भारतातील ६ ताकदवान प्रादेशिक नेते जे उद्या देशपातळीवरचं राजकारण करू शकतात…

काल ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यात बंगाल नंतर सर्वात महत्वाचा कोणता निकाल कोणता ठरला असेल तर तो आहे तामिळनाडूचा. कारण याठिकाणी परंपरेनुसार पुन्हा एकदा द्रविड मुन्नेत्र कळघम हा प्रादेशिक पक्ष सत्तेत आला आहे.

भारतात जेवढं महत्व भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना आहे तेवढंच महत्व प्रादेशिक पक्ष आणि त्या पक्षाचा नेत्यांना देखील आहे. सध्या तामिळनाडू सोबतच बऱ्याच राज्यात प्रादेशिक पक्ष सत्तेत आहेत, आणि त्यांची ताकद आपल्या राज्यासोबतच दिल्लीत देखील जास्त असल्यामुळे ते उद्या देशपातळीवरच राजकारण देखील करू शकतात.

हे ६ प्रादेशिक नेते उद्या देशपातळीवरचं राजकारण करू शकतात…

१. जगनमोहन रेड्डी : 

आंध्रप्रदेशमध्ये एन. चंद्राबाबू नायडू यांची सत्ता उलथवून सत्तेत आलेलं जगनमोहन रेड्डी हे भारतातील प्रादेशिक नेत्यांमधील आघाडीचं नाव. सध्याच्या घडीला आंध्रप्रदेश राज्यावर त्यांची एकहाती सत्ता असल्याचं चित्र आहे. त्यांच्या वायएसआर काँग्रेस या पक्षाचे आंध्र विधानसभेत १७५ पैकी सध्या तब्बल १५० आमदार आहेत. तर तिथल्या विधानपरिषदेत देखील त्यांच्या पक्षाचे ५८ पैकी १८ आमदार आहेत.

जशी आंध्रच्या विधिमंडळात या पक्षाची ताकद आहे तशीच संसदेत देखील त्यांच्या पक्षाची ताकद दिसून येते. लोकसभेत वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत २२ तर राज्यसभेत ६ खासदार आहेत.

राष्ट्रीय राजकारणातील भूमिका बघितली रेड्डी हे थेट केंद्रीय सत्तेत किंवा एनडीएचा भाग नाहीत. मात्र तरीही त्यांची भूमिका हि आज पर्यंत काहीशी भाजपशी जवळीक साधणारी राहिली आहे. त्यामुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर जेव्हा मंत्रीमंडळाची स्थापना होत होती तेव्हा त्यांना सत्तेत सहभाग मिळणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

२. एम. के. स्टॅलिन :

तामिळनाडूमध्ये कालच्या निवडणुकांच्या निकालानंतर सर्वाधिक जागा जिंकत पुन्हा सत्तेत येत असलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन यांचं देखील नाव या यादीत घ्यावं लागतं. काल त्यांच्या पक्षाचे राज्यात जवळपास १२६ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आता पूर्ण बहुमताने ते सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहेत.

संसदेत देखील या पक्षाची ताकद लक्षणीय आहे. राज्यसभेत ७ तर लोकसभेत तब्बल २४ खासदार असलेला द्रमुक काँग्रेस नंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे. हा पक्ष सध्या राज्यात आणि देशात काँग्रेस सोबत युपीएचा घटक आहे. त्यामुळे प्रखर भाजप विरोधी अशी द्रमुकची ओळख आहे. 

स्टॅलिन देशपातळीवरच राजकारण करण्यास देखील सक्षम आहेत. किंबहुना तसा कुटुंबिक वारसा त्यांना प्राप्त आहे. याआधी त्यांचे वडील आणि जेष्ठ तामिळ नेते स्व. करुणानिधी आणि बहीण कनिमोझी यांनी देशपातळीवरच राजकारण केलं आहे.

३. नवीन पटनाईक : 

नवीन पटनाईक आणि त्यांचा बिजू जनता दल म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून ओडिसामध्ये एकहाती सत्ता राखून असलेला पक्ष. ना काँग्रेसला तिथं पाय रोवता आले ना भाजपला. मागच्या २२ वर्षांपासून नवीन पटनाईकच तिथले मुख्यमंत्री आहेत. आता देखील त्यांच्या पक्षाचे १४७ पैकी ११३ आमदार आहेत.

तर तिकडे दिल्लीत संसदेमध्ये बिजू जनता दलाचे लोकसभेत १२ खासदार आणि राज्यसभेत ९ आमदार आहेत. नवीन पटनाईक हे राष्ट्रीय नेते म्हणून देखील ओळखले जातात. विशेष म्हणजे मुख्यमंत्री होण्याआधी काही काळ ते केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री देखील होते.

त्यामुळे पटनाईक हे एखाद्या राष्ट्रीय मुद्द्यावर थेट भूमिका घेत नसले तरी देखील काहीसे आजही भाजपशी जवळीक असलेले नेते असल्याचं मानलं जात.

४. के. चंद्रशेखर राव :

२०१४ ला तेलंगणा राज्याची स्थापना झाल्यापासून के. चंद्रशेखर राव यांची राज्यात सत्ता आहे, आणि फक्त सत्ता नाही तर हे राज्य म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती आणि चंद्रशेखर राव यांचा गड मानला जातो. आज घडीला राज्यात ११९ पैकी त्यांचे १०४ आमदार त्यांच्याच पक्षाचे आहेत, तसेच इथल्या विधानपरिषदेत ४० पैकी ३४ आमदार त्यांचे आहेत. यावरून त्यांची राज्यातील ताकद आपल्याला दिसून येते.

लोकसभेत त्यांच्या पक्षाचे ९ खासदार तर राज्यसभेत ७ खासदार आहेत. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय राजकारणाचा देखील अनुभव आहे. ते २००४ ते २००६ या काळात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री देखील होते.

या पक्षाची भूमिका बघायची झाली तर ती भाजप विरोधी असल्याचं दिसून येत. याच ताक उदाहरण म्हणजे अलीकडच्या हैद्राबाद महानगरपालिका निवडणुकीवेळी भाजप आणि तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये झालेला संघर्ष अगदी देशपातळीवर पोहचला होता.

५. उद्धव ठाकरे : 

सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाची ताकद राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी असल्याचं बघायला मिळतं. महाराष्ट्रात शिवसेना सध्याच्या घडीला ५७ आमदारांसह दोन नंबरचा पक्ष आहे. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात या तीन पक्षाचं सरकार आहे. विधानपरिषदेत देखील शिवसेनेचे १५ आमदार आहेत.

दिल्लीतील ताकद बघायची म्हंटलं तर शिवसेनेचे लोकसभेत १८ खासदार आहेत आणि राज्यसभेत ३ खासदार आहेत. मात्र या पक्षाला राष्ट्रीय राजकारणाचा जुना अनुभव आहे.

भाजप सोबत एनडीएचा भाग असताना १९९८ पासून २००४ आणि त्यानंतर २०१४ पासून २०१९ पर्यंत शिवसेना केंद्रीय मंत्रिमंडळात होती. सध्या पूर्णतः भाजप विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेला ओळखलं जातं.

६. अरविंद केजरीवाल : 

अलीकडेच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात राजकारणात उतरलेला आम आदमी पक्ष हा देखील ताकदवान प्रादेशिक पक्ष आणि नेत्यांच्या यादीत आहे. अवघ्या ७ ते ८ वर्षात अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत तिसऱ्यांदा सत्ता आणली आहे. सध्या दिल्लीत पक्षाचे ७० पैकी ६२ आमदार आहेत.

सोबतच पंजाब राज्यात देखील आम आदमी पक्ष आणि केजरीवाल यांनी ताकद दाखवून दिली आहे. पंजाबमध्ये आप प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. सध्या त्यांचे इथं २० आमदार आहेत. जे कि भाजप आणि अकाली दलापेक्षा जास्त आहेत.

संसदेत देखील आम आदमीनं आपलं स्थान निर्माण केलं आहे. सध्या लोकसभेत १ आणि राज्यसभेत या पक्षाचे ३ खासदार आहेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.