महिलांविरोधातील गुन्हेगारीत भाजप नेते आघाडीवर- एडीआरचा अहवाल 

मोठ्या थाटात ‘बहोत हुआ नारी पर वार, अब की बार मोदी सरकार’ अशी ललकारी देत सत्तेत आलेल्या भाजपच्या नेत्यांपासूनच आता ‘बेटी बचाव’ करण्याची गरज निर्माण झाल्याची बाब ‘असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेच्या नुकत्याच प्रकाशित  अहवालातून समोर आली आहे.  सद्यस्थितीत लोकसभेचे आणि विविध राज्यातील विधानसभेचे सदस्य असणाऱ्या ४८ खासदार आणि आमदारांवर महिलांविरोधातील गुन्हे दाखल असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. विशेष म्हणजे महिलांविरोधी गुन्हे नावावर असणाऱ्या राजकारण्यांमध्ये  भाजपच्या नेत्यांनी आघाडी घेतली आहे. या यादीत समाविष्ट ४८ खासदार-आमदारांपैकी सर्वाधिक म्हणजे १२ लोकप्रतिनिधी भाजपचे आहेत. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं ७ लोकप्रतिनिधींसह या यादीत दुसरा क्रमांक पटकावण्याची धडाकेबाज कामगिरी पार पाडलीये, तर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस ६ नेत्यांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

काय आहे या अहवालात..?

या अहवालानुसार देशभरातील १ हजार ५८० आमदार- खासदारांपैकी ४८ जणांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बलात्कार,विनयभंग,अपहरण,मानवी तस्करी आणि कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आमदार आणि खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमधील माहितीचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे महिला अत्याचारांचे  गुन्हे असलेल्या या अहवालात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून राज्यातील १२ लोकप्रतिनिधींचा समावेश या ४८ जणांच्या यादीत आहे. म्हणजे या यादीतील २५ टक्के नेते महाराष्ट्रीयन आहेत. महाराष्ट्रा खालोखाल ११ लोकप्रतिनिधींसह पश्चिम बंगाल या यादीत दुसऱ्या तर ओडिशा आणि आंध्र प्रदेश हे प्रत्येकी ५ लोकप्रतिनिधींसह तिसऱ्या स्थानी आहेत.

गेल्या ५ वर्षात जवळपास सर्वच महत्वाच्या राजकीय पक्षांनी मिळून बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या २६ उमेदवारांना लोकसभा, राज्यसभा किंवा  राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाकडून उमेदवारी दिलीये तर हाच गुन्हा दाखल असलेल्या १४ जणांनी अपक्ष म्हणून या निवडणुका लढवल्यात. महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांना लोकसभा-राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यामध्ये देखील भाजपनेच आघाडी मिळवलीये. गेल्या ५ वर्षात भाजपने गुन्हे दाखल असणाऱ्या ४७ नेत्यांना आपल्या पक्षाची उमेदवारी दिलीये. या यादीत ३५ नेत्यांसह बहुजन समाज पार्टी दुसऱ्या तर २४ नेत्यांसह काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.