भारताल्या पहिल्या १० श्रीमंतांना ५% टॅक्स लावला तरी शाळेबाहेरची सगळी पोरं शाळेत जातील

रजनीकांतचा शिवाजी द बॉस पिक्चरमध्ये एक डायलॉग होता,

‘अमीर और अमीर बनते जा रहा है, और गरीब और गरीब’

आता हा डायलॉग खरा असला तरी, त्यात गैर असं काही नाही असं म्हणावं लागेल. कारण श्रीमंतांच्या यादीत असलेले लोक सुद्धा हे एकेकाळी गरीबच होते. ते त्यांच्या कामाच्या बळावर आज त्या पदावर पोहोचलेत. विषय आहे तो गरिबीचा. एक मुद्दा असाही येतो की, भारतातले गरिबीशी निगडीत जवळपास सगळे प्रश्न हे या सर्वात श्रीमंतांच्या यादीत बसलेल्या लोकांच्या काही टक्के कराने संपू शकतात.

अगदी आकडेवारी सकट उदाहरण देऊन सांगायचं झालं तर, शिक्षणापासून दूर झालेल्या मुलांचा मुद्दा बघु.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून २०२१ साली देण्यात आलेल्या माहितीनुसार, जवळपास १५ कोटी मुलं ही शिक्षणापासून दूर आहेत. या सर्व मुलांना परत एकदा शिक्षणाकडे वळवण्यासाठी किंवा पुन्हा एकदा शाळेत घेऊन जाण्यासाठी किती रक्कमेची गरज आहे? तर, एक लाख चाळीस हजार कोटी रुपये.

१ लाख ४० हजार कोटी ही रक्कम जर हातात आली तर, या सगळ्या मुलांना फक्त शिक्षण नाही तर, उत्तम दर्जाचं शिक्षण दिलं जाऊ शकतं. असं एका स्वयंसेवी संस्थेचं मत आहे.

ऑक्सफॉमकडून देण्यात आलेल्या भारतातील वार्षिक असमानता अहवालानुसार, भारतातल्या १० सर्वात श्रीमंत व्यक्तींकडून प्रत्येकी ५ टक्के कर किंवा भारतातल्या १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींकडून २.५ टक्के कर आल्यास ही समस्या सहज सुटू शकते.

याशिवाय अशा अनेक समस्या आहेत ज्या भारतातल्या धनशाली लोकांच्या थोड्या मदतीने सुटू शकतील. सगळे मुद्दे बघायच्या आधी एकदा भारतातले १० सर्वात श्रीमंत नागरिक कोण आहेत आणि त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ते बघुया.

सर्वात वर नाव येतं ते गौतम अदानी यांचं. १५० बिलीयन डॉलर्स इतकं त्यांचं नेटवर्थ आहे. त्यानंतर रिलायंस कंपनीचे मुकेश अंबानी यांचं नाव येतं. त्यांचं नेटवर्थ जवळपास ८८ बिलीयन डॉलर्स इतकं आहे. त्यानंतर २७.६ बिलीयन्स सह राधाकिशन दमानी येतात. मग, सायरस पुनावाला, शिव नदार, सावित्री जिंदाल, दिलीप सांघवी, हिंदुजा ब्रदर्स, कुमार बिर्ला आणि बजाज फॅमिली अशी नावं येतात.

आता पुन्हा एकदा शिक्षणाच्या मुद्द्याचा विचार करुया.

तर, भारतात शिक्षण हा मुद्दा फक्त विद्यार्थ्यांपर्यंतच मर्यादित राहिलेला नाहीये. बऱ्याचशा राज्यांमध्ये प्राथमिक शिक्षण देणारे शिक्षक हे त्यांच्या पगाराविषयी नाखुश आहेत. त्यांचा पगार हा कमी असल्याची तक्रार केली जात असते.

शिक्षकांच्या पगाराचा मुद्दा सोडवायचा म्हणलं तर, बाकी सगळे राहू द्या, भारतातले सगळ्यातले सगळ्यात श्रीमंत आणि जगातले तिसरे श्रीमंत असलेले गौतम अदानी यांच्या एकट्याचा २.५ टक्के कर ही समस्या सोडवू शकतो.

आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठीही मदत होईल.

भारतातल्या १० सर्वात श्रीमंत नागरिकांची ५% कर हा तब्बल ५ वर्षांसाठी आदिवसी भागातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पुरेसे असतील. याशिवाय, सर्वात श्रीमंत व्यक्तींकडून १% ते ५% कर हा भारतातली कुपोषणासारखी मोठी समस्या सोडवायला पुरेसा आहे.

भारतीय अब्जाधीशांच्या संपत्ती करातील ३% रक्कम ‘३७,८०० कोटी रुपयांच्या वाटपासह भारतातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना असलेल्या नॅशनल हेल्थ मिशनला तीन वर्षांसाठी निधी देऊ शकतात’ असं अहवालात म्हटलं आहे.

२०२० साली भारतातल्या अब्जाधीशांची संख्या ही १०२ इतकी होती तर, २०२२ मध्ये ती संख्या १६६ इतकी आहे.

भारतातली एकूण ४०% श्रीमंती ही भारतातल्या १% लोकांकडे आहे तर, तळातील ५०% लोकांकडे फक्त ३% पैसा आहे. असं ऑक्सफॉमकडून देण्यात आलेल्या अहवालात म्हटलंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.