सुसाईड हल्यात ३५ विद्यार्थी मृत्युमुखी पडलेत, पण हजरांचे शोषण वर्षानुवर्षे चालू आहे

काज अकॅडमीमध्ये परीक्षेचा दिवस होता. कॉलेजमधून युनिव्हर्सिटीला जाण्याच्या आधीची एक महत्वपूर्ण परीक्षा होती अगदी आपल्याकडे १२ वीचे बोर्डाचे पेपर असतात तसे. शाळेत विद्यार्थ्यांबरोबर पालकांची देखील गर्दी होती.

मात्र क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आणि ३५ विद्यार्थी मृत्युमुखी पडले.

आत्मघातकी हल्लेखोराने शाळेवर हल्ला केला आणि निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेला. काज अकॅडमी खाजगी शाळा होती अफगाणिस्तानातील काबूलमध्ये आणि त्यातही हजारा समाजाचं वास्तव्य असलेल्या भागात. त्यामुळे सुन्नी कट्टरतावाद्यांनी केलेला हा हल्ला असणार हे फिक्स होतं. 

जवळपास १०० वर्षांपासून अफगाणीस्तानात हजरा समाजाला शोषणाचा सामना करावा लागले आहे आणि त्यांच्यावरील हे हल्ले नित्याची बाब झाली आहे. 

आज हजरा कम्युनिटी जगातील सगळ्यात शोषित कम्युनिटीपैकी एक आहे. हजरा हे अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या वांशिक अल्पसंख्यांकांपैकी एक आहेत. अफगाणिस्तानच्या 30 दशलक्ष लोकसंख्येपैकी 20 टक्के लोकसंख्या हजरा कम्युनिटीच्या लोकांची आहे. हजरा हे मंगोल साम्राज्याचा संस्थापक चंगेज खान आणि १३व्या शतकात या प्रदेशात घुसलेल्या मंगोल सैनिकांचे वंशज असल्याच सांगितलं जातं. 

दिसायला आशियायी चेहऱ्याचे आणि भाषा मात्र पर्शियन या गोष्टी हजारांना अफगाणिस्तानातल्या बाकी समुदायापेक्षा विशेषतः बहुसंख्य पश्तून समुदायापासून एक वेगळी ओळख देतात.  

मात्र हजरा समुदायावरील अन्यायाला कारणेभूत ठरणारी गोष्ट म्हणजे त्यांचं शिया मुस्लिम असणं. हजरा हे प्रामुख्याने शिया मुस्लिम असले तरी बहुतांश अफगाण लोक इस्लामच्या सुन्नी पंथाचं पालन करतात.

त्यामुळे सुन्नी कट्टरतावाद्यांनी अफगाणिस्तानात नेहमीच शिया हजरांची अक्षरशः कत्तल केली आहे.  हजारा लोकांनी पश्तून शासक आणि सरकारांकडून गुलामगिरी, वडिलोपार्जित घरे आणि जमिनींमधून पद्धतशीरपणे हकालपट्टी आणि नरसंहार यासह विविध प्रकारचे अत्याचार सहन केले आहेत. या अनुभवांमुळे हजारांना “जगातील सर्वात छळले गेलेले लोक”  देखील म्हटलं जातं.

२०व्या शतकापासूनच हजरांच्या शोषणाला सुरवात झाली होती. 

१९०० मध्ये जिथं हजरा लोकं बहुसंख्य होते ते हजराजात पश्तुन राजा अबूर रेहमान याने जिंकून अफगाणिस्तानला जोडला. त्याने हा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर मध्य आशियातिल सर्व शिया धर्मियांना मारून टाकण्याचं फर्मान काढलं होतं आणि तो ठरला होत हजरांचा पहिला नरसंहार ज्यामध्ये हजारो हजरांची हत्या करण्यात आली होती. हजरांची जवळपास ६०% लोकसंख्या या नरसंहारात संपून गेल्याचं सांगण्यात येतं.

मात्र नंतरच्या दशकताही हजरांवरील अत्याचार कमी झाले नाहीत. १९७० पर्यंत आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही सुविधांपासून हजारांना वंचित ठेवलं होतं. मात्र सोव्हिएत रशियाच्या काळात हजरांपर्यंत सुविधा पोहचल्या होत्या. याकाळात हजरांनी संघटित होत त्यांच्या सशस्त्र संघटना देखील बनवल्या. मात्र १९९३ मध्ये काबूलच्या शिया-बहुल भागात हजरा सशस्त्र गटांनी घेतलेल्या पोझिशन्समुळे चिंतेत असलेले अध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी यांनी त्यांच्या विरोधात आक्रमक स्टॅन्ड घेतला आणि पुन्हा हजरा मुस्लिमांवरील अत्याचाराला सुरवात झाली.

२००१ मध्ये अमेरिकेने अपघाणीस्तानमधील तालिबान राजवट उलथून टाकल्यानंतर हजरांची परिस्तिथी थोड्याफार प्रमाणात सुधरायला सुरवात झाली. 

२००१ च्या बॉन परिषदेत जेव्हा अफगाणिस्तानात तालिबानोत्तर शासन स्थापन केले जात होते, तेव्हा हजारा लोक देशाच्या लोकसंख्येच्या 19 टक्के असल्याचा अंदाज होता. तरीही पुढील वर्षांमध्ये त्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार सत्तेतील वाटा मिळालाच नाही.

2001 नंतर हजारा लोकांनाही तालिबान आणि इतर सशस्त्र गटांकडून पुन्हा हिंसाचार सहन करावा लागला. 2015 पासून तर इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत या इसिसच्या ब्रँचच्या उदयाने तर हजरांवरील हल्यात नव्याने वाढ झाली. आत्मघातकी हल्लेखोरांनी हजारा परिसरातील शाळा, मशिदी आणि अगदी रुग्णालयांना देखील लक्ष केलं गेलं.

तालिबानच्या येण्याने तर इतक्या दिवस हजरा समजणे जी थोडीफार सुधारणा केली होती ती पूर्णपणे धुळीस मिळाली. तालिबानच्या राज्यात हजरांवर हिंसाचार वाढलेला दिसतो. काबूलमध्ये झालेला बॉम्बस्फोट त्याचंच एक उदाहरण म्हणता येइल.

त्यामुळे आज अफगाणिस्तान सोडण्यामध्ये हजरा कम्युनिटीच पुढं असल्याचं सांगितलं जातं. 

युरोप आणि इतर प्रगत देशांमध्ये हजरा कम्युनिटीच्या अफगाण स्तलांतरितांची संख्या सर्वाधिक आहे.  अफगाणिस्तानच्या शेजारीच असलेल्या शियाबहुल इराणकडून हजरांना अपेक्षा होत्या. मात्र इराणानेही अनेकदा हात वर केलेले दिसतात.

त्यामुळे एकतर देशाबाहेर स्थलांतरित होणे किंवा देशात राहूनच स्तलांतरितांच जीवन जगणे एव्हडाच ऑप्शन आज हजरा कम्युनिटीच्या पुढे आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.