांनी आपण मंत्रीमंडळात सहभागी होत असल्याचं स्पष्ट करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली..

हा निर्णय नेमका का झाला असावा याची देखील काही प्रमुख कारण सांगितली जात आहेत..

त्यातलं पहिलं कारण म्हणजे केंद्राने देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम केला आहे का?

राज्यसभेच्या निवडणूकीत फडणवीस, विधापरिषदेच्या निवडणूकीत फडणवीस, सर्वत्र फडणवीस..फडणवीस यांच्या गटातील व्यक्तींनाच विधानपरिषदेचं तिकीट मिळत होतं, फडणवीस यांच्या गटातील व्यक्तींनाच राज्यसभेचं तिकीट मिळत होतं. 2014 पासून फडणवीस यांनी नियोजन करुन विरोध व पक्षांतर्गत विरोधक अशा दोन्ही ठिकाणच्या लोकांना बाजूला काढण्याचा कार्यक्रम हाती घेतला. या कारणामुळेच एकनाथ खडसे पक्ष सोडून बाहेर पडले, विनोद तावडे केंद्रात गेले तर पंकजा मुंडें अस्वस्थ होवू लागल्या…

मात्र हे सर्व करत असताना केंद्रिय पातळीवर कुठेतरी भावी पंतप्रधान, सक्षम नेतृत्व म्हणून देखील फडणवीस यांचा उल्लेख होवू लागला होता. कदाचित याच गोष्टीमुळे देवेंद्र फडणवीस यांना रसद पुरवणं पण मर्यादित असा अजेंडा केंद्रिय नेतृत्वाने घेतलेला असू शकतो.

उपमुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करणं म्हणजे एका बाजूला ताकद पण देणं पण मर्यादित स्वरूपात असा विचार केंद्रिय नेतृत्वाने केलेला असू शकतो..

दूसरी महत्वाची गोष्ट सांगण्यात येत आहे ती म्हणजे भाजप अंतर्गत संघ व भाजपचं राजकारण..

संघाचं मुळ असणाऱ्या नागपूरमधून देवेंद्र फडणवीस येतात. ते कट्टर संघाचे प्रचारसेवक आहेत. नाही म्हणायला मोदी व अमित शहा देखील संघाच्या पार्श्वभूमीचे आहेत पण नागपूर व ब्राह्मण या दोन्ही समीकरणामुळे उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे संघातून मोठ्ठ पाठबळ उभा राहू शकतं. हीच शक्यता खोडून टाकण्यासाठी वेळेतच पंख छाटण्याचा कृती कार्यक्रम भाजपने पर्यायाने मोदी व अमित शहा यांनी केलेला असू शकतो..

तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जातसमीकरणं..

एका बाजूला फडणवीस यांच्याकडे नेतृत्व देत असताना भाजपने एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं आहे. एकनाथ शिंदेंच मुळ पश्चिम महाराष्ट्र आहे. त्यात ते मराठा आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा हि दोन्ही गणित महाराष्ट्रात कायमस्वरूपी सत्तास्थापन करणारी राहिलेली आहेत. मात्र भाजप अंतर्गत अस नेतृत्व महाराष्ट्रात तयार करण्यावर देखील मर्यादा असल्याचं दिसून येत होतं.

कारण अस नेतृत्व तयार करत असताना ते पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखालीच तयार होणार होतं, या गोष्टींना कुठेतरी बायपास करण्यासाठी भाजपने दिलेला मराठा चेहरा हा मोठ्ठा असेल सोबतच तो देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मोठ्ठा असेल याची जाणीव केंद्रिय नेतृत्वाने घेतलेली असावी..

अस करत असताना एक प्रश्न उरतो तो म्हणजे फडणवीस यांच्याहून एकनाथ शिंदेंना मोठ्ठं करण्याचा धाडसी निर्णय भाजप का घेईल? तर याचं उत्तर गुवाहाटीतच मिळतं. आसामचे मुख्यमंत्री म्हणतात, हेमंत बिस्वा हे पुर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे नेते पण आज ते हार्डकोअर भाजपचा विचार पुढे नेतात. आसाममध्ये त्यांनी बीफ बॅन केलं आहे, प्रखर हिंदूत्ववादी धोरण आखताना त्यांनी ७०० मदरसे बंद केले आहेत.

दूसरीकडे स्वत: एकनाथ शिंदे आपण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे हिंदूत्ववादी विचार पुढे घेवून जात असल्याचं सांगतात. प्रखर हिंदूत्ववादी चेहरा व जात फॅक्टरमधील मराठा नेतृत्व या दोन्ही समीकरणामध्ये एकनाथ शिंदे फिट्ट बसतात. मात्र एकनाथ शिंदेंच नेतृत्त्व जर फडणवीस यांच्या हाताखालीच आहे हे पर्सेप्शन झालं तर मात्र या समीकरणातून मराठा फॅक्टर आपोआप जातो. म्हणूनच मराठा नेतृत्त्वाचा पर्याय फडणवीस यांना बायपास करून देण्याचा विचार केंद्रिय नेतृत्वाने केला असू शकतो. व हेच बायपास करणं प्रकर्षाने दिसावं म्हणून फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिलेली असावी…

पण हे झाले फक्त अंदाज.. घडणाऱ्या घडामोडीचं इतक्या जलद आहेत की आपण फक्त अंदाज लावू शकतो.. तुम्हाला या साऱ्या घटनाक्रमांबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.