अन् ‘ तो ‘ पाच किडन्या शरीरात घेऊन घरी देखील गेला !

शरीरात सर्व साधारणपणे दोन मूत्रपिंड म्हणजेच किडन्या असतात हे सगळ्यांनाच अवगत आहे. मात्र किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या एक रुग्णाला तीन वेळा किडनी प्रत्यारोपणाच्या तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जुलै महिन्यात या रुग्णांवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याला डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णाच्या शरीरात एकूण पाच किडन्या झाल्या असून त्याची डायलेसीस पासून सुटका झाली असून तो व्यक्ती आता सर्वसामान्य माणसासारखे आयुष्य जगत आहे.

चेन्नई येथील मद्रास मेडिकल मिशन रुग्णालयात ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली असून ४१ वर्षीय व्यक्तीच्या या तिसऱ्या प्रत्यारोपणाबाबत डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले आहे. 

चेन्नई येथील टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात ११ ऑगस्ट रोजी हे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजेच १९९४ रोजी या व्यक्तीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर किडनी प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ती किडनी त्याची व्यवस्थिपणे ९ वर्षे राहिली त्यानंतर ती सुद्धा किडनी बाधित झाली. त्यानंतर २००५ मध्ये दुसऱ्या किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली ती किडनी १२ वर्ष व्यवस्थित चालली आणि त्यानंतर ती सुद्धा निकामी झाली. मात्र त्याच्या नंतरची चार वर्ष त्याला डायलेसिस वर राहावे लागले. यामध्ये आठवड्यातील तीन दिवस त्यांना डायलेसिस करावे लागत असे.

शरीरातील सर्व अशुद्ध घटक बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. मधुमेह, रक्तदाबाचा विकार आणि काही प्रमाणात किडनीला संसर्ग या आणि अशा विविध कारणामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होतो आणि त्याचे वेळेतच उपचार नाही केले तर किडनी कायमची निकामी होते. त्यामुळे रुग्णाला डायलेसिस करावे लागते. 

डायलेसिस म्हणजे किडनीचे कार्य मशीनच्या साहाय्याने केले जाते. कायमस्वरूपी किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी डायलेसिस हा एकमेव पर्याय आहे. जर डायलेसिस नको हवे असल्यास त्यावर किडनीचे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र याकरिता जवळच्या नातेवाईकाने किडनी देणे किंवा मेंदूमृत व्यक्तीची किडनी मिळणे आवश्यक असते.

याप्रकरणी चेन्नई येथील मद्रास मेडिकल मिशन रुग्णालयातील सर्जन डॉ एस सर्वनन सांगतात की,

 ” या रुग्णांमध्ये दोन्ही किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया नंतर सुद्धा किडनी निकामी झाल्या असून कारण त्यांचा उच्च रक्तदाब हा अनियमित होता. या कारणांमुळे याच रुग्णालयात त्याच्या हृदयाची बायपास शस्त्रक्रिया मार्च महिन्यात करण्यात आली होती त्यांच्या तीन रक्तवाहिन्यांत मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता.”

त्यांनी पुढे सांगितले कि, ” या व्यक्तीच्या शरीरात अगोदरच स्वतःच्या दोन किडन्या आणि दोन किडन्या अवयव दात्यांकडून बसविण्यात आल्या होत्या. आता परत तिसऱ्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेवेळी त्याला पाचवी किडनी लावण्यासाठी डॉक्टरांना नव्याने जागा शोधावी लागणार होती. या शस्त्रक्रियेसाठी हे खूप आव्हानात्मक काम होते कारण किडनी लावल्यानंतर त्याची रक्तवाहिनी त्याला जोडणे खूप जिकिरीचे काम होते. मूत्रपिंड रोग शल्यचिकित्सक सहसा निकामी झालेल्या किडन्या काढत नाही त्याचाच आजूबाजूला नवीन किडनी बसवित असतात कारण जर जुन्या किडन्या काढल्या तर रक्तस्रावाचा धोका संभवू शकतो. यामुळे रुग्णाला बाहेर रक्त द्यावे लागू शकते. यामुळे रक्तात प्रतिपिंडे (अँटीबॉडीज ) निर्माण होऊन किडनी निकामी (रिजेक्ट) होण्याचा धोका वाढू शकतो.

या रुग्णावर १० जुलैला ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी पाचव्या किडनीसाठी आतड्याच्या जवळ जागा करून रक्तवाहिन्या जुळवून यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आणि जवळपास महिन्यभराच्या रुग्णालयातील वास्तव्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. 

डॉक्टर या रुग्णाच्या तब्बेतीवर अजून काही महिने व्यवस्थित लक्ष ठेवणार असून त्यांनी रुग्णाला नियमितपणे तपासणीसाठी येण्यास सांगितले आहे त्याचबरोबर या रुग्णाचा रक्तदाब व्यवस्थित राहील याकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे.

मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयातील किडनीविकार तज्ञ डॉ जतीन कोठारी यांनी सांगितले की,

 ” अशा पद्धतीने पाच किडनी असल्याच्या शस्त्रक्रिया काही ठिकाणी या अगोदरही झाल्या आहेत. मुंबईत काही रुग्ण चार किडन्या घेऊन फिरत त्यांचे आयुष्य काढत आहे. मात्र अशा तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेवेळी मोठी काळजी रुग्णाला आणि डॉक्टरांना सुद्धा घ्यावी लागते. “

  • संतोष आंधळे
Leave A Reply

Your email address will not be published.