शिवरायांनी ३५० वर्षापूर्वी उभारलेला हा पूल त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत भक्कमपणे उभा आहे.
शिवकाळात जावळीला वाघाची जाळी म्हणून ओळखलं जायचं. सावित्री नदीच्या मुखापासून ते उगमापर्यत दूरवर पसरलेला हा प्रदेश. घाटावरून कोकणाला जोडणारा हा भाग कोयना नदी नीरानदीच्या खोऱ्यामुळे निबीड जंगलाचा बनला होता. या महाबिकट मुलुखावर इथल्या जंगलावर राज्य करणे म्हणजे त्याला वाघाचं काळीजच पाहिजे. यामुळेच इथे राज्य करणारा चंद्रराव मोरे म्हणायचा ,
“येता जावळी जाता गोवळी”.
सामरिकदृष्टया महत्वाचं असलेलं हे खोरं स्वराज्यात असाव ही महाराजांची इच्छा होती. चंद्रराव मोरे हा आदिलशाहचा मांडलिक होता. त्याच्या भाऊबंदकीच्या लढाईत शिवरायांनी त्याला पाठींबा देऊन जावळीच्या गादीवर बसवले होतं. शिवरायांनी त्याला स्वराज्याचरणी आपली निष्ठा वाहण्यास सांगितले.
पण चंद्रराव मोरे कृतघ्न निघाला. त्याने शिवरायांना मुजोर पत्र लिहिले,
“तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले? आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर! त्याच्या आणि बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. जावळीत याल तर एकही माणूस परत जाणार नाही.”
हे पत्र वाचल्यावर महाराजांच्या संतापाचा कडेलोट झाला. स्वकीयांविरुद्ध लढणे त्यांना पसंत नव्हते पण आता तरणोपाय नव्हता. राजगडावरून हुकुम सुटले. कान्होजी जेधे , हैबतराव शिळीमकर, नांदलनाईक असे मराठा वीर जावळीत उतरले.
खुद्द महाराज दहा हजारांची फौज घेऊन जावळीला आले. पराक्रमाची पराकाष्ठा केली. चंद्रराव मोऱ्यांचा गर्व ठेचून काढला. तो जावळी खाली करून पळून गेला. या खोऱ्यातले चंद्रगड, मकरंदगड, चांभारगड असे अनेक किल्ले स्वराज्यात सामील झाले.
हा भाग बिकट होता पण तो अजिंक्य बनवायचं महाराजांनी ठरवलं. यासाठी पारघाटाच्या नाकासमोरच्या भोरप्या डोंगरावर तटबुरुजांचे शेलापागोटे चढवून किल्ला बांधायचा निर्णय झाला.
या किल्ल्याचं बांधकाम शिवरायांचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली सुरु झालं.
महाबळेश्वरमध्ये उगम पावणारी कोयनानदी डोंगर दऱ्या उतरून घोंगावत या भागात येते. इथे कायम होणाऱ्या मुसळधार पावसाने ही नदी कायम दुथडी भरून वाहत असते.
जावळी ताब्यात आल्यावर महाराजांनी या भागाची पाहणी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या कोयना नदीवर एक मजबूत पूल बांधला तर येथे राहत असणाऱ्या अनेकांचं जगणं सुसह्य होईल. जावळीखोऱ्याला आजूबाजूच्या प्रांताशी जोडता येईल. स्वराज्याच्या मावळ्यांना या भागात देखरेखीस फिरणे सोपे होईल.
शिवाजी महाराजांनी अर्जोजी यादव यास भोरप्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पारगावात कोयना नदीवर पूल बांधायचं काम सोपवलं. काळ्या कातळामध्ये हा सेतू उभारण्याच काम सुरु झालं. आदिलशहाला लक्षात आलं हा किल्ला आणि हा पूल जर उभा राहिला तर जावळी कधीच शिवाजी महाराजांच्या ताब्यातून काढून घेता येणार नाही. त्याने खटावच्या सुभेदाराला या कामात अडथळा आणण्यास पाठवले. तरीही अर्जोजी यांनी पूलाच काम थांबवल नाही.
अवघ्या काही महिन्यात अस्मानी आणि सुलतानी संकटावर मात करत हा चार कमानी आणि पाच खांबावर उभा असलेला पूल उभारण्यात आला. याची लांबी जवळपास ५२ मीटर , उंची १५ मीटर आणि रुंदी आठ मीटर आहे. या पुलाचा प्रत्येक दगड काटकोनात घडवलेला आहे. जेव्हढा हा पूल शिवकाळातील सौंदर्याची साक्ष देतो तितकाच तो मजबूत आहे.
१६५६ साली प्रतापगड तयार झाला. हा किल्ला आणि पारगावचा तो पूल निर्माण झाल्यावर घाटावरून कोकणात जाण्याच दळणवळण सुरक्षित झालं.
स्वराज्याच्या हृदयात असलेला हा किल्ला सर करणे कोणालाच शक्य झाले नाही. यामुळेच अफझलखान जेव्हा शिवाजी महाराजांना चढ्या घोड्यानिशी उचलून आणतो असा विडा उचलून महाराष्ट्रात आला. तेव्हा त्याला चक्रव्यूहात अडकवण्यासाठी शिवरायांनी याच प्रतापगडाची निवड केली. त्याला व त्याच्या प्रचंड आदिलशाही सैन्याला याच जावळीच्या जंगलात गाडले. पुढे अनेक पिढ्या या भागाकडे डोळे वटारून पाहण्याची हिमंत कोणाची झाली नाही.
प्रत्येक क्षणाला आपल्या रयतेची काळजी करणारा तो जाणता राजा होता. त्यांनी दूरदृष्टीने उभारलेल्या या पुलाचा उपयोग कित्येक पिढ्यांच्या नंतर आपण ही करत आहोत. एकेकाळी भीमथडीच्या घोडीचा वावर पाहिलेल्या या पूलाच्या अंगावरून अत्याधुनिक मोटारी प्रवास करत आहेत. जवळपास साडेतीनशे वर्ष झाली तरी या पुलाचा एक दगडही जागेवरून हलला नाही.
आजकालच्या दलाल आणि राज्यकर्ते यांच्या साटेलोटे असणाऱ्या काळात काही वेळा पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वी पूल कोसळतात. रोज वेगवेगळे घोटाळे समोर येतात आणि या घोटाळ्यांमुळे मोठमोठे अपघात घडतात. छत्रपतींचा आदर्श बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी अशा या घटना म्हणजे कलंक आहेत.
शिवरायांचे जर खरे स्मरण करावयाचे असेल पुतळे स्मारके बांधण्याबरोबरचं असे पिढ्यानुपिढ्या टिकणारे पूल, धरणे,कालवे अशा सर्वसामान्य जनतेला जगणे सुसह्य करणाऱ्या वास्तू उभारल्या जाव्या आणि त्यांची योग्य देखभाल केली जावी हे मत जाणते लोक व्यक्त करताना दिसतात.
हे ही वाच भिडू.
- धर्मकार्य की शेतकऱ्यांचा मालाला योग्य बाजारभाव, शिवरायांनी घेतला होता हा निर्णय..
- हिरोजी म्हणाले, दुर्गावर येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या चरणकमलाचे दर्शन व्हावे हेच आमचे बक्षीस.
- असा झाला होता संभाजी महाराजांचा राज्याभिषेक.