५ जी नेटवर्कमुळं विमान सेवेला नेमका कोणता प्रॉब्लम होतो?

जसं कि आपण नेहमीच  बोलतो सध्याचा जमाना हा टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटचा आहे. पण त्यातसुद्धा फास्टेस्ट स्पीड आणि दुसऱ्यांपेक्षा वरचढ होण्यासाठी रेस लागलीये. म्हणजे भारताचचं बघायच झालं तर २ जी, ३ जी आणि आता ४ जी सुरुये. पण बाकीच्या विकसित देशात मात्र ५ जीला सुरुवात सुद्धा झालीये.

आता भारत  सुद्धा ५ जीच्या दिशेने काहीच अंतरावर आहे, पण तरी देशात त्याबाबत दुमत आहे. कारण जेवढं जास्त स्पीड तेवढी जास्त रिस्क घेण्यासाठी आपण तरी अजून तयार नाहीये.

म्हणजे सध्या गेल्या दोन दिवसांपासून भारताची विमान आणि अमेरिकेचं ५ जी एयरपोर्ट जास्तच चर्चेत आलंय. एअर इंडियाने अमेरिकेला जाणाऱ्या आपल्या विमानाची उड्डाण कमी केलीत. कारण १९ जानेवारीपासून अमेरिकेत ५ जी सर्व्हिस सुरु करण्याच्या तयारीत आहे. आणि फक्त भारतच नाही बऱ्याचशा  देशांची अशीच काहीशी परिस्थती आहे. त्यात बऱ्याच अमेरिकन एअरलाइन्सने आधीच एअरलाइन्सवर परिणाम होण्याच्या भीतीने ५ जी लॉन्चिंग पुढे ढकलण्याचं आव्हाहन केलयं. 

पण आता ती अमेरिका आहे ती काय कोणाचं ऐकतेय होय. पण यासोबतच प्रश्न डोक्यात होतो कि, ५ जी नेटवर्कमुळे नेमकं असं घडत तरी काय कि जगभरातली विमानसेवा खंडित होते आणि सोबतच त्याचा भारतावर काय परिणाम होतोय?

तर ५जी सर्व्हिस रेडिओ सिग्नलवर आधारित आहेत. अमेरिकेत ५ जी साठी वापरली जाणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी सी-बँड म्हणून ओळखली जाते. खरं तर, यूएसने २०२१  मध्ये त्यांच्या मोबाइल कंपन्यांना ५जी च्या मध्यम-श्रेणी बँडविड्थ म्हणजे ३.७-३.९ GHz च्या वारंवारतेचा लिलाव केला. त्याच वेळी, विमानाचे अल्टिमीटर रेडिओ सिग्नल सुद्धा अंदाजे याच रेंजच्या फ्रिक्वेन्सीचा म्हणजे ४.२–४.४ GHz चा वापर करतात. 

आता अल्टिमीटरचं काम काय तर जमिनीपासून विमान किती उंचीवर उडतयं हे मोजणं, त्याच्या सेफ्टी आणि नेव्हिगेशन सिस्टमसाठी डेटा प्रोव्हाईड करणं, ऑटोमॅटिक लँडिंगसाठी मदत करणं, विंड शीयरबाबत सतर्क ठेवणं अशी बरीचशी… पण आताच्या ५जी ची फ्रिक्वेन्सी आणि जहाजाच्या अल्टिमीटरची फ्रिक्वेन्सी जवळजवळ सेम रेंजची असल्यामुळं विमानाची  सेफ्टी, त्याचा ट्रॅव्हल रूट, आणि नेव्हिगेशनला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

५जी ट्रान्समिशन विमानाच्या अल्टिमीटरसारख्या उपकरणांच्या कामात प्रॉब्लम आणू शकतात ज्यामुळे विमानाच्या लँडिंगवर परिणाम होण्याचा धोका असतो. ऑल्टिमीटरच्या प्रभावामुळे विमानाला खराब हवामान, ढग किंवा धुक्याच्या वेळी केवळ व्हिज्युअल डेटावर अवलंबून  राहायला लागेल, ज्यामुळे लँडिंग आणि टेक-ऑफमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. 

युनायटेड एअरलाइन्सचे सीईओ स्कॉट किर्बी यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, यूएस मध्ये ५ जी  सेवा सुरू केल्याने किमान ४० प्रमुख विमानतळांवर रेडिओ अल्टिमीटरचा वापर होणार नाही. माहितीनुसार यामुळे दररोज सरासरी १००० उड्डाणे रद्द होतील, डायव्हर्ट किंवा उशिरा होईल आणि हजारो प्रवाशांना याचा फटका बसेल. यामध्ये कार्गो आणि प्रवासी विमान दोन्हींना अडचणी येतील. एका अहवालानुसार, यामुळे अमेरिकन विमान वाहतूक उद्योग आणि प्रवाशांचे दरवर्षी सुमारे १२ हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

आता जरी अमेरिकेत ५जीमुळे विमानांचे नुकसान हा एक मोठा मुद्दा बनला असला, पण जगात असे अनेक देश आहेत जिथे कुठलाच प्रॉब्लेम न येता ५ जी चा चांगला वापर केला जातोय. म्हणजे युरोपातील २७ देशांमध्ये फ्लाइटमध्ये ५जी मुळे कुठलीच तक्रार आलेली नाही. युरोपियन युनियनचे २७ देश यूएस पेक्षा कमी फ्रिक्वेन्सीच्या म्हणजे ३.४–३.८ GHz ५जी नेटवर्कचा वापर करतात.

असचं काहीस फ्रान्समध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. फ्रान्समधल्या विमानाच्या अल्टिमीटरसाठी वापरण्यात येणारी फ्रिक्वेसी ३.६–३.८ GHz यूएस वापरत असलेल्या अल्टिमीटर फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी आहे. तसेच, फ्रान्स यूएस पेक्षा कमी ५जी पॉवर लेव्हल वापरतो.

फ्रान्ससारख्या काही देशांनी विमानतळांभोवती “बफर झोन” तयार केले आहेत जेथे अशी समस्या टाळण्यासाठी ५ जी सिग्नल प्रतिबंधित आहेत. तसेच, येथे अँटेना थोडासा खाली झुकलेला असतो, जेणेकरून विमानाच्या सिग्नलला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही.

दक्षिण कोरियामध्ये तर एप्रिल २०१९ पासून ५जी सेवा वापरली जातेय, परंतु यामुळे एअरलाइन्सच्या रेडिओ सिग्नलमध्ये कोणतीही समस्या आली नाही.

Verizon आणि AT&T या कंपन्यांनी ५ जी सेवा यूएसमध्ये आणलीये. पण त्यांच्या म्हणण्यानुसार किमान ४० इतर देशांमध्ये ५जी  सेवा सुरू झाल्यात. आणि यातल्या कुठल्याच देशांच्या एअरलाइन्समध्ये कुठलाच प्रॉब्लेम आलेला नाहीये.

आता अमेरिकेतच हा प्रॉब्लेम येतोय. ज्यामुळे जगभरातल्या विमानसेवांना अडथळा निर्माण झालाय. त्यामुळे अमेरिकेन सध्या तरी ५जी लॉन्चिंग पुढे ढकललीये. पण ५जी लॉन्च करणारच या मुद्द्यावर असून राहत  अमेरिकन टेलिकॉम कंपन्यांनी अशी कोणतीही समस्या टाळण्यासाठी फ्रान्सप्रमाणेच किमान ५० यूएस विमानतळांवर सहा महिन्यांसाठी बफर झोन तयार करण्याचे मान्य केलेय.

आता भारतातल्या ५ जी लॉन्चिंग बद्दल बोलायचं झालं तर, भारतात काही महिन्यांमध्ये दिल्ली, मुंबईसारख्या १३ मोठ्या शहरांमध्ये ५ जी टेस्टिंग सुरू होणार आहेत.  आता आपल्या इथल्या विमान बहतुकीवर काय परिणाम होईल हे तर अजून काही क्लियर झालेलं नाही. पण असं म्हंटल जातंय कि, जेव्हा कधी भारतात ५ जी सर्व्हिस सुरु होईल, तेव्हा सरकार याआधीच फ्रान्स किंवा युरोपीय देशांप्रमाणे विमानतळाभोवती बफर झोन तयार करेल. आणि बाकीच्या देशांप्रमाणे कमी-फ्रिक्वेंसी ५जी सेवांच्या वापरास मान्यता देऊ शकतात. 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.