विश्वास बसणार नाही, पण जगात असेही देश आहेत जिथं इनकम टॅक्स भरावाच लागत नाही…

दरवर्षी होतं तसंच यंदाही १ फेब्रुवारीला म्हणजे आज भारताचा अर्थसंकल्प सादर झाला. दरवर्षी असतं तसंच यंदाही सगळ्यांचं लक्ष काही मोजक्याच गोष्टींकडे होतं त्या म्हणजे काय स्वस्त होणार, काय महाग होणार, इनकम टॅक्स संदर्भात काय घोषणा होणार. म्हणजे या अर्थसंकल्पातल्या काही अशा गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे सर्वसान्यांवर आणि त्यांच्या लाईफस्टाईलवर थेट परिणाम होतो.

यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी इनकम टॅक्स संदर्भात ७ लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तिंना एक रुपयाही इनकम टॅक्स भरावा लागणार नाही अशी घोषणा केली.

या घोषणेनंतर त्यांनी टॅक्स पेयर्ससाठी नवा टॅक्स स्लॅबही मांडला. त्यानुसार, ७ लाखांच्या वर उत्पन्न असलेल्यांना पहिल्या तीन लाख्यांच्या उत्पन्नासाठी ०%, ३- ६ लाख उत्पन्नासाठी ५%, ६-९ लाख उत्पन्नासाठी १०%, ९-१२ लाख उत्पन्नासाठी १५ %, १२-१५ लाख उत्पन्नासाठी २०% आणि १५ लाखावरील उत्पन्नासाठी ३०% असा इनकम टॅक्स आकारण्यात येणार असल्याचं निर्मला सितारामन यांनी जाहीर केलं.

इनकम टॅक्स हा सर्वसामान्यांसाठी अगदी जवळचा विषय आहे. आता हा निर्णय आल्यामुळे सर्वसामान्यांना खासकरून ज्यांचं वार्षिक उत्पन्न ७ लाखाच्या खाली आहे त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जातंय.

या सगळ्या चर्चांच्या आणि घोषणांच्या पलिकडे जावून काही देश असेही आहेत जिथं तुमची कमाई ही पुर्णपणे तुमचीच असते. तुम्हाला तुमच्या कमाईवर अजिबा कर द्यावा लागत नाही

बघुया असे कोणते देश आहेत जिथं तुम्हाला इनकम टॅक्स भरावाच लागत नाही.

१) बहामास:

बहामास या देशात कोणत्याच नागरिकाला आपल्या कमाईवर टॅक्स भरावा लागत नाही. अगदी तो माणूस बहामासचा नागरिक असला किंवा दुसऱ्या कोणत्या देशाचा नागरिक असला तरी त्याला बहामासमध्ये इनकम टॅक्स भरावा लागत नाही. तो ज्या देशाचा मूळ नागरिक आहे त्या देशातल्या नियमांप्रमाणे त्या देशात त्याला इनकम टॅक्स भरावा लागतो.

२) युएई:

आखाती देशांमधल्या सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या युएई म्हणजे संयुक्त अरब अमीरात या देशाचं महत्त्वाचं उत्पादनाचं साधन हे तेल आहे. देशात कोणत्याच नागरिकाकडून इनकम टॅक्स घेतला जात नाही. याऐवजी तेलातून मिळणारं उत्पन्न आणि बाहेरच्या देशातून येणाऱ्या पर्यटकांकडून कर घेतला जातो.

३) बहरीन:

बहरीन या देशात कोणत्याही व्यक्तीकडून इनकम टॅक्स आकारला जात नसला तरी, ज्या संस्थेसाठी लोक काम करतायत त्या संस्थेला बहरीनमधल्या सोशल इन्शुरन्स ऑर्गनायझेशनला आर्थिक स्वरूपात मदत करणं हे बंधनकारक आहे.

४) कुवैत:

कुवैत हा देश तेल निर्यातीच्या बाबतीत आघाडीवर आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी कुवैतला नागरिकांच्या उत्पन्नावर कर लावण्याची गरज भासत नाही. त्यामुळे या देशातही पर्सनल इनकम टॅक्स भरावा लागत नाही.

याशिवाय खाद्यपदार्थ, पेट्रोल, वीज तसेच आरोग्य व्यवस्था या गोष्टींसाठी सरकारी सबसिडीही आहे.

५) कतार:

कतार हा देशही तेल उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर आहे. त्यामुळं या देशाची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी मजबूत आहे. याच कारणामुळे, नोकरी करणाऱ्या नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा इनकम टॅक्स आकारला जात नाही.

आकाराने लहान असला तरी हा देश आणि या देशातले नागरिक आर्थिक दृष्ट्या प्रबल आहेत.

६) मालदीव:

जगातल्या सगळ्यात भारी पर्यटन स्थळांपैकी एक समजल्या जाणारा मालदीव हा देश तिथल्या समुद्र किनाऱ्यांमुळे प्रसिद्ध आहे. मुळात हा देशच समुद्र किनाऱ्यावर वसलाय. या देशाचं पर्यटनातून होणारं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या देशातही नागरिकांकडून इनकम टॅक्स घेतला जात नाही.

आपल्या देशात आपल्याला इनकम टॅक्स भरावा लागत असला तरी आता आलेल्या नव्या नियमांमुळे नागरिकांना दिलासा मिळालाय असं बोललं जातंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.