रावणाला पाच कोटींची बोली लागणारा सारंगखेडा घोडेबाजार नेमका आहे तरी काय ?

रावणाला पाच कोटींची बोली लागणारा सारंगखेडा घोडेबाजार…

माणूस आणि प्राणी हे एकमेकांशी जुळलेलं समीकरण. लहान मुलांना प्राण्यांची ओळख करून देताना आवर्जून ज्या प्राण्याची ओळख करून दिली जाते ती म्हणजे घोडा. प्रत्येक जण याच्याशी सहमत असालच कारण आपल्या लहानपणी ‘घोडा-घोडा’ कुणी खेळलं नसेल, असं मला तरी वाटत नाही. त्यातच मोठे होताना रामायण, महाभारताच्या गोष्टी ऐकताना, पाहताना घोडा आलाच.

शिवाय सध्या चालू असलेलं लग्नाचं सीजन तर घोड्याशिवाय अशक्यच! बरं सध्या घोड्याचा विषय निघण्याचं कारणही तसंच आहे. ते म्हणजे घोडेबाजारात एका घोड्याला तब्बल पाच कोटी रुपयांची बोली लागली आहे. ही घटना आहे नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील सारंगखेडा घोडे बाजारातील. यंदा सारंगखेडा घोडे बाजारात आलेल्या नाशिकच्या रावण नावाच्या घोड्याला ही बोली लागली आहे.

मग घोड्यांना इतकी मोठी बोली ज्या बाजारात लागते, तो बाजार नेमका आहे तरी काय? हे जाणून घेऊया…

तसं बघितलं तर देशभरात घोड्यांचा बाजार ठराविक ठिकाणी भरतो.  महाराष्ट्रातील सारंगखेडा या गावी तापी नदीच्या काठावर दरवर्षी दत्तजयंतीला मोठी यात्रा भरते. सुमारे एक महिना ही यात्रा चालते. या यात्रेत भारतातील विविध ठिकाणांहून नानाप्रकारचे घोडे विक्रीसाठी आणले जातात. त्यांचा स्वतंत्र बाजार भरविला जातो. २००५ पासून ‘चेतक फेस्टिव्हल’ म्हणून याला ओळखले जाते. यात्रा संपल्यानंतरही तो महिनाभर चालू असतो.

 आशिया खंडातील हा दोन नंबरचा घोडेबाजार समजला जातो. या बाजारात घोड्यांची सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाते. त्यामध्ये चालींची रेस आणि घोड्यांचे नृत्यही बघायला मिळते.

सारंगखेडा घोडे बाजाराचा इतिहासही इथल्या घोड्यांप्रमाणे तितकाच समृद्ध आहे. या घोडेबाजाराचे आयोजक जयपालसिंग रावल यांनी सांगितल्याप्रमाणे, जवळपास ४०० वर्षांपासून हा घोडा बाजार भरत असून आजही तो तेवढाच कुतूहलाचा विषय आहे. या यात्रेचा इतिहास असा की, उत्तर आणि दक्षिण भागातील हे मध्यस्थ स्थान आहे. तापीकाठ हा पूर्वी समृद्ध किनारा होता. 

दक्षिण भागातील त्या काळातील राजे महाराजे त्यांच्या सैन्यासाठी घोडे खरेदी करायला इथे यायचे. तेव्हा भारत देश अखंड होता. शिवाय दळन-वळणासाठी घोड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. त्यामुळे अफगाणिस्तान, बलुचिस्तान, अरबस्तान अशा ठिकाणांहून ‘मारवाड’ जातीचे घोडे विकायला यायचे.

जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा बाजाराने ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. आजही या बाजारात महाराष्ट्रातील सांगली-सातारा भागातील (शरीराने छोटे असलेले) कृष्णाकाठचे ‘तट्टू’, राजस्थानातील मेवाडमधून आलेले ‘मारवाडी’, गुजरात मधील काठीयावाडचा ‘काठेवाडी’, सिक्कीमचा ‘भुतिया’, जम्मू-काश्मीरचा ‘झांझकरी’, मणिपूरचा ‘मणिपुरी’, हिमाचलचा ‘स्पिटी’, अरब देशाचा ‘अबलख’ आणि हरियाणा, मध्यप्रदेश, पंजाबसारख्या इतर बऱ्याच ठिकाणचे घोडे हमखास विक्रीला आणले जातात.

खरेदीदार मालक या घोड्यांचा वापर विविध कामांसाठी करतात. कुणी बग्गीसाठी, कुणी लग्नात शुभकार्यात भाड्याने देण्यासाठी, कुणी स्वतःची हौस म्हणून फेरफटका मारण्यासाठी तर कुणी शर्यतीसाठी करतात. याचबरोबर सरकार असल्या घोड्यांचा वापर लष्करातही करते. मात्र अशा  वेगवेगळ्या कारणांपैकी एक रंजक कारण म्हणजे अनेक लोक घोड्यांना शुभ मानतात. 

देवमण, कंठमण, पंचकल्याण असे घोडे विकत घेण्यासाठी दूरवरून लोक सारंगखेडा बाजारात येतात.  जातिवंत घोड्यांच्या खरेदी-विक्री शिवाय हा घोडेबाजार बघण्यासाठी देशभरातील अश्वप्रेमी सारंगखेडा बाजाराला भेट देतात. जवळपास १५०० ते १८०० घोड्यांची इथे आवक होते.

हा सारंगखेडा बाजार कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पुन्हा बहरला आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या घोडेबाजारात तब्बल यावर्षी  १ हजार ११९ अश्व विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पण या बाजाराला पुन्हा माध्यमाच्या प्रकाशझोतात आणलं ते रावण या अश्वाने.

 सारंगखेडा बाजार ज्या घोड्यांसाठी पूर्वापार प्रसिद्ध आहे ते गुण या घोड्यात आहेत. रावणाचे मालक असद सय्यद यांच्यानुसार हा अश्व अस्सल मारवाडी जातीचा आहे. तसेच त्याची उंची ही जवळपास ५ फूट ८ इंच असून सय्यद यांच्यानुसार संपूर्ण घोडेबाजारात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात रावणाच्या उंची येवढा अश्व नजरेला पडणार नाही, आणि हेच कारण आहे की रावणाला प्रचंड मागणी बघायला मिळत आहे.

 संपूर्ण काळ्या रंगाचा आणि कपाळावर पांढरा टिळा असणारा रावण हा दिसायला खूपच आकर्षक असल्याचंही सांगितलं जातंय.

मग आजवर बाजारात आलेल्या घोड्यांपैकी रावण सगळ्यात महागडा घोडा ठरलाय का? तर नाही. याआधी २०१९ मध्ये ‘शाय’ म्हणून पंजाबचा घोडा आला होता. तो सौंदर्य स्पर्धेत ‘सात कोटी’ला विकला गेला होता. ही आतापर्यंतची सर्वाधिक किंमत मानली जाते. मात्र रावणाबद्दलची अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे पाच कोटींची बोली लागलेली असूनही रावणाच्या मालकांनी रावणाच्या विक्रीला नकार दर्शवला आहे. त्यांनी केवळ रावणाचे लाड पुरवण्यासाठी त्याला बाजारात आणलं असून रावणाने त्यांना विकत घेतले आहे. आणि नोकर कधीच मालकाला विकू शकत नाही, असं रावणाचे मालक असद सय्यद म्हणतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.