३५० वर्षांपूर्वी मराठ्यांचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकावर आंतरराष्ट्रीय खटला भरला होता

छत्रपती शिवाजी महाराज, मराठ्यांचे स्वराज्य आणि त्यांच्या समकालीन नोंदी यांचा मागील शंभर-दीडशे वर्षांपासून भारतभर अभ्यास सुरू आहे. कित्येक संशोधकांनी-अभ्यासकांनी अनेक साधनांचा अभ्यास करून अपरिचित माहिती उजेडात आणली, मराठ्यांच्या इतिहासाची दुर्लक्षित बाजू समोर आणली. यांमध्ये अनेक परकीय प्रवाशांनी लिहिलेल्या डायऱ्या, पत्रे, नोंदी कामी आल्या. हेन्री ओक्झेंडनची डायरी असेल, स्टीफन उस्टिक, फ्रांस्वा मार्टिन, कॉस्मा दी गार्डा, हर्बर्ट डी यागर, अबे कॅरे अशी कितीतरी परकीय नावे आपल्याला सांगता येतील.

असाच एक परकीय प्रवासी होता ‘निकोलाओ मनूची’.

इटलीच्या व्हेनिस शहराचा रहिवासी. गुपचूप भारतात पळून आलेला आणि मृत्यूपर्यंत भारतातच राहिलेला एक परदेशी. या निकोलाओ मनूची ने ‘स्टोरीआ दी मोगोर’ नावाने एक ग्रंथ लिहिला. मुघल, मराठे, आदिलशाही, गोवळकोंडा आणि भारताच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक परिस्थितीचा आढावा त्याने आपल्या लिखाणातून घेतला. याच पुस्तकाची ही गोष्ट..

मनूची मुघल दरबारात ‘वैद्य’ म्हणून कार्यरत होता. मुघलांनी इसवी सन 1664-65 च्या दरम्यान महाराष्ट्रावर आक्रमण केले. मिर्झा राजा जयसिंग, दिलेरखान भलीमोठी फौज घेऊन दख्खनेत उतरले. मिर्झा राजेसोबत मनूची सुद्धा महाराष्ट्रात आला. पुरंदरच्या पायथ्यालाच त्याची आणि शिवाजी महाराजांची पहिल्यांदा भेट झाली. या भेटीचे वर्णन करताना मनूची म्हणतो,

“माझ्यावर सोपवलेल्या कामगिरीवरून मी (मनूची) परतलो. नंतर थोड्याच दिवसांनी शिवाजी शरण येऊन आमच्या छावणीत दाखल झाला. जयसिंगच्या इच्छेप्रमाणे मी त्याच्याशी रात्री गप्पा मारण्याकरिता आणि गंजिफा खेळण्याकरिता जात असे. एके रात्री मी, जयसिंग आणि त्याचा ब्राम्हण कारभारी खेळत असताना शिवाजी तंबूत आला. त्याबरोबर आम्ही सर्वजन उठून उभा राहिलो.

एक अपरिचित आणि कधीही न पाहिलेला असा सुदृढ बांध्याचा तरुण, अशा दृष्टीने मजकडे पाहिल्यावर मी कोणत्या देशाचा राजा आहे, अशी जयसिंगकडे पृच्छा केली. मी एक फिरंगी राजा आहे, असे जयसिंगने उत्तर दिले. हे ऐकून त्याला फार नवल वाटले. शिवाजी म्हणाला,

‘अनेक फिरंगी माझ्या नोकरीत आहेत. परंतु त्यांचा हा रुबाब नसतो.’

शिवाजीला मी युरोपियन राजांविषयी माहिती करून दिली. शिवाजी समजूत अशी, की युरोपमध्ये पोर्तुगालच्या राजाच्या बरोबरचा मोठा राजा कुणी नसावा. मी आमच्या धर्माविषयीही त्याला बोललो.

आंतरराष्ट्रीय पातळीवर काय काय गोष्टी घडतात, याची माहिती ठेवणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विलक्षण प्रतिभेची ओळख या मनूचीमुळेच आपल्याला होते.

मिर्झाराजेंच्या मृत्यूनंतर मनूची काही काळ मुघलांच्या दरबारात कार्यरत होता. तिथून तो दक्षिणेत पळून आला. सुरत, दादरा-नगर हवेली, मुंबई, औरंगाबाद, गोवा, गोवळकोंडा आणि मग तामिळनाडू असा त्याचा पूर्ण प्रवास होत गेला.

गोव्याचा गव्हर्नर ‘कार्डो डी अल्वारो’ हा फ्रेंच गव्हर्नर मार्टिनचा खास मित्र होता. मनूची आणि मार्टिन हे सुद्धा चांगले मित्र असल्यामुळे मार्टिनने मनूचीस गोव्याला पाठवले. तिकडे मुक्कामी असताना मनूची दोन वेळेस संभाजी महाराजांना भेटला, पोर्तुगीज वकील म्हणून. ही आश्चर्यकारक बाब आहे. एका परकीय व्यक्तीने, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली त्यानेच संभाजी महाराजांची सुद्धा त्यांच्या कार्यकाळात भेट घ्यावी, ही तशी दुर्मिळ बाब म्हणायला हवी.

इसवी सन 1687-88 ला दक्षिणेत प्रचंड राजकीय उलथापालथ झाली. औरंगजेबाचे दक्षिणेत झालेले आक्रमण आणि गोवळकोंडा, विजापूर सारख्या राज्याचा झालेला नाश यामुळे मनूची अस्वस्थ झाला. आपण लिखाण करून ठेवलेले कागद आणि काही महत्वाची चित्रे यांना कोणताही धोका पोहोचू नये म्हणून मनूचीने मार्टिनच्या साहाय्याने आपलं सगळं मौल्यवान साहित्य व्हेनिस ला पाठवण्याचे ठरवले.

मनुचीने त्याचे ‘स्टोरिया दि मोगोर’ हे पुस्तक दोन भाषांमध्ये लिहीले, काही भाग इटालियन तर काही पोर्तुगीज भाषेत. परंतू, त्याच्या हयातीतच एका जेस्युईट संपादकाने हस्तगत केले. ‘पेअर फ़्रान्सिओ कात्रू’ याने ग्रंथाचे संपादन केले. मनुचीच्या परस्पर हा ग्रंथ “मोगल साम्राज्याचा, त्याच्या स्थापनेपासून सामान्य इतिहास, व्हेनिसचा रहिवासी मनुची, याच्या आठवणीवर आधारीत” या नावाने प्रकाशित झाला.

हा ग्रंथ फ्रान्सचा राजा १४ वा लुई याच्या नातवाला अर्पण करण्यात आला.

या एका पुस्तकावरून सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये भरपूर राजकारण झाले. कात्रूने सदरील ग्रंथ इसवी सन १७०५ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित केला. त्याची एक कॉपी भेट म्हणून मनुचीला त्याने स्वता पाठवली. आपल्या परस्पर हा ग्रंथ दुसऱ्या कुणीतरी प्रकाशित केला, ते सुद्धा स्वतःच्या नावाने, या गोष्टीचा मनुचीला प्रचंड राग आला.

मनूचीने कात्रुला जेव्हा या गोष्टीचा जाब विचारला तेव्हा ‘मला हे हस्तलिखीत पोन्डिचेरीच्या देलांदे नावाच्या अधिकाऱ्याकडून प्राप्त झाले. हे हस्तलिखित १७०१ मध्येच युरोपात पोहोचले होते.’ असे उत्तर दिले.

एवढेच कशाला, पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुद्धा त्याने हीच गोष्ट मांडली होती.

मनुचीला आपल्या हस्तलिखीताचा गैरवापर झाल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ आपल्या ग्रंथाचा भाग १, भाग २, भाग ३ आणि चौथ्या भागाची काही पाने युरोपात पाठवण्याचे ठरवले आणि सन १७०६ साली त्याची हस्तलिखिते युरोपात जाऊन पोहोचली. आपल्याजवळ असणारे हस्तलिखीत ‘एफ. युसेबिअस’ नावाच्या एका फादर कडे सोपवले. त्या फादरने सगळ्या गोष्टी पॅरिसमध्ये असणाऱ्या व्हेनिसच्या राजदूताकडे, म्हणजेच टीएपोलो कडे पाठवले. आणि टीएपोलोकडून हे हस्तलिखित त्याच्या देशात म्हणजेच व्हेनिसला जाऊन पोहोचले.

कात्रुने केलेल्या या गोष्टीवर कारवाई व्हावी अशी मनूचीची इच्छा होती. त्याने व्हेनिसच्या राज्यसभेला (सिनेट) लॅटिन भाषेत पत्र लिहून आपल्यावर नेमका कशाप्रकारे अन्याय झाला आहे याची माहिती दिली.

सतराव्या शतकात दुसर्याने लिहिलेले साहित्य त्या लेखकाच्या परवानगी विना परस्पर छापणे हा प्रचंड मोठा गुन्हा होता. कात्रु आणि मनूचीचा वाद मिटवण्यासाठी एक नवीन समिती स्थापन करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा खटला भरवण्यात आला, कारण मनूची हा तेव्हा भारतात, पोंडीचेरी मध्ये मुक्कामी होता.

मराठ्यांनी मुघलांशी दिलेला लढा, मराठ्यांच्या शौर्याची महती सांगणारा हा महत्वाचा ग्रंथ.. आणि त्याच्या अधिकारासाठी लेखकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उठवलेला आवाज, एक पुस्तक स्वतःच्या नावे प्रकाशित व्हावे म्हणून धडपडणाऱ्या दोन व्यक्ती आणि त्यातून घडलेला इतिहास.. सारं काही विस्मयकारक आहे.

मनूचीच्या या प्रकरणात नीट लक्षपूर्वक पाहिले तर एक गोष्ट जाणवते.. आजही जगभरात कित्येक ‘फादर कात्रु’ नामक जेस्युईट लेखक-संपादक आहेत जे दुसऱ्यांचे साहित्य, दुसऱ्यांचे लिखाण स्वतःच्या नावे खपवतात. इतिहासाची परंपरा जोपासण्यातला हा सुद्धा एक प्रकार आहे.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.