बामणोली, ठोसेघर ते भंडारदरा : पुण्याच्या आसपास 5 पर्याय आहेत…!!!

काही जण असतात ज्यांना उन्हाची खूपच ऍलर्जी असते. अगदी घराच्या बाहेर पाय टाकण्याची तसदी देखील ते घेत नाहीत. पण जसा का पावसाळा लागतो, यांचे पाय घरात टिकून राहायला नको नको म्हणतात. शिवाय उन्हाळ्यातील लग्नाच्या सिजननंतर कित्येक जोडप्यांचा पहिला पावसाळा असतो म्हणून त्यांनाही बाहेर जायचं असतं…

तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर कॉलेज देखील सुरु झालेलं असतं, खूप दिवसांनी मित्रांना भेटलोय तेव्हा आता वर्षाची धम्माल सुरुवात कुठेतरी फिरायला जाऊन करणं फिक्स असतं, पण सगळ्या गाड्या अडतात त्या…

‘नक्की कुठे जावं’ इथे. 

म्हणूनच आम्ही अशी ५ ठिकाणं घेऊन आलो आहोत, जिथे चटकन तुम्ही जाऊन येऊ शकतात. एकतर हिरवळ, निसर्ग यामुळे पावसाळ्याचा पक्का फील तुम्हाला मिळेल आणि दुसरं म्हणजे फक्त एक नाही तर रस्त्यातील २-३ ठिकाणं आरामात फिरायला मिळतील, अशी ही ठिकाणं आहेत. बघुयात कोणती…

१. बामणोली

साताऱ्यापासून ५० किलोमीटर बामणोली नावाचं गाव आहे. कोयना धरणाने तयार झालेल्या शिवसागर तलावाच्या काठावर वसलेले हे गाव आहे. आजही मातीच्या, शेणाच्या घराचा अनुभव हे गाव तुम्हाला देईल. जुलै ते ऑक्टोबर हा भेट देण्यासाठीच सगळ्यात उत्तम काळ. बोटिंग हे इथलं मुख्य आकर्षण असून स्थानिक लोकांनी पर्यटकांना तापोळा, वासोटा किल्ला आणि नागेश्वर मंदिर अशा जवळपासच्या ठिकाणी जाण्यासाठी बोटिंगची सोय केलेली आहे. 

बामणोलीला गेल्यावर टिपिकल कांदा भजी खाण्यापेक्षा आम्ही सांगतो ते ऐका… दोन जन्म नाव काढाल…  बामणोलीत कुट्ट बी जा गरम तेलात  तळलेला आंबळी मासा डायरेक्ट तोंडात टाकायचा,  विषय खोल टेस्ट आहे…

तापोळा म्हणजे तर ‘मिनी काश्मीर’. हे ठिकाण आपल्या दुर्मिळ दृश्यांसाठी आणि नैसर्गिक लँडस्केपसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात हा पूर्ण परिसर हिरवळीने नटलेला असतो. शनिवार व रविवारच्या विकेंड ट्रीपसाठी बेस्ट ठिकाण आहे. इथे तुम्ही वेण्णा लेकमध्ये बोटिंग, आर्थर पॉइंटवर ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, स्विमिंग, फोटोग्राफी अशा गोष्टी इथे तुम्ही करू शकतात. 

शिवाय स्थानिक बाजारात शॉपिंग करणं, वेलोसिटी एम्यूजमेंट पार्क बघणं आणि नाईट कॅम्पिंग देखील करता येते. 

२.  ठोसेघर

बामणोलीला  गेलात आणि तिथून जवळ असलेले २-३ प्रसिद्ध ठिकाणं बघितले नाही तर काय बघितलं. पाहिलं ठिकाण लागतं ते ठोसेघर. कारण पावसाळा म्हणलं तर धबधबा मस्ट असतो. ठोसेघर धबधबा हा हंगामी धबधबा असल्याने पावसाळ्यात भरभरून वाहत असतो. महाराष्ट्रातील ठोसेघर धबधबा हा सर्वात मोठा आणि उंच धबधबा आहे. २० ते ५०० मीटर उंचीचे हे डोंगरमाथ्यावरील धबधबे पाहण्यासारखे आहेत. 

ट्रेकिंग, कॅम्पिंग, साईटसीइंग इथे करता येते. हे सगळं करत असताना वजराई वॉटरफॉलला जायला विसरू नका. हा वॉटरफॉल तीन टप्प्यात असून ८५३ फूट उंच आहे.

अजून एक सांगतो… तुमच्या ज्ञानात भर समजा… ज्यांना चांगला आणि हातसडीचा इंद्रायणी आवडतो त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांकडून इंद्रायणी भात घ्यायला विसरू नका, तेवढाच त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल. 

माघारी येताना सज्जनगड देखील तुम्ही बघू शकतात. शिवाय कास पठार उभंच आहे. 

वर्ल्ड हेरिटेज असणारं कास पठार बघायला लै खास.. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला वेगवेगळ्या फुलांनी या पठाराला आच्छादित केलेलं असतं. अनेक परदेशी पर्यटक सुद्धा खास ही फुलं बघायला, फोटो काढायला इथे येतात… पठार उतरून खाली गेलात की कास तलावाकडे जा. सोबत तुमची मैत्रीण असेल तर हातात हात पकडून मस्त पाण्यात पाय टाकून बसा. कासच्या पारदर्शी पाण्यात तुम्हाला आपल्या जोडीदारा सोबतचं भविष्य दिसेल, इतकं भारिय कास. 

आणि हो,  इथवर आलाय तर महाबळेश्वर का सोडावं? तिथे पण चक्कर मारून घ्यावीच. हे असं ठिकाण आहे ज्याबद्दल वेगळं सांगायची सुद्धा गरज नाहीये. 

३. पाचगणी

समुद्रसपाटीपासून सुमारे १,३३४ मीटर उंचीवर वसलेलं हे शहर उंच पर्वत, शांत दऱ्या, धबधबे आणि घनदाट जंगलांनी भरलेलं आहे. पाच मोठ्या टेकड्यांच्या नावावरून पाचगणी हे नाव या ठिकाणाला देण्यात आलंय. शांत, रोमँटिक, निसर्गरम्य आणि ऍडव्हेंचरने भरलेलं ठिकाण जर तुम्ही शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्याचसाठी आहे. 

सिडनी पॉईंट, टेबल लँड, राजपुरी लेणी आणि धोम धरण हे पाचगणीचं प्रमुख आकर्षण आहे. पॅराग्लायडिंग, रॉक क्लायम्बिंग, ट्रेकिंग, स्पीड बोटिंग आणि हॉर्स रायडिंग अशा अनेक गोष्टींचा अनुभव तुम्ही इथे घेऊ शकतात. हे सगळं करून झाल्यावर आठवणीने टेबल लॅंडला मस्त लिंबू लावून कणसावर ताव मारायला विसरू नका.

सिंगल लोकांनी जरा इकडं तिकडं नजर फिरवण्यापेक्षा ऍडव्हेंचरवर लक्ष द्या, कारण हनिमूनवाली गॅंग तुमचा सगळा मुड खराब करू शकतो.

४. भंडारदरा

सह्याद्री पर्वतरांगांमधलं भंडारदरा हे निसर्गप्रेमींसाठी एक अप्रतिम थंड हवेचे ठिकाण आहे. ‘नैसर्गिक खजिन्याचं खोरं’ असं त्याला म्हटलं जातं. या गावात विल्सन डॅम, अम्ब्रेला धबधबा ही इथली प्रमुख ठिकाणं आहेत. तर रतनगड, हरिश्चंद्रगड किल्ला अशी ठिकाणं इतिहासप्रेमींसाठी राखीव समजा.

भांडारदऱ्याचं आणखी एक आकर्षण म्हणजे कळसूबाई पर्वत, ज्याला महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर म्हणूनही ओळखलं जातं.

ट्रेकिंग आणि हायकिंगची खूप ठिकाणं असल्याने सहलीसाठीचं परफेक्ट ठिकाण म्हणजे भंडारदरा. शिवाय इथे विविध रिसॉर्ट्स देखील आहेत, जिथे आपल्या जोडीदारासहित तुम्ही सुखाचे क्षण घालवू शकतात. 

५. लोणावळा

आता लोणावळा म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांसाठी पावसाळ्यात फिरायचं हक्काचं स्थान आपण म्हणू शकतो. समुद्रसपाटीपासून १,८०० फूट उंचीवर वसलेलं हे हिल स्टेशन आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर हे ठिकाण असल्याने दोन्ही शहरांना सोयीस्कर प्रवेश मिळतो. 

ज्वेल ऑफ सह्याद्री’ आणि ‘लेण्यांचे शहर’ याची ओळख आहे.

या हिल स्टेशनवर कुठेही गाडी थांबवा हिरव्यागार दऱ्या, आश्चर्यचकित करणाऱ्या गुहा, शांत तलाव आणि उंचावरून कोसळणारे धबधबे तुम्हाला दिसतील. इथल्या गुहा तर २००० वर्ष जुन्या आहेत. तर लायन पॉईंट, टायगर पॉईंट, मंकी पॉईंट असे वेगवेगळे स्पॉट आहेत जिथून तुम्ही हमखास थांबून निसर्गाचा आनंद घेऊ शकतात.

लोणावळ्याच्या समोरच खंडाळा घाट आहे… हो, आमिर खानच्या गाण्यातीलच हे ठिकाण आहे. विसापूर, राजमाची, लोहगड अशी ट्रेकिंगसाठीची ठिकाणं इथे आहेत. तर बेडसा लेणी, ड्युक्स नोज, कार्ला लेणी, भुशी डॅम, कॅम्पिंगसाठी पवना डॅम अशी अनेक ठिकाणं इथे आहेत. 

या ५ ठिकाणांसोबतच तुम्ही अंबोली, कर्नाळा, कोरोली, लवासा, इगतपुरी, माळशेज घाट, ताम्हिणी घाट अशा ठिकाणी देखील जाऊ शकतात. 

बघा.. निवडा.. आणि आम्हालाही नक्की सांगा तुम्ही काय निवडलंय ते.. शिवाय तुम्ही पण अशी काही हटके ठिकाणं इतर भिडूंसाठी सजेस्ट करा..

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.