८ जून १९८५ मराठवाड्यातली पहिली शाखा, १९८८ बाळासाहेबांची सभा ; उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा काही महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणूका आहेत व या निवडणूका प्रत्येक पक्षासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या आहेत. म्हणूनच प्रत्येक पक्षाकडून राज्यभर प्रचारसभा घेतल्या जात आहेत.

राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील जाहीर सभेनंतर ८ जूनला उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. ज्या मैदानावर राज ठाकरेंची जाहीर सभा झाली त्याच मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आहे. ८ जून ही तारिख निवडण्यामागे कारण सांगितलं जातय ते मराठवाड्यातल्या पहिल्या शिवसेना शाखेचा वर्धापनदिन..

दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदीप जैस्वाल यांनी आज माध्यमांसोबत बोलताना बाळासाहेबांच्या १९८८ सालच्या सभेचा संदर्भ दिला. बाळासाहेबांची ही गाजलेली सभा देखील औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच झाली होती.

उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आयोजित करत असताना शिवसेनेमार्फत तीन गोष्टी जाणिवपूर्वक करण्यात आलेल्या आहेत.

१) पहिली गोष्ट म्हणजे सभेची तारिख..

सभेची तारिख ठरवताना ती ८ जून ठरवण्यात आली. या दिवशीच सेनेच्या मराठवाड्यातल्या पहिल्या शाखेची सुरवातच झाली होती.

२) दूसरी गोष्ट म्हणजे मैदानाची निवड..

१९८८ साली महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. ही सभा प्रचंड वादळी झाली. या सभेनंतर सेनेचे ६० पैकी २७ नगरसेवक निवडून आले व शिवसेनेने औरंगाबाद महानगरपालिका ताब्यात घेतली.

३) औरंगाबाद चं संभाजीनगर

शिवसेनेमार्फत ८ जूनच्या सभेचा ट्रिझर प्रसारित करण्यात आला. यामध्ये बाळासाहेबांच्या “मी म्हणालो ना संभाजीनगर” या वाक्याचा संदर्भ देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर असाच उल्लेख केला होता. मात्र त्यावेळी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून “काय गरज आहे नामांतराची मी म्हणालो ना” या वाक्यावरून त्यांच्या मर्यादा देखील स्पष्ट झालेल्या होत्या.

थोडक्यात उद्धव ठाकरे बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना मराठवाड्यात वाढवली तोच फॉर्म्युला परत आणताना दिसत आहेत. साहजिक बाळासाहेबांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये शिवसेना कशी भक्कम होत गेली हे पाहणं गरजेचं आहे.. 

औरंगाबाद शहराचा इतिहास काय आहे… 

औरंगाबाद शहर हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपुर्वी निजामाच्या मराठवाड्याचा भाग होते. साहजिक या शहरावर मुस्लीम प्रभाव दिसून येतो. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच इथे मुस्लीम नेत्यांचा एकहाती प्रभाव होता. यातील काही नेते हे सेक्युलर पुरोगामित्व जपणारे होते तर काही मुस्लीमधार्जिण राजकारण करण्यात पुढाकार घेत असत. 

पण शहरावर मुस्लीम पगडा होता. तिकडे मुंबईत शिवसेना नावाचा पक्ष मराठीचा मुद्दा मागे सारून हिंदूत्वाचा मुद्दा रेटू लागला होता. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदूत्वाचा मुद्दा घेतला होता. याच काळ औरंगाबादमधल्या गुलमंडी येथे मराठवाड्यातली पहिली शाखा सुरू करण्यात आली. ते साल होतं जून १९८५..

औरंगाबादमधल्या तरुणांनी एकत्र येवून गुलमंडीवर शिवसेनेच्या शाखेची पाटी रोवली. ती तारीख होती ८ जून १९८५

मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर उभारलेली गेलेली शिवसेनेची पहिली शाखा म्हणून आजही या शाखेचा उल्लेख केला जातो. 

त्यानंतर पमदपुरा, हमालवाडा अशा औरंगाबादच्या वेगवेगळ्या भागात शिवसेनेच्या शाखा सुरू करण्यात आल्या. अस सांगतात की त्या काळात उस्मानाबाद, बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भारातून औरंगाबाद शहराच्या शाखांमध्ये लोक यायचे आणि आपल्या गावात देखील शाखा सुरू करण्याची विनंती करायचे.

पुढे या शाखा गावखेड्यापर्यन्त पोहचल्या. याची पायाभरणी कुठेतरी औरंगाबाद शहरात उभारलेल्या शाखांमधूनच झाली होती. 

या शाखांमधून हिंदूत्वाची पायाभरणी करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणजे १७ जानेवारी १९८६ रोजी औरंगाबाद शहरातून शिवसेने मार्फत पहिल्यांदा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या मुख्य मागण्या होत्या त्या म्हणजे समान नागरी कायदा लागू करा, मुस्लीमांची गुंडगिरी थांबवा… 

थोडक्यात हा मोर्चा मुस्लीम समाजाच्या विरोधातच आहे अस एकंदरित वातावरणनिर्मीती करण्यात आली. मात्र सिटी चौकात या मोर्चाने दगडफेकीचं रुप घेतलं आणि दंगलीचा भडका उडाला. 

या नंतरच्या दोनच वर्षात औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणूका लागल्या.

१९८८ च्या या महानगरपालिकेत शिवसेना पुर्ण जोर लावून उतरली. ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत त्याच ठिकाणी बाळासाहेबांची ऐतिहासिक सभा पार पडली..

“खान हवा की बाण हवा” असा प्रश्नही याच सभेतून विचारण्यात आला.

मुस्लीम समाजावर आक्षेपार्ह टिका टिपण्णी देखील करण्यात आली.. बाळासाहेबांच्या या ऐतिहासिक सभेमुळे अवघ्या दोन वर्षापुर्वी एक शाखा सुरू झालेल्या औरंगाबाद शहरात सेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. 

त्यानंतर बाळासाहेबांनी याच मैदानात विजयी सभा घेतली. ती सभा देखील ऐतिहासिक झाली. कारण त्या सभेनंतर मराठवाड्याच्या गावखेड्यात शिवसेनेने पाय रोवले. फक्त मुंबई ठाण्याचा पक्ष म्हणून शिवसेनेवर लागलेला शिक्का खऱ्या अर्थाने या सभांमुळे संपुष्टात आला आणि त्याच जोरावर पुढच्या ७ वर्षातच शिवसेनेने भाजपसोबत राज्यात सत्ता मिळवली..

आत्ता हाच प्लॅन घेवून औरंगाबाद शहरातून मराठवाडा पुन्हा हातात घेण्याचा उद्धव ठाकरेंनी प्लॅन आखला आहे. त्यासाठी इतिहास आणि वर्तमान दोन्ही गोष्टींची आकडेवारी पाहणं गरजेचं आहे.

१९८९ ते २००९ दरम्यान मराठवाड्यात शिवसेनेचा विस्तार झाला. मुंबई, कोकण नंतर मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. औरंगाबाद शहराच्या राजकारणातून शिवसेना मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पसरू लागली. 

सेनेची लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेची संपूर्ण महाराष्ट्रातील कामगिरी पाहिल्यास…

१९८९ : ४ जागा जिंकल्या,

१९९१ : ४ जागा जिंकल्या

१९९८ : ६ जागा जिंकल्या

१९९९ : १५ जागा जिंकल्या

२००४ : १२ जागा जिंकल्या

२००९ : ११ जागा जिंकल्या.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सेनेने संपूर्ण महाराष्ट्रात २० जागा लढवल्या त्यातील १८ जागा जिंकून आणल्या. तर २०१९ मध्ये २३ जागा लढवल्या त्यातील १८ जिंकून आणल्यात.

तर फक्त मराठवाड्यातील ताकदीवर लक्ष द्यायचं झालं तर गेल्या २०१४ मध्ये मराठवाड्यातून लोकसभेच्या ३ जागा सेनेला जिंकता आल्या आणि २०१९ मध्ये देखील ३ जागा सेनेने जिंकल्या होत्या.

  • २०१४ मध्ये परभणी- संजय जाधव, औरंगाबाद – चंद्रकांत खैरे, उस्मानाबाद – रवींद्र गायकवाड.
  • २०१९ मध्ये परभणी- संजय जाधव, हिंगोली – हेमंत पाटील, उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर.

शिवसेनेची विधानसभेतील १९९० पासून ते २०१९ पर्यंतची जिल्हानिहाय ताकद पाहूया, 

मराठवाड्यात एकूण ८ जिल्हे आहेत, त्यापैकी 

औरंगाबाद : 

शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबादेत सुरू झाली. त्या औरंगाबादेतली सेनेची कामगिरी कामगिरी पाहिली तर,

१९९० ते २००४ पर्यंत विधानसभा निवडणूकीत सेनेने प्रत्येक वेळेस जिल्ह्यात ५ जागांवर आपले उमेदवार उभे केले त्यापैकी १९९० मध्ये ३ जागा जिंकून आणल्यात,  १९९५- २ जागा,  १९९९ – ३ जागा. २००४ – ४ जागा जिंकून आणल्या. तर २००९ च्या विधानसभा निवडणूकीत सेनेने ६ जागा लढवल्या त्यापैकी २ जागा जिंकून आणल्या. सेनेने २०१४ मध्ये ३ जागा जिंकल्या तर २०१९ मध्ये ६ जागा जिंकल्या.

औरंगाबादचे शिवसेनेत विशेष महत्व आहे, औरंगाबादने गेल्या ३७ वर्षांत २०१९ मधला लोकसभा निवडणुकीतील पराभव सोडला तर बाकी शिवसेनेच्या वाट्याला कधी पराभव येऊच दिला नाही. म्हणूनच या ज्या जिल्ह्याने महापौर, आमदार, मंत्री, खासदार अशी अनेक पदं पाहिलीत.

जालना : १९९० ते २००९ या काळात सेनेने जालना विधानसभा निवडणूकीत प्रत्येक वेळेस जिल्ह्यात ३ जागांवर आपले उमेदवार उभे केले त्यापैकी १९९० – २ जागा, १९९५ – ३ जागा, १९९९ – १ जागा, २००४ -१ जागा, २००९ मध्ये १ जागा, २०१४ मध्ये देखील सेनेने १ च जागा जिंकली. २०१९ मध्ये एकही जागा सेनेला जिंकता आली नाही. 

नांदेड :  १९९० ते २००९ हा काळ पाहता, सेनेने नांदेडमध्ये १९९० मध्ये ६ जागा लढवल्या त्यापैकी सेनेला १ च जागा जिंकता आली. त्यानंतर १९९५ मध्ये सेनेने ७ जागा लढवल्या त्यापैकी ३ जागा जिंकल्या, १९९९ मध्ये ७ जागांपैकी ४ जागा जिंकल्या, २००४ मध्ये ५ जागा लढवल्या आणि त्यापैकी ३ जागा जिंकल्या आणि २००९ मध्ये ७ जागा लढवल्या आणि एकाही जागेवर सेनेला विजय मिळवता आला नाही. २०१४ ला ४ जागेवर सेनेने विजय मिळवला तर २०१९ मध्ये १ च जागा जिंकता आली.

लातूर : १९९० ते २००९ या काळात सेनेने लातूर विधानसभा निवडणूकीतली कामगिरी पाहिली तर, १९९० मध्ये सेनेने ४ जागा लढवल्या तर १९९५ मध्ये ३ जागा लढवल्या मात्र दोन्ही विधानसभा निवडणुकीत सेनेला एकाही जागेवर यश मिळालं नाही.  १९९९ मध्ये सेनेने २ जागा लढवल्या त्यापैकी एका जागेवर यश मिळालं. २००४ मध्ये सेनेने १ च जागा लढवली आणि जिंकून आणली. मात्र २००९ मध्ये २ जागा लढवल्या आणि दोन्ही जागेंवर सेना यश मिळवू शकली नाही. हीच स्थिती २०१४ आणि २०१९ च्या विधानसभेत देखील होती. 

लातूर जिल्ह्यातील मतदारसंघ बांधणीत शिवसेना आजही शून्यावरच आहे. कारण मागील लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातुन शिवसेनेकडून सचिन देशमुख उभे होते मात्र त्यांना  मिळालेली मते नोटापेक्षा कमी होती. 

बीड : १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ४ जागांपैकी १ जागा जिकून आणली, १९९५ मध्ये ३ जागा लढवल्या त्यापैकी १ जागा जिंकली, त्या नंतर १९९९,२००४,२००९ प्रत्येक निवडणुकीत प्रत्येकी १ च जागा लढवली त्यापैकी २००४ मध्ये १ च जागा जिंकून आणता आली आणि बाकी दोन्ही विधानसभेत सेना अपयशी ठरली. अशीच परिस्थिती २०१४ आणि २०२९ मध्ये देखील राहिली कारण दोन्ही विधान सभा निवडणुकीत सेनेला एकही जागा जिंकता आली नाही.

जिल्हानिहाय आकड्यांची ताकद पाहता बीड आणि लातूरमध्ये शिवसेनेची २००९ पर्यंतची कामगिरी क्षीण आहे.

मात्र अलीकडील परस्थिती पाहता,

२०१९ मध्ये राष्ट्रवादीचे मोठे नेते असणारे आणि २००९ आणि २०१४ असे सलग दोन वेळेस आमदार म्हणून निवडून येणारे जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि बीडमध्ये कमकुवत असलेल्या सेनेला जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने स्ट्रॉंग उमेदवार मिळाला होता. जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर या काका-पुतण्याच्या लढतीत संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली.  

खरं तर बीड सेनेसाठी महत्वाचा मतदार संघ आहे. कारण सुरेश नवले, सुनील धांडे हे बीडमधून निवडून आलेलेत. आता इथून पुढे जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे शिवसेनेचा वरचष्मा पाहायला मिळू शकतो. 

परभणी : ९९० ते २००९ या काळात सेनेने परभणी विधानसभा निवडणूकीत १९९० मध्ये ४ जागा लढवल्या आणि ३ जागांवर विजय मिळवला. १९९५-१९९९- २००४ सलग तीन वर्षे सेनेने परभणीत ५ उमेदवार उभे केले आणि अनुक्रमे ३-४-१ अशा जागा सेनेला जिंकता आल्या आणि २००९ मध्ये सेनेने ३ जागा लढवल्या आणि २ जागांवर विजय मिळवला. तर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकी एक-एक जागा सेनेला जिंकता आली. 

हिंगोली : १९९० मध्ये सेनेने १ जागा लढवली आणि जिंकून आणली. त्यानंतर १९९५ मध्ये एक जागा लढवली जी जिंकता आली नाही. १९९९ मध्ये १ जागा लढवली आणि तीही जिंकून आणता आली नाही. त्यांनतर २००४ आणि २००९ मध्ये २ जागा लढवल्या मात्र २००४ मध्ये १ जागा जिंकून आणली तेच २००९ मध्ये सेनेला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र २०१४ ला आणि २०१९ ला सेनेला येथे अनुक्रमे १-१ जागा जिंकता आली.

उस्मानाबाद : १९९० मध्ये ४ जागा लढवल्या त्यात एकही जागा जिंकता आली नाही. १९९५ मध्ये ५ जागा लढवल्या त्यात ३ जागा जिंकल्या, १९९९ मध्ये ५ पैकी २ जागा जिंकल्या, २००४ मध्ये ४ जागा लढवल्या त्यात २ जागा जिंकल्याचा तर २००९ मध्ये ३ जागा लढवल्या २ जागा जिंकल्या. २०१४ च्या सालात सेनेने इथे १ चा जागा जिंकली तर २०१९ मध्ये ३ जागा जिंकून आणल्या.  सद्या या जिल्ह्यात सेनेचे ३ आमदार आणि १ खासदार एवढी ताकद आहे.

तसेच शिवसेनेच्या मिशन मराठवाडा अंतर्गत “शिवसंपर्क अभियान” महत्वाचं ठरणार आहे आणि या अभियानात सेनेच्या जिल्हानिहाय संपर्कप्रमुखांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यानुसार,

औरंगाबाद जिल्ह्याचे विनोद घोसाळकर हे संपर्कप्रमुख आहेत ज्यांची ८ वर्षांपूर्वी नेमणूक झाली होती. तर लातूरचे संपर्क प्रमुख संजय मोरे हे आहेत जे ठाण्याचे माजी महापौर होते. तर उस्मानाबाद जिल्ह्याला तानाजी सावंत यांच्या रूपाने चांगला खमक्या नेता संपर्क प्रमुख म्हणून मिळाला आहे.

परभणी जिल्ह्यासाठी अलीकडेच राजेंद्र साप्ते यांची संपर्क प्रमुख म्हणून निवड झाली आहे. तर हिंगोली, नांदेड आणि बीड या जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख म्हणून मुलुंडच्या आनंद जाधव यांच्याकडे आहे…

मात्र अशीही माहिती मिळतेय की, “मिशन मराठवाडा” नुसार आता नवे संपर्क प्रमुख नेमले जाणार, शिवसेनेचं ‘मिशन मराठवाडा’ नुसार,

उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे,

पूर्वी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या जिल्ह्यांवर पक्ष विशेष लक्ष घालणार आहे. तसेच नांदेड-परभणी -जालना या जिल्हे सेना काबीज करणार आहे. थोडक्यात मराठवाड्यात पक्ष वाढीवर स्वतः मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे आमदार, खासदार कष्ट घेणार आहेत.

मिशन मराठवाडा कितीपत यशस्वी होणार आहे हे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये कळेलच. तसेच येत्या ८ जूनला होणाऱ्या औरंगाबाद येथील उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर या मिशनला खरी सुरुवात होईल, त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या फॉर्म्युल्याचा वापर करण्याचा मास्टर प्लॅन आखला आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.