क्रांतीसिंह नाना पाटील यांचे ३ किस्से, यावरून समजतं नाना किती मोठे होते

क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक मोठं नाव. सातारा, सांगलीसारख्या शहरांमध्ये ब्रिटीश सरकारच्या काळात प्रतिसरकारचा प्रयोग यशस्वी करुन दाखवणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटलांचे तीन किस्से यावरून समजतं नाना किती मोठे होते.

 क्रांतिसिंह नाना पाटील बनले पोतेबुवा

ब्रिटिश सरकारने नाना पाटलांवर इस्लामपूरच्या पोलिस स्टेशनमध्ये दररोज हजरी देण्याच फर्मान काढलं होतं. यामुळे त्यांना काही दिवस इस्लामपुरातच राहणे भाग पडले. परंतु त्यांच्यापुढे असा प्रश्न पडला की इस्लामपुरात राहण्या-जेवण्याची व्यवस्था कशी करावयाची? त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. खानावळीला देण्यापुरतेही पैसे त्यांच्याजवळ नव्हते. 

तसेच ‘सरकारविरुद्धचा माणूस’ असा शिक्का त्यांच्यावर बसलेला असल्याने कुणाकडे आश्रय मिळण्याची शक्यता नव्हती. यामुळे क्रांतिसिंह यांनी इस्लामपूरच्या काँग्रेस कमिटी कार्यालय गाठले. काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी काही मदत करतील अशी अपेक्षा क्रांतिसिंह यांना होती. 

मात्र कॉंग्रेस कमिटीमधील पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिलं,

 

“तुमची आर्थिक ऐपत नाही तर तुम्ही या फंदात का पडलात ? चळवळीत सामिल व्हा असे आमंत्रण द्यायला आम्ही आलो नव्हतो. आमच्याकडून मदतीची अपेक्षा मुळीच बाळगू नका.”

काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या या वागणुकीमुळे नाना दुखी झाले. आणि तिथून बाहेर पडले आणि फिरत इस्लामपूरची बाजारपेठ आले. हमाली करुन काम करावं आणि चार पैसे मिळवावेत असा विचार त्यांनी केला.

नाना पोते उचलण्यासाठी पुढं झाले पण काही हमालांना क्रांन्तीसिंह नाना पाटलांना लगेच ओळखलं. नाना पोते उचलण्यासाठी पुढे झाले. पण तेथील हमालांनी त्यांना ओळखले. ते नानांना पोत्याला हात लावू दिला नाही.  

“तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला आम्ही हमालीचे काम कसे करू द्यावे? म्हणत विरोध केला. 

पाहिजे तर आम्ही वर्गणी काढून तुम्हाला पैसे देऊ,पण पोत्याला हात लावू देणार नाही. हमालांनी देऊ केलेली मदत स्वीकारण्यास नाना पाटलांनी नकार दिला.

ते हमालांना म्हणाले, “तुमच्या कष्टाचे पैसे मी कसे घेऊ? मला ते जमणार नाही. “

अंगावरचे फाटलेले कपडे कसे बदलायचे याचा विचार चालू असताना नाना पाटलांना तिथच गोणपाटाचं कापड दिसलं. नाना पाटलांनी लागलीच ते घेतलं आणि त्याचा शर्ट केला. हे घालून नाना देशासाठी पोते बुवा बनले. 

भूमिगत चळवळीत मुख्य भूमिका

सातारा जिल्ह्यात ‘चले जाव’ चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तर इस्लामपूरच्या मोर्चातील दोन जण आणि वडूज येथे पोलीस गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाला होता. या घटने नंतर क्रांती सिंह पाटलांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांची एक गुप्त बैठक बोलाविली. त्यात सातारा जिल्ह्यात भूमिगत  चळवळीला सुरु करण्याचा निर्णय घेतला.  

चळवळीच्या सुरुवातीला भूमिगत कार्यकर्त्यांचे अनेक गट निर्माण झाले. नाना पाटील व त्यांचे सहकारी यांनी आपल्या कार्याचे मुख्य केंद्र म्हणून कुंडल गावाची निवड केली होती. त्यामुळे या गटाला ‘कुंडल गट’ या नावाने ओळखले जाऊ लागले. 

जी. डी. लाड, नागनाथ नायकवडी, अप्पासाहेब लाड, नाथाजी लाड, रामभाऊ पवार, भगवानराव मोरे, गोविंदराव मिरगे इत्यादी अनेक कार्यकर्त्यांचा या गटात समावेश होता.

तारायंत्राच्या व टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वेचे रूळ उखडणे, रेल्वेची स्टेशने जाळणे, पोस्टाच्या पेट्या पळविणे, पोलिसांची हत्यारे पळविणे, डाकबंगले जाळणे यांसारखी अनेक घातपाती कृत्ये कुंडल गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्या. सुरवातीला भूमिगत चळवळी बहुतेक कार्यकर्ते जनतेत मिसळून उघडपणे कार्य करायचे. ते गावागावांत जाऊन लोक बैठकी घेत; त्यांच्याशी चर्चा, विचार-विनिमय करीत व चळवळीची उद्दिष्टे समजावून सांगत.

याला अपवाद होते ते फक्त नाना पाटील. ते चळवळीच्या सुरवाती पासून भूमिगत झाले. लोकांमध्ये क्रांतिसिंह हे भूमिगत चळ प्रतीक बनले होते. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या या वेळेप कार्यामुळे ‘नाना पाटील’ हे नाव सातारा जिल्ह्याच्या घराघरत पोहोचले होते.

 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळेच १ मे  १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

१९४६पासूनच महाराष्ट्रातील विविध संघटना व राजकीय पक्ष यांनी सर्व मराठी भाषिक लोकांचे महाराष्ट्र हे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती. क्रांतीसिंह शेतकरी कामगार पक्षात असतानाच त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रचार केला.

शेतकरी कामगार पक्षानेही या प्रश्नाला अग्रक्रम देऊन त्यावर जनमत संघटित करण्याची जबाबदारी क्रांतिसिंह, केशवराव जेधे यासारख्या नेत्यांवर सोपविली होती. पुढे कम्युनिस्ट पक्षात गेले तरी त्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचारकार्यात खंड पडला नाही.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला खरा जोर चढला तो राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर. या आयोगाने संयुक्त महाराष्ट्राची मागणी अमान्य केली होती. मुंबई महाराष्ट्राला मिळू न देण्याच्या व्यापक कटाचाच तो भाग होता. 

मुंबई शहरावर महाराष्ट्राचाच हक्क होता. पण  मुंबईचा महाराष्ट्रात समावेश करण्यास काही राज्यकर्ते आणि  भांडवलदारांचा विरोध होता. मुंबईचे वेगळे राज्य, केंद्रशासित मुंबई, मुंबईसह महाराष्ट्र व गुजराथ यांचे द्विभाषिक राज्य, असे वेगवेगळे पर्याय पुढे आणले गेले होते.  

याविरोधात राज्यभरात सर्वत्र सभा भरविल्या, मोर्चे आयोजित करण्यात आले. पोलिसांच्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला होता. तरीही इथल्या राज्यकर्त्यांनी मराठी जनतेच्या भावनांची पर्वा न करता द्विभाषिक राज्य स्थापन केले.  

क्रांतीसिंह यांनी महाराष्ट्रावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध जोरदार आवाज उठविला.

राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी मुंबईच्या कामगार विभागात अनेक सभा घेऊन मराठी लोकांना संयुक्त महाराष्ट्रासाठी लढण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळविला आणि आपल्या झंझावाती प्रचार ग्रामीण भाग दणाणून सोडला.

संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्रावर ग्रामीण भागात रान उठवण्याचे काम प्रामुख्याने क्रांतिसिंह नाना पाटलांनीच केले.

त्यांच्या प्रभावी प्रचारकार्यामुळे मुंबई सरकारने १६ जानेवारी १९५६ रोजी त्यांना प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक केली आणि नऊ महिने नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवले. आपल्या चिथावणीखोर व आक्षेपार्ह भाषणांनी लोकांना हिसक व बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सरकारने त्यांच्यावर ठेवला होता.

भारताचे स्वातंत्र्य असुद्या किंवा संयुक्त महाराष्ट्राचा आंदोलन यात क्रांतीसिंह नाना पाटलांची भूमिका महत्वाची ठरली आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.