प्रेम हे अनेकवचनी असतं हे सांगणारा प्रेमम.

ही फिल्मच मुळी समकालीन असल्याने मी या फिल्मशी प्रचंड रिलेट करतोय. कॉलेजमध्ये असताना कितीदा प्रेमभंग झाला असेल, याची गणती नसणारेच अधिक असतात ! पण प्रत्येकीवरचं प्रेम हे सीरियस कॅटॅगरीतलंच असतं! ते भंगल्यावर काळजात गलबलणे, रडणे, बंडखोर होत स्त्री जातीचा मनस्वी तिरस्कार करणं, आणि महिन्याभराच्या आत पुन्हा एखादी बट किंवा वेणीतला गजरा आवडला.की त्यावर भाळणं, पुन्हा आकंठ प्रेमात बुडणं…

कोणत्याही सामान्य मुलाच्या आयुष्यातले तीन टप्पे हीच प्रेममची स्टोरी आहे !

२००४ चा काळ..

जॉर्ज डेव्हीड हा ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा. कोया आणि शंभू हे त्याचे जिगरी मित्र. जॉर्ज त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या “मेरी”च्या प्रेमात पडतो. तिला प्रपोज करण्याची स्वप्ने पाहतो ! एके दिवशी लव्हलेटर घेऊनही जातो ! त्याच वेळी मेरी तिच्या बॉयफ्रेंडची ओळख करुन देते. उलट आपल्या दोघांची फोनवरुन बातचित करुन देण्यासाठी जॉर्जकडे आग्रह धरते. (जॉर्जचं नशीब बघा किती फुटकं. तिच्या बॉयफ्रेंडचं नावही जॉर्जच) पहिल्याच प्रेमात ठेच लागलेला मजनू तिची मदत करतो (तिचे सुख, हेच माझे प्रेम वगैरे टिपिकल).

Screenshot 2019 05 29 at 8.50.27 PM

पोरीच्या नादात कॉलेज बोंबलतं ! तिघेही नापास….

स्टोरी चार वर्षे पुढे सरकते…

२००८ चा काळ. 

प्रेमापासून दूर गेलेले तिघे बीएससीपर्यंत मजल मारतात. कॉलेजमधल्या वर्चस्वावरुन दुश्मन गॅंगलाही मारतात. कॉम्रेड होतात. दुनियेला फाट्यावर मारुन जगण्याचा इरादा. एका हातात सिगरेट… दुसऱ्या हातात दारु…. आणि कॉलेजमध्ये नुस्ती फोडाफोडी
पण जॉर्जच्या आयुष्यात आणखी एक चेहरा येतो….

मलर………………………………………………………………………………………………………………………………………………………………

वरचे पूर्णविराम हे फक्त “मलर”साठी का आहेत, हे फिल्म पाहिल्यानंतर कळेल. तर मलर ही जॉर्जची गेस्ट लेक्चरर आहे. जॉर्ज हा पहिल्या नजरेत प्रेमात पडणारा माणूस आहे. तेव्हा इथेही तो घायाळ होतोच….

Screenshot 2019 05 29 at 8.49.30 PM

योगायोगाने वर्गात दारु पिणारे जॉर्ज, कोया, शंभू हे तिघेही मलर मॅडमच्या हाती लागतात. तरीही मलरच्या मनातही जॉर्जबद्दल सॉफ्ट कॉर्नर. पण का? ते कळत नाही. मॅडम दारु पिल्याची तक्रार न करणं, मंदिरात गजरे घेऊन जॉर्जला बोलावणं, त्याच्या गॅदरिंगचा डान्स बसवणं, फोन नंबर देणं, मेसेज पाठवणं.  जॉर्जसाठी हे सगळे ग्रीन सिग्नल असतात. पण सुट्ट्यांच्या निमित्ताने मलर जाते ती परत येत नाही ! का? ते मी सांगणार नाही… अन्यथा रसभंग होईल…
पुन्हा एकदा विरह… पुन्हा एकदा जॉर्ज देवदासच्या भूमिकेत…

फिल्म पुढे सरकते….
२०१४ चा काळ…

जॉर्ज आता सेटल झालाय. त्याने केक शॉप सरु केलय. त्याच केक शॉपमध्ये एक तरुणी येते. तिचं नाव “सेलिन”.आपल्या जॉर्जमधला प्रेमी पुन्हा जागा होतो. बिचारा प्रपोज करतो. पण दुसऱ्याच आठवड्यात तिची एंगेजमेंट असते. आपल्या जॉर्जचा पुन्हा मजनू होतो. पण तिसऱ्या स्टोरीत असा काही ट्विस्ट येतो…

Screenshot 2019 05 29 at 8.51.59 PM

की जॉर्जवरचा देवदास हा शिक्का पुसला जातो ! कसा ? हेही सांगितलं तर उत्कटता हरवून जाईल !

पण सगळ्यात मोठा धक्का हा फिल्मच्या क्लायमॅक्सला आहे! तो जाणून घ्यायचा असेल… तर नक्की पाहा…. प्रेमम… 

जॉर्जच्या भूमिकेत निवीन पॉली:

हा माणूस जाम भारी आहे राव! तीन वेगवेगळ्या कालखंडातल्या जॉर्जची भूमिका साकारताना तीन वेगवेगळी माणसं तो समोर उभी करतो…
ज्युनियर कॉलेजमधला अवखळपणा. सिनियर कॉलेजमधली भाईगिरी. आणि प्रोफेशनल लाईफमधला सेटल्ड माणूस त्याने सहज साकारला आहे. (त्याच्या दाढीने तर मी माझ्या दाढीला वस्तारा लावण्याचा बेत रद्द केला)

मलर साकारणारी साई पल्लवी :

जिच्यावर जीव ओवाळून टाकावा अशी ॲक्ट्रेस बऱ्याचं वर्षांनी दिसली. तिच्या डोळ्यांमध्येच काहीतरी जादू आहे! जाऊद्या… वर्णन अशक्य आहे!

कॅमेरा :

या फिल्ममधलं सगळ्यात महत्त्वाचं पात्र आहे तो म्हणजे कॅमेरा! विशेष म्हणजे सगळं चित्रीकरण हे हॅंडी केलं आहे! त्यामुळे कॅमेऱ्याच्या जागी आपणच आहोत असा भास होतो! आलुवा नदीत चित्रित केलेलं गाणं असो, सरबतात लिंबू पिळतानाचा सीन असो…. मलरची वाट पाहताना… तेजाळणारे दिवे असोत! “मलरे” गाणं असो… गॅदरिंगच्या डान्सची प्रॅक्टिस असो… किंवा केक खाणारी “सेलिन”….प्रत्येक फ्रेम प्रेमात पाडणारी….

तळ टीप : तिने असं का केलं? हा प्रश्न घेऊन आपण फिल्ममधून बाहेर पडतो! पण शेवटपर्यंत उत्तर मिळत नाही! कारण दिग्दर्शिकाने ते प्रेक्षकांवर सोडलय! त्यामुळे भूतकाळातल्या मलर आठवून डोक्याला ताप होणार आहे, हे ध्यानात घेऊनच आपापल्या रिस्कवर फिल्म पाहावी. 

अख्खा पिक्चर जॉर्ज, मलर आणि कॅमेरा. यांच्या भोवतीच गुंफलेला. पुन्हा पुन्हा प्रेमात पडायला शिकवणारा!

  •  राहूल खिचडी 
Leave A Reply

Your email address will not be published.