एकाच शो मध्ये ६० कॅरेक्टर साकारून त्याने दाखवून दिलं होतं कि तो मेहमूदचा वारसदार आहे….

बॉलिवूडमध्ये प्रत्येकाचा एक ठराविक काळ असतो. काही कायमचेच फेमस होतात आणि काही इंडस्ट्रीत प्रवेश करण्यापूर्वीच गायब होतात. पण आजचा किस्सा जरा वेगळा आहे. सुरवातीला कॉमेडी हा सिनेमाचा जीव असायचा, मेहमूदने या कॉमेडी मध्ये अशी छाप निर्माण केली कि परत कोणी त्याला रिप्लेस करणार नाही. पण नंतर सतीश शहा नावाचा अवलिया आला आणि त्याने आपल्या अभिनयाने दाखवून दिलं कि तो मेहमूदचा वारसदार आहे.

सतीश शहा हा माणूस आपण बऱ्याच सिनेमांमध्ये पाहिलेला असेल. तो ज्या ज्या सीनमध्ये असेल तो सिन हा खळखळून हसवणारा असतो याची खात्री असायची. मेहमूद, जॉनी लिव्हर, राकेश बेदी यांच्या कॉमेडीपेक्षा सतीश शहा हा त्याच्या शैलीची कॉमेडी करायचा आणि तो सिनेमात भाव खाऊन जायचा.

सतीश शहांचा जन्म २५ जून १९५१ मध्ये मुंबईत झाला. सिनेमाशी दूरवर संबंध नसलेला सतीश शहा हा उत्तम खेळाडू होता. क्रिकेट आणि बेसबॉलमध्ये तो चॅम्पियन होता. खेळता चांगलं यायचं म्हणून मुंबईच्या सेंट झेव्हियर हायस्कुलमध्ये ऍडमिशन घेतलं. खेळात चांगलं असल्याने त्यांनी कधी विचारही केला नव्हता की अभिनय हा आपला व्यवसाय होईल.

आठवीत असताना त्यांच्या शाळेत एका प्रोग्रॅमच्या वेळी हिंदी डिपार्टमेन्टकडून कुणीही सहभाग घ्यायला तयार नव्हतं अशा वेळी शिक्षकांनी सतीश शहाच्या नावाची शिफारस केली. सतीश शहांची हिंदी उत्तम होती. शिक्षकांनी सतीश शहांच्या परवानगीचा विचार न करता नाटकात मुख्य भूमिकेसाठी त्यांचं नाव दिलं. आता सरांना काही बोलताही न आल्याने सतीश शहांनी तो रोल केला.

त्यावेळी त्यांनी जबरदस्त काम केलं आणि टाळ्या मिळवल्या. सुरवातीला अभिनयाविषयी असलेली भीती निघून गेल्याने सतीश शहा यांच्यात आत्मविश्वास जागला. त्यामुळं त्यांनी अभिनय क्षेत्राकडे वळायला सुरवात केली. यातच करियर करायला हरकत नाही म्हणून त्यांनी एफटीटीआय [ फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडिया ] मध्ये ऍडमिशन घेतलं.

FTII मध्ये आल्यावर थेटर आणि अभिनयाचं प्रशिक्षण सुरु केलं. १९७८ मध्ये सतीश शहांना त्यांचा पहिला सिनेमा मिळाला तो होता अरविंद देसाई यांचा अजिब दास्तान. या सिनेमातून पदार्पण केल्यानंतर बरेच छोटे मोठे रोल त्यांना ऑफर होऊ लागले. जाने भी दो यारो या सिनेमात सतीश शहांनी म्युन्सिपल कमिशनर डी मेलोचा रोल दमदारपणे निभावला. या भूमिकेसाठी त्यांना लोकांकडून बरंच कौतुक आणि प्रेम मिळालं. 

जाने भी दो यारो हा सिनेमा बॉलिवूडचा बेस्ट सिनेमा मानला जातो कारण यात नसरुद्दीन शहा, रवी बिस्वानी, सतीश कौशिक, पंकज कपूर, ओम पुरी सारखे जबरदस्त अभिनेते होते. हा सिनेमा त्याकाळी ब्लॉकबस्टर मानला गेला होता. यात सतीश शहाचं काम गाजलं होतं.

पुढे कैसे कैसे लोग, पुराना मंदिर, भावना, भगवान दादा, अम्रित, मैं बलवान, आग और शोला, कलियुग और रामायण, घरवाली बाहरवाली, याराना, कमांडो अशा बऱ्याच सिनेमांमध्ये सतीश शहांनी भरपूर भूमिका केल्या. ज्यावेळी खान पर्वाचा उदय होत होता त्यातसुद्धा सतीश शहा होते हं आपके है कौन, अकेले हम अकेले तुम, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे अशा सिनेमांमध्येही ते भाव खाऊन गेले. 

मैं हु ना सिनेमातला शिक्षक आपण कसा विसरू शकतो. ज्यात थुंकीने समोरच्याला ते अंघोळ घालायचे. शाहरुख खान सुद्धा सतीश शहांचा फॅन झाला होता इतका उत्तम रित्या तो रोल त्यांनी वठवला होता. मराठी, तेलगू, गुजराती अशा बहुभाषिक सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं.

१९८४ मध्ये भारतातली सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेली मालिका ये जो हे जिंदगी सतीश शहांनी मालिकेच्या ६० भागांमध्ये ६० वेगवेगळे पात्र साकारले होते. त्याकाळी त्यांचा अभिनय चांगलाच गाजला होता. यावरून ते किती दमदार अभिनेते होते याचा अंदाज येतो. 

२००४ मध्ये आलेली साराभाई vs साराभाई या सिरियलची त्यांना घराघरात पोहचवले. सुमित राघवन, रत्ना पाठक शहा आणि सतीश शहा यांनी अफलातून या मध्ये काम केलं होतं. अजूनही साराभाई मधल्या त्यांच्या अभिनयाची चर्चा होते.

इंद्रवदन साराभाई पासून ते जाणे भी डॉ यारो मधल्या डी मेलोपर्यंत असंख्य भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे  सतीश शहा खरंच मेहमूदचे वारसदार आहेत.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.