३१ डिसेंबरचा पेग भरला तेव्हा….

आज ३१ डिसेंबरची रात्र. आज दारू प्यायची असते. शास्त्र असत ते, ते पण ब्रिटीशांच. ब्रिटीश लोक चांगले होते की वाईट ते सांगू शकत नाही पण त्यांनी आपणाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या. दारू हि देखील त्यातलीच गोष्ट. म्हणजे कस तर जनरल डायर आपणाला माहित असतो ते जानियलवाला बाग हत्याकांडासाठी. पण त्याचा बाप माहित नसतो.

त्याच्या बाप एडवर्ड अब्राहम डायरने भारताला ओल्ड मॉन्क दिली.

आत्ता भिडू लोकं म्हणतील दारू ब्रिटीशांनी दिली नाहीच. ती आपल्या संस्कृतीत पहिल्यापासून होती. अगदी वेदांचे दाखले देखील देतील. आत्ता संस्कृतीरक्षक कितीही ओरडले तरी वेदात सोमरसाचे दाखले आहेत हे मान्य करावेच लागेल आणि अशा वेळी कोणी म्हणला, वेदांकडे चला तर आपसूक पाय वळतील. 

असो दारूबद्दल लिहायचं ठरल्यानंतर काय लिहावं हे महत्वाच होतं, कारण कित्येक महान लोकं आपल्याकडे होवून गेली आहेत अगदी मराठीतल्या कवीबद्दल सांगायचं झालं तर विंदा करंदीकर म्हणतात, 

“प्यालो किती तरिही प्याले न मोजितो मी आहे पिता पिवविता तो एक, मानतो मी. द्राक्षांत आजच्या या दारू असे उद्यांची. आशा चिरंतरनाची इतकीच ताणतो मी.”

नाहीतर आपले ओल्डमॉन्क प्रेमी मंगेश पाडगावर यांच्या लाईनी, 

कसे सांगा आहात तुम्ही नाना, 

काय सुरवात केली मद्यपाना ? 

जगी असले जरी राव आणि रंक 

सौख्यदायी सकलांसी ओल्डमंक. 

आत्ता हि मोठ्ठी माणसं. यांचे दाखले दिली की दारू हि वेगळी गोष्ट आहे हे पटवून द्यायला अन्य कोणाच्या आधाराची गरज लागत नाही.

तसही दारूबद्दल इतक्या गोष्टी लिहल्या असताना मी अजून वेगळ सांगाव याला अर्थ नाही. मी काय सांगू शकतो तर पहिला पेग उचलल्यानंतर मी काय केलं. ३१ डिसेंबरच्या रात्रीच एकच घे म्हणतं मित्राने भरलेल्या पेगचं पुढं काय झाल?

पहिला पेग उचलून खूप वर्ष झाली, ती रात्र ३१ डिसेंबरचीच होती. तो पहिला घोट देखील आठवतो. माणसानं पहिला पेग आणि पहिला किस या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यातच. कित्येक गोष्टी आयुष्यात आल्या तरी पहिल्या पेग आणि  पहिल्या किसच्या गोष्टी आठवाव्या लागत नसतात. ते आपल्या माणूस असण्याच लक्षण असत. 

प्रत्येकाच तरुणपण शोधण्याचं वय असत. या तरुणपणात आपल्याला ग्लासचा शोध लागतो. त्यात दारू असते. मग आपण प्रेयसी शोधतो, करियर शोधतो, गायक शोधतो, संगीतकार शोघतो, लेखक शोधतो, पुस्तकं शोधतो, कविता शोधतो, कथा शोधतो.. कित्येक गोष्टी शोधत राहतो आणि अशाच एका मैफिलीत नुसरत वाजतो, तो म्हणतो

“जो पत्ता पुछते थे किसी का कभीं, लापतां हो गये देखते देखते.”

थोडक्यात सांगायचं तर दारू चिरंतर असते. दारूवरच प्रेम प्रत्येक मैफिलीत अजून वाढत जातं. एका ग्लासातून दूसऱ्या ग्लासाकडे हात जातो.

मित्रांच्या प्रत्येक गोष्टीत हि दारू असते. दारूच्या नशेत प्रत्येकाचं लफडं प्रेमात बदलत. प्रत्येक दोस्त नव्याने भेटत राहतो आणि चढत राहते. अशाच मैफिलीत रहैना हैं तेरे दिल मैं, साथिया, प्रेमम, सत्या, कंपनी, वास्तव, गुलाल सारखे पिक्चर लावले जातात. मित्र, प्रेम, दोस्त यांच्यात मैफिल पुन्हा पुन्हा रंगून जाते. 

एका टप्यावर राजकारणाची चर्चा होते. टेबलावरच्या चर्चांचा सर्वात चांगला फायदा म्हणजे इथं एकमेकाला ट्रोल करता येत नाही. जे असेल ते थेट असतं. समोरचा व्यक्ती साहेबाचा असो की बाळासाहेबांचा, तो नरेंद्र मोदींचा असो की संघाचा किंवा तो कट्टर कम्युनिस्ट असो.

टेबलांवर डावं उजवीकडे झुकतं आणि उजवं डावीकडं झुकतं. मुळात या झुकण्यालाच चढली अस समर्मक नाव असतं.

एका टप्यावर या चर्चा स्टार्टअपवर येतात, करियर आणि नोकरीच्या शोधात प्रेमाचा विषय मागं राहतो पण ती कुठेतरी असतेच.

बर या सगळ्या माझ्या गोष्टी. तुम्ही मैफिलीतच या गोष्टी बोलला असाल अस नसतं कारण प्रत्येकाची दारू वेगळी असते. प्रत्येकाने ती आपआपली म्हणूनच प्यायची असते. फक्त इतकच दारू पिल्यावर गाडी चालवायची नसते, खोटा पुरषार्थ दारू पिल्यानंतर दाखवायचा नसतो, ब्रेकअप दारू पिल्यानंतर करायचं नसतं, अत्याचार-खून-मारामाऱ्या करुन दारूला बदनाम करायचं नसतं, 

बाकी जे तुमचं असेल, तुमच्या मैफीलीचं असेल ते नक्कीच मांडा.. इथेच कमेंट बॉक्समध्ये. तेवढीच दारू वैश्विक होण्यास आपला हातभार लागेल.

हे ही वाचा भिडू.

1 Comment
  1. Test says

    Daru vait re daru vait

Leave A Reply

Your email address will not be published.