३१ डिसेंबर की गुढीपाडवा, हे वाचा कन्फ्यूजन दूर करा..

नाही होय म्हणता म्हणता २०२० संपलं. हे जगातलं एकमेव वर्ष असेल ज्याला आपण कंटाळलो होतो. नेहमी पेक्षा जास्त उत्साहाने आपण न्यू इयरचे व्हाट्सअप फॉरवर्ड करायला सुरवात केली. आमचं एक बेनं हाय,

‘मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर फक्त गुढीपाडव्याच्या दे’

असं म्हणतं. हीच खरी हिंदू नवीन वर्षाची सुरवात आहे असं त्याचं मत. जयंती, पुण्यतिथी, अत्याचं श्राद्ध, बायकुचा बड्डे तिथीनुसारच साजरा केला पायजेल असं त्याचं स्पष्ट मतय, सगळं तारखेवार चालू असताना गोंधळ घालायचा नक्की हा उत येतो कुठणं?

आता आमच्या म्हाताऱ्यांनी दिवाळीला नवीन वर्ष असतंय असं सांगून ठेवलेलं. आणि तेच्यात पण कितीक महिन्यांची नावं उलटीपालटी घातलेली अस्त्यात.

मग आम्ही पण हिंदू नवीन वर्षाच्या नक्की उगमाचा शोध घ्यायला गेलो आणि हे हाती घावलं..

हिंदू धर्मातील परंपरा आणि प्रथा किती प्रचंड प्रमाणात वैविध्यपूर्ण आणि अनेकतावादी आहेय ह्याचा दाखला द्यायचा झालाच तर आम्ही कॅलेंडरवर बोट दाखवू!

म्हणजे फक्त महालक्ष्मी आणि कालनिर्णय एवढ्यापुरतं नाय तर ही विविधता साल नक्की कुठणं सुरू होतं ते मोजावं कसं इथपर्यंत आहे.

आपण सध्या जे शके म्हणून वापरतो ते साल इसवी सनाच्या मागे असतंय. त्याला विक्रम संवत्सर / शालिवाहन शक असं कायतरी नाव शान्याहुशार माणसांनी दिलंय.

पहिल्यांदा शक गणना सुरू झाली ती इसवी सनाच्या 78 व्या साली. कनिष्क ह्या भारताच्या बाहेरून आलेल्या कुशाण राजाने ह्याची सुरुवात केली असल्याचे काही पुराव्यात सापडते. म्हणजे ज्याच्या नावावर आपण गमज्या मारणार तो माणूसही इथल्या मिश्र संस्कृतीचा भाग आहे.
त्यानंतर अनेक राजांनी शक ही कालगणना उचलून धरली.

तर मुळात हा शोध काही त्यांनी नवीन लावलेला नाही. आधीची जी कालगणना सुरू होती त्यालाच पुढंमागं करून,

“आता मी राजा झालुय, आता परत पहिल्यापासून मोज”

असं म्हणत सुरवात केलेली असतेय. गरीब जनता आपलं भरल्यात तेवढी सालं परत खुडून फळ्यावर 1 जानेवारी 0001 पासून परत मोजायला सुरवात करत असतेय.

इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तिथुन लोकांनी पहिलं वर्ष म्हणून मोजायला सुरवात केली. तर मुहम्मद पैगंबर जेव्हा मक्केहून मदिनेला गेले तेव्हापासून मुस्लिमांनी हिजरत ही कालगणना ठरवत आपली सनावळ तिथून मोजायला सुरवात केली.

अशा प्रकारे कालगणना म्हणजे बाकीच्या धर्मांचा मूळ गाभा म्हणता येईल. बौद्ध, जैन आणि पारशी कॅलेंडर हेही ह्याच पद्धतीचे आहेत.

शक कॅलेंडर आणि बहुतांश हिंदू कॅलेंडर्स ही चंद्राच्या कलेवर अवलंबून आहेत.

त्यांची मूळ वेळ ठरवण्यासाठी उज्जैन येथून मोजली जाणारी वेळ ठरवण्यात येते. आश्चर्य म्हणजे उज्जैन हे एकच ठिकाण भारतातल्या सगळ्या संस्थानांनी एकमुखाने मान्य करून ५ व्या शतकापासून वापरायला सुरुवात केली होती. ह्या वेळी ग्रीनीच वेधशाळा पूर्णपणे तयारही नव्हती.

व्हीटकर अलमनस्क रिपोर्ट ह्या जगातल्या सगळ्या कॅलेंडरांची माहिती काढणाऱ्या संस्थेनी भारतातली ही मेन कॅलेंडर सागितल्यात – आत्ता जर इंग्रजी ग्रेगरियन वर्षाचं २०२० साल चालू असतं तर आपल्या कालगणेनुसार कोणती वर्षे सुरु असतील :

कलियुगाच्या कॅलेंडरनुसार 6o21
बुद्धाच्या निर्वाणकाळी सुरु झालेल्या कॅलेंडरनुसार 2564
आपल्या लाडक्या विक्रम संवत नुसार 2077
शक कालगणेनुसार 1942
वेदांग ज्योतिष कालगणेनुसार 1941
बंगाली सण कालगणेनुसार 1427
कोल्लाम कालगणेनुसार 1276 

साल चालू असेल!

आता ह्यातल्या पहिल्या कलियुग कॅलेंडरचीच गोष्ट घ्या!

कलियुग म्हणजे चार युगांमधलं सगळ्यात बारीक युगय – फक्त 4 लाख, 32 हजार वर्षांचं आणि त्याच्यामागची सगळी युगं ह्यापेक्षा मोठी म्हणजे एकूण टोटल मारली तर 43 लाख  2o हजार वर्षांची भरतील.

मंग आता सांगा भिडू,

आपण ह्या कॅलेंडरला हिंदू कॅलेंडर म्हणायचं का विक्रम संवंतला?

आता आपला राज्याभिषेक झाल्यानंतर निमित्ताने शिवरायांनी “राज्याभिषेक शक’ ही नवी कालगणना सुरू करून ते शककर्ते  राजेही बनले आणि स्वराज्यात त्यांनी वेगळी कालगणना सुरु केली.

मग ह्या कालगणनेला का मानू नये?

शेवटी तुम्ही आरंभबिंदू जिथं गणना सुरु  होते,त्याला ह्या शास्त्रात झिरो पॉईंट म्हणतात. मग देश म्हणून आपण कोणता झिरो पॉईंट मानायचा?

तर लोकांना जो पटतो आणि वापरायला सोप्पं वाटतो तो !

म्हणून उत्तर भारतातील जवळपास सगळी लोकं, पार काश्मीर – पंजाब – बिहार – गायपट्टा बैसाखीला नवीन वर्ष सेलिब्रेट करतो. गुजराती लोक दुसऱ्या वर्ष सेलिब्रेट करतात तर महाराष्ट्रात आपण दक्षिणामान्त कॅलेंडर वापरतो जे आपल्यासोबत गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश एवढीच लोकं वापरतात.

मार्चच्या आसपास आपण नवीन वर्ष आलं असं म्हणतो.

बाकीच्या कॅलेंडरपेक्षा आपल्याला चायनीज कॅलेंडर्स जास्त जवळची आहेत कारण दिवस मोजायची मराठी आणि चिनी पद्धत जवळपास सेम आहे. आणि दक्षिणेची राज्ये आणि नॉर्थ ईस्ट ह्यांचं कॅलेंडर जळपास सारखं आहे.

ह्या एवढ्या विविधतेमुळे आणि जुन्यालाच चिकटून राहणार्त्या लोकांमुळं बऱ्याच लोकांची माथी फिरली होती. पण शहाणी माणसं त्याच्यावर बरोबर मार्ग काढतात. अकबराच्या काळात हिजरत कॅलेंडर भारताच्या पिकांनुसार चालत नव्हतं आणि म्हणून टॅक्स गोळा करायला जाणारी लोकं वैतागून गेली होती तेव्हा अकबराने त्यांना जुने उद्योग बंद करायला लावले आणि इथल्या पिकपाण्यानुसार “तारीख-ई-ईलाही” हे नवं कॅलेंडर छापून घेतलं.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर नेमकी हीच गोची झाली होती.

कोणतं कॅलेंडर राष्ट्रीय म्हणायचं ह्यात मोक्कार मारामाऱ्या व्हायचा चान्स होता. तेव्हा त्या काळातल्या जवाहरलाल नेहरू नावाच्या एका हुशार माणसानी आपल्या “कॅलेंडर रिफॉर्म कमिटीवर” मत मांडलं की,

“इतिहासात आपल्या पूर्वजांनी जपलेल्या दैदिप्यमान इतिहासाची पावती म्हणून तुम्ही मला ही ३० कॅलेंडर्स आणून दिली आहेत आणि त्यातलं एक राष्ट्रीय कॅलेंडर म्हणून निवडायला लावलं आहे. ही सगळी आपल्या देशाच्या महान परंपरेची ओळख आहे, तेव्हा आपण त्याला जपू. पण इथून पुढं वाटचाल करताना आपण वैज्ञानिक दृष्टीनं विचार करू आणि जी व्यवस्था सगळ्या देशाला तिचा स्वीकार करू!”

त्यांनी बाकीचा मोकारपणा न लांबवता ज्या त्या राज्याला आपापलं पंचांग वापरायला सांगितलं, सगळ्यांना जास्त सोयीस्कर होणारं शक कॅलेंडर देशाचं म्हणायला असावं म्हणून ठेवलं पण सगळ्या नोकरशाहीत, देशभरात आणि प्रशासकीय कामांसाठी इंग्रजी कॅलेंडर वापरायला लावून भारताला जगाच्या बरोबरीनं काळ मोजायला शिकवलं!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.