नगरच्या तुरुंगात घडलेल्या छत्रपतींच्या हत्येचे पडसाद ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उमटले होते

भोसले घराण्याच्या दोन गाद्या. एक सातारा आणि दुसरी कोल्हापूर. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई राणी यांनी कोल्हापूर गादीची स्थापना केली. औरंगजेबाशी लढा देण्याचा पराक्रम करणाऱ्या ताराराणी यांनी नानासाहेब पेशव्यासारख्या स्वकियांशी दोन हात करून कोल्हापूरची गादी राखली.

करवीरच्या या छत्रपती घराण्याला कर्तृत्वान राजकर्त्यांची परंपरा होती. यात राजाराम महाराज, संभाजीराजे दुसरे, शिवाजीराजे दुसरे असे छत्रपती होऊन गेले. याच शूर परंपरेतील आणि दूरदृष्टीचे आणखी एक महाराज म्हणजे

‘छत्रपती चौथे शिवाजी महाराज’.

राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांचे दत्तक आजोबा राजाराम महाराज छत्रपती यांचा परदेशातून परत येत असताना इटलीमधील फ्लॉरेन्स शहरात ३० नोव्हेंबर १८७० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांना पुत्र नसल्याने त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या गादीवर बसवण्यास योग्य अशा दत्तक पुत्राचा शोध सुरु झाला.

यासाठी एकूण सात मुलांची पाहणी झाली. या सात मुलांपैकी सावर्डेकर भोसले घराण्यातून दिनकराव भोसले सावर्डेकर यांचा मुलगा नारायणराव यांची निवड करण्यात आली. या केवळ साडे आठ वर्षाच्या मुलास छत्रपती राजाराम महाराज यांच्या ११ वर्षाच्या विधवा राणीसाहेब सकवारबाई यांच्या मांडीवर २३ ऑक्टोबर १८७१ रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्ताला दत्तक घेण्यात आले. 

राज्यभिषेक करुन चौथे शिवाजी महाराज कोल्हापुरचे छत्रपती झाले. हेच चौथे शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज छत्रपतींचे दत्तक वडील होते. 

छत्रपती चौथे शिवाजी महाराज अत्यंत बुद्धिमान आणि प्रकृतीने उत्तम असे होते. त्यांचा शांत स्वभाव पण भारदस्त वागण्यामुळे संस्थानात त्यांचा चांगला प्रभाव होता. वय कमी असलं तरी अत्यंत दूरदृष्टीचे महाराज म्हणून त्यांची ओळख होती. घोडेस्वारीसाठी ते विशेष प्रसिद्ध होते.

महाराजांना गादीवर येऊन ४ ते ५ वर्षच झाली असतील, तेव्हा साधारण १८७६ मध्ये भारतात बराच मोठा दुष्काळ पडला. यावेळी कोल्हापूर संस्थानसाठी त्यांनी घेतलेले निर्णय हे सर्वोत्तम उपाययोजनांपैकी एक होते. यात ठिकठिकाणी अन्नछत्रे उभारून त्यांनी जनतेला कोणत्याही परिस्थितीमध्ये उपाशी न ठेवता राजा प्रजेसाठी आधार कसा ठरू शकतो हे दाखवून दिले.

महाराजांच्या याच उपाययोजनांमुळे जानेवारी १८७७ मध्ये महाराणी व्हिक्टोरीया यांनी ‘नाईट कमांडर ऑफ दि स्टार ऑफ इंडीया’ हा किताब देऊन गौरव केला. पण पुढे काही दिवसांनी छत्रपतींनी हा सन्मान विनम्रपणे नाकारला.

छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांनी आपल्या कार्यकाळात कोल्हापुर संस्थानामध्ये दूरदृष्टी ठेवून अनेक विधायक कार्यांची सुरुवात केली. यातीलच काही गोष्टी आज कोल्हापूरच्या वैभवाची साक्ष देतात.

यात रंकाळा तलाव कामास सुरवात, पंचगंगा नदीवरील पुल उभारणी, रस्ते, नवीन राजवाडा, या गोष्टींची पायाभरणी झाली. 

एका बाजूने महाराजांची जनकल्याणाची कामे चालू असतानाच दुसऱ्या बाजूला त्यांनी इंग्रजांविरूध्द बंड पुकारले. त्यामुळे ब्रिटीशांनी १८७८ साली स्टेट कारभारी म्हणून महादेव बर्वे नावाच्या दिवाणजींची नेमणुक केली. त्यावेळी इंग्रजांचे राजकिय सल्लागार स्नायडर यांनाही बर्वेच्या सोबतीला पाठवले.

धूर्त आणि लाचार समजल्या जाणाऱ्या महादेव बर्वे यांनी थोड्या दिवसातच कोल्हापुर संस्थान खालसा करण्यासाठी स्नायडर यांच्या संगनमताने षडयंत्र रचायला सुरूवात केली.

याच षडयंत्राचा एक भाग म्हणून छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांना वेडे ठरवायला सुरूवात केली. तसेच ते वेडे असल्याची अफवा संस्थानामध्ये आपल्या साथीदारांच्या मदतीने पेरल्या जावू लागल्या. महाराजांना हा डाव लक्षात येताच त्यांनी या कटकारस्थानाविरूध्द लढा सुरु केला.

त्यामुळे महादेव बर्वे याने इंग्रजांच्या मदतीने महाराजांना कोल्हापुरातच बंदीस्त केले.

१८८२ मध्ये महाराजांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून हवापालटासाठी म्हणून त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातून अन्यत्र हलवले. त्यांना अत्यंत गुप्तपणे पुण्यामार्गे अहमदनगर येथील भुईकोट किल्लयात कैदी म्हणून नेले.

या किल्ल्यात त्यांना एकांतवासात ठेवण्यात आले. पत्नीलाही दूर ठेवण्यात आले. त्या भागात कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती. त्यांच्या सेवेला मल्हारी नावाचा एक सेवक देण्यात आला होता.

मानसिक छळ करून महाराजांना मनोरुग्ण ठरवण्याचा हा कट होता. महाराज तेव्हा अवघ्या १९ वर्षांचे होते. 

एकांतात ठेवल्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंबंधी बाहेर अनेक बातम्या येवू लागल्या. ब्रिटिश सार्जंट प्रायव्हेट ग्रीन महाराजांना बेदम झोडपून काढत असल्याचे समजू लागले. त्यांची छळवणूक अधिक वाढल्याचा बातम्या वारंवार बाहेर येत होत्या. त्यामुळे लोकांचा संताप अधिकच वाढू लागला. मात्र लोकांचे हात बांधले होते.

छळवणूक असह्य होऊन एक दिवस महाराजांनी धाडस करून ब्रिटिश सार्जंट ग्रीनला लक्ष्य केले. ताकदीने वरचढ असलेल्या ग्रीनने महाराजांना उचलुन खाली आपटले. महाराजांच्या पोटावर बुटाने बेदम मारहाण केली.

यातील एक बूट वर्मी बसला. प्लीहा फुटून महाराजांना तीव्र वेदना होवू लागल्या होत्या. त्यावेळी सेवक मल्हारीने धाव घेतली व महाराजांचे डोके आपल्या मांडीवर घेतले. महाराजांनी मल्हारीच्या मांडीवरच “जगदंब जगदंब” म्हणत प्राण सोडले,

तो दिवस होता २५ डिसेंबर १८८३.

छत्रपती चौथ्या शिवाजी महाराजांचे अवघ्या २० व्या वर्षी निधन झाले.

मराठ्यांचा राजा आपल्या ताब्यात असताना मारला गेला, हे समजले तर जनतेत मोठी खळबळ उडेल हे ब्रिटिशांच्या लक्षात आले. त्यांनी महाराजांचे पार्थिव शरीर कोल्हापूरला नेण्याऐवजी नगरमध्येच शहराबाहेरील जंगलात त्यांचे अंत्यसंस्कार उरकले. सोसायटी हायस्कूलमधील भोसले नावाच्या एक शिपायाकडून अग्नि देण्यात आला.

या कोल्हापूर प्रकरणावर लोकमान्य टिळकांनी केसरीत विविध लेख प्रसिद्ध केले. त्याबद्दल संपादक म्हणून टिळक आणि आगरकरांना डोंगरीच्या तुरुंगात १०१ दिवसांची शिक्षा झाली.

महाराजांच्या हत्येचा बोभाटा झाल्यानंतर इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही त्याचे पडसाद उमटले. मार्च १८८४ मध्ये पार्लमेंटमध्ये झालेल्या चर्चेत जॉन क्रॉस, रॉबर्ट टोरेन्स, जोसेफ ह्यूम आदींनी भाग घेतला. तथापि, खुनाचा प्रकार दडपण्यात येऊन दोषी व्यक्तींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तेव्हाच्या सरकारने केला.

पुढे गादीवर छत्रपती राजर्षी शाहू महाराज आले. त्यांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी अहमदनगर येथे येऊन आपल्या वडीलांच्या नावाने ‘श्री छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग हाऊस’ ची स्थापना केली व पुढे त्यांच्याच प्रेरणेतून १९१८ मध्ये अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था आज देखील कार्यरत आहे. 

आज रेसिडेन्शियल कॉलेजच्या समोर हुतात्मा स्मारक परिसरात छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची समाधी आणि पुर्णाकृती पुतळा पहायला मिळतो.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. यशवंत तोडमल says

    आम्ही गेल्या १२ वर्षांपासून स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो

Leave A Reply

Your email address will not be published.