भारतात लाँच झालेल्या फाईव्ह जी बद्दलच्या ५ गोष्टी जाणून घ्या…

एक जमाना होता जेव्हा आपण मोबाईलवर साधं गाणं डाउनलोडला लावायचो आणि किमान तासभर वाट पाहायचो. एक-दोन टक्के बाकी असायचे आणि तेवढ्यात कार्यक्रम गंडायचा. बरं हे असं एकदाच व्हायचं का तर नाही, लय वेळा व्हायचं, पण आपण काय जिद्द सोडायचो नाही. आता दिवस असे बदलले की, गाणी डायरेक्ट स्ट्रीमिंग ऍपवरच ऐकत असतोय, सुट्टी नॉट.

आता भले इंटरनेट ४ जी असलं, तरी याच्यात पण नेट खंगाळाततंच, पण डाउनलोड करायला काय लै वेळ लागत नाही. ही जुन्या दिवसांची आठवण काढायचं कारण म्हणजे भारतात आता नुकतंच फाईव्ह जी लाँच झालंय. डाऊनलोडला लागणारा वेळ, व्हिडीओ बघताना होणारं बफरिंग आणि गेम खेळताना गोळी लागल्यावर मिनिटभरानं मरणारी माणसं आता पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे, पण फाईव्ह जी आलं असलं तरी हे सगळं चित्र एका झटक्यात बदलणारं नाही.

भारतात लॉंच झालेल्या फाईव्ह जी चा नेमका विषय काय आहे, तेच जाणून घेऊयात.

दिल्लीतल्या प्रगती मैदानावर झालेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाईव्ह जी सेवेचं उदघाटन केलं आहे.

पण भारतात फाईव्ह जी आलं कसं ?

सध्या भारतात बहुतांश ठिकाणी फोर जी इंटरनेट आहे. जागतिक दर्जाचं फाईव्ह जी इंटरनेट भारतभर पोहोचावं, त्यासाठी केंद्र सरकारनं २०१७ मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ञांचा समावेश असलेली एक उच्च स्तरीय समिती स्थापन केली. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक एजे पॉलराज हे या समितीचे प्रमुख होते. देशभरात विविध गोष्टींचं सर्वेक्षण केल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी केंद्र सरकारला याबाबतचा अहवाल सादर केला. त्यानंतर २०१९ मध्ये सरकारनं टेलिकॉम ऑपरेटिंग कंपनीजना चाचणीसाठी परवाणगी दिली.

२०१९ मध्येच टेलिकॉम डिपार्टमेंट आणि TRAI ने स्पेक्ट्रमच्या किंमतीची चाचपणी करायला सुरुवात केली होती. अखेर ऑगस्ट २०२२ मध्ये सरकारनं फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव घेतला आणि भारतात फाईव्ह जी सर्व्हिसेसचा मार्ग मोकळा झाला.

हे फाईव्ह जी इंटरनेट भारतात कोणकोणते ऑपरेटर्स पुरवणार आहेत ?

स्पेक्ट्रम लिलावातून मिळालेल्या परवानगीनुसार भारतात ३ टेलिकॉम ऑपरेटर कंपन्या फाईव्ह जी सेवा पुरवू शकणार आहेत. लिलावात ८८ हजार कोटींपेक्षा जास्त किंमत देत रिलायन्स जिओनं फाईव्ह जी स्पेक्ट्रम घेण्यात बाजी मारली होती. येत्या दिवाळीपर्यंत मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा शहरांमध्ये फाईव्ह जी नेटवर्क पुरवण्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. प्रगती मैदानावर झालेल्या उदघाटनाच्या कार्यक्रमात रिलायन्सच्या वतीनं मुंबईतल्या एका शिक्षकाला इंटरनेट द्वारे महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा या तीन राज्यातल्या विद्यार्थ्यांशी जोडण्याचा प्रयोग करुन दाखवण्यात आला. जिओ फाईव्ह जी नेटवर्क पुरवण्यासाठी फोर जी नेटवर्कच्याच जोडीनं सेवा पुरवणारं स्टॅन्डअलोन नेटवर्क वापरण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याच्यासाठी जिओकडून २ लाख कोटींची गुंतवणूकही करण्यात आली आहे.

तर लिलावात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारती एअरटेल कंपनीनं २०२३ च्या अखेरपर्यंत भारताच्या सगळ्या शहरी भागात आमचं फाईव्ह जी नेटवर्क असेल आणि मार्च २०२४ पर्यंत सगळ्या भारतातच फाईव्ह जी नेटवर्क देण्यात आम्ही यशस्वी होऊ असा दावा केला आहे. एअरटेलनं फाईव्ह जी इंटरनेट ऑगमेंटेट रिऍलिटीचा वापर करुन शिक्षणात काय बदल करु शकतं याचा डेमो सादर केला. भारती एअरटेल जिओपेक्षा वेगळं ‘नॉन स्टॅन्ड अलोन नेटवर्क’ वापरणार आहे.

आपल्या डेमोमधून कामगारांना सुरक्षेबद्दलच्या सूचना देण्यात फाईव्ह जी इंटरनेट कशी भूमिका बजावेल हे दाखवणाऱ्या व्होडाफोन आयडियानं लिलावात बाजी मारली आहे. त्यामुळं ते सुद्धा लवकरात लवकर बाजारात फाईव्ह जी नेटवर्क आणण्यासाठी उत्सुक असतील.

एवढी चर्चा आणि खर्च होतोय, तर फाईव्ह जी चा स्पीड काय असेल ?

आता फोर जीचं कसं होतंय, कितीही स्पीड असला तरी एका नेटवर्कला जास्त डिव्हाईस कनेक्ट झाले की गाडी अडखळत चालते. पण फाईव्ह जीमध्ये असं होणार नाही. अनेक डीव्हाईस कनेक्ट झाले तरी फाईव्ह जी चांगल्या स्पीडनं सेवा पुरवू शकतं. रिलायन्स जिओनं केलेल्या टेस्टमध्ये १ जीबी पर सेकंद, एअरटेलनं केलेल्या टेस्टमध्ये ३ जीबी पर सेकंद आणि व्होडाफोन आयडियानं केलेल्या टेस्टमध्ये ३.७ जीबी पर सेकंदचा स्पीड मिळवण्यात यश आलं होतं.

फाईव्ह जीचा सर्वात जास्त स्पीड २० जीबी पर सेकंदपर्यंत जाऊ शकतो, पण प्रत्यक्ष वापरात तो ५० एमबी पर सेकंद ते ३ जीबी पर सेकंदपर्यंत जाऊ शकतो.

या असल्या खतरनाक स्पीडमुळे पिक्चर काही सेकंदात डाउनलोड होऊ शकतो, क्लाउड गेमिंग विनाअडथळा करता येऊ शकते, ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग आणखी सोपा होईल, मेट्रो आणि इतर वाहनांमध्ये चालकविरहित सेवा वापरता येईल. कृषी क्षेत्रात ड्रोन, कारखान्यांमध्ये रोबोट्स वापरण्यालाही चालना मिळेल.

ते नाही, पण फाईव्ह जी साठी मोबाईल नवा घायला लागणार काय ?

तर उत्तर आहे हो. फाईव्ह जी नेटवर्कला सपोर्ट करेल असा मोबाईल असणं गरजेचं आहे. सुरुवातीला असं सांगण्यात येत होतं की, फोर जी मोबाईलमध्ये फाईव्ह जी सेवा चालू शकेल. पण नंतर अनेक ट्रायल्सनंतर हे स्पष्ट झालं की, फाईव्ह जीला सपोर्ट करेल असाच मोबाईल वापरणं गरजेचं आहे. सध्या तुम्ही टू जी मोबाईलमध्ये फोर जी सिम वापरलं तरी स्पीड मात्र टू जीचाच मिळतो. याच धर्तीवर जर फाईव्ह जी वापरायचं असेल तर सिम आणि मोबाईल दोन्ही फाईव्ह जी ला सपोर्ट करणारं असणं गरजेचं आहे.

भारतात सध्या कुठं कुठं फाईव्ह जी सेवा सुरू झाली आहे ?

फक्त महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, तर पाहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुण्यात फाईव्ह जी नेटवर्क उपलब्ध होईल. तर या दोन्ही शहरांसह देशभरात बँगलोर, चंदीगड, गुरुग्राम, अहमदाबाद, गांधीनगर, जामनगर, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई आणि लखनौ अशा एकूण १३ शहरांमध्ये फाईव्ह जी ला सुरुवात होणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.