७२ वर्षांपूर्वी पाकिस्तानात अगदी धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली होती…

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य तर मिळालं पण त्याच बरोबर फाळणीचं शल्य देखील. भारत आणि पाकीस्तान यांच्यातील सांस्कृतिक कलाजीवनावर फाळणी मोठा ओरखडा उमटवून गेली. जे कलाकार तिकडे निघून गेले ते कायम इथल्या आठवणीत तळमळत राहिले. हिंदी सिनेमा आणि संगीत दोन्ही कडील रसिकांकरीता जिव्हाळ्याचा विषय होता.

शमशाद बेगम, प्राण, बी आर चोप्रा यांना लाहोरच्या आठवणी बेदम बेचैन करायच्या तर नूरजहां, चार्ली, शहानवाज हे कलाकार पाकीस्तानात गेले तरी त्यांचं मन मुंबईतच घुटमळत असायचं.

फेमस पिक्चर्सच्या ’आज की रात’ (१९४८) या सिनेमात शहानवाज यांनी भूमिका केली होती. बॉर्डर, एल ओ सी या सिनेमांचे दिग्दर्शक जे.पी दत्ता यांचे वडील ओ पी दत्ता या सिनेमाचे दिग्दर्शक होते. त्यांची शहानवाज यांच्याशी चांगली मैत्री होती. फाळणीच्या नंतर शहानवाजने पाकीस्तानची वाट धरली. तिकडे गेल्यावर ते याच व्यवसायात होते. १९५० साली पाकीस्तान मध्ये ’अनोखी’ या नावाचा सिनेमा बनवत होते त्या वेळी त्यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शना करीता ओ पी दत्ता ना बोलावले.

ओ पी दत्ता ’अनोखी’ सिनेमासाठी पाकिस्तानात गेले.

शूटींग चालू झालं. संपूर्ण सिनेमा संपवून दिवाळीला आपल्या घरी जाता येईल या हिशेबाने त्यांनी काम सुरू केले. पण काही कारणाने शूटींग लांबत चाललं होतं. आणि मध्येच दिवाळी आली. अर्धवट सिनेमा टाकून जाणं त्यांना प्रशस्त वाटेना. नाईलाजाने ते तिथेच थांबले.

निर्मात्याने दिवाळीच्या दिवसात नेहमी सारखे शूटींग शेड्यूल चालू ठेवले. लक्ष्मीपूजनाच्या रात्री देखील चित्रीकरण होते. ओ पी दत्ता मनातून खूप नाराज होते. घरच्यांची आठवण त्यांना सारखी येत होती. एवढा मोठा सण आणि आपण कुठे येवून पडलो हि भावना मनाला सलत होती. त्या रात्रीच्या शूटींग करीता ते स्टुडिओत गेले तर तिथे सर्वत्र अंधार होता.

कुणाचीच हालचाल दिसत नव्हती. सारं कसं चिडीचूप. आता मात्र ओ पी दत्ता वैतागले. एकतर ऐन दिवाळीत त्यांना थांबावे लागले आणि इथे शूटींगला कुणीच नाही. हि काय जीव घेणी क्रूर चेष्टा? संताप आणि दु:ख या भावनांनी चरफडतच स्टुडिओतून निघाले. भारतातील आपल्या प्रिय जणांच्या आठवणीने तर आणखी दु:खी झाले.

भावने पेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून ते ऐन दिवाळीत पाकिस्तानात थांबले होते आणि इथे निर्मात्याने त्या दिवशीचे शूटिंगच रद्द केले की काय?पण अचानक चमत्कार घडला! ओ पी दत्ता स्टुडिओच्या बाहेर पडताना मात्र अचानक सर्व दिवे एकदम लागले. सोबत फटाक्यांच्या आवाजाने वातावरण दणदणून गेलं.

दत्ता नी मागे वळून पाहिलं तर सिनेमातील सारी मंडळी तिथे उभी होती. शहानवाज सामोरे आले व त्यांनी दत्तांना मिठी मारली. त्यांना घेवून ते आत सेटवर गेले. दत्ता आश्चर्य चकीत होवून ते पाहत होते. आत लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी केली होती. सोबत दिवाळीचा फराळ होता. ओ पी दत्तांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या.

 शाहनवाज हात जोडून म्हणाले ’मेरे अजीज दोस्त, इस नाचीज की तरफसे दिवाली का ये तोहफा कबूल किजिएगा’ दत्तांनी मग यथा सांग पूजा केली. त्या साठी खास हिंदू पंडितला बोलावले होते. सर्वानी भरपूर फटाके उडवले. रात्री शूटींग झालंच नाही पण सर्वांनी धमाल केली. दिवाळीच्या चविष्ट फराळाचा इंतजाम शहनवाज यांनी केला होता.

ओ पी दत्ता यांना दिवाळीचा आनंद पाकीस्तानात घेता आला.

जाता जाता.. थोडंस ओ पी दत्ता यांच्या बद्दल. आजच्या पिढीला ठावूक असलेल्या जे पी दत्ता यांचे ते वडील. १९४८ सालच्या देव आनंद आणि सुरैय्या यांच्या ‘प्यार की जीत’ पासून त्यांची कारकीर्द सुरु झाली. १९५९ पर्यंत ते दिग्दर्शन करीत होते. नंतर त्यांनी संपूर्ण लक्ष स्क्रिप्ट रायटिंग वर घातले. राजा खोसला यांच्या सोबत त्यांचे मोठे असोसिएशन होते.

लेखक, पटकथाकार म्हणून ते प्रचंड गाजले. गुलामी (१९८५), यतीम (१९८८) बोर्डर (१९९७) रेफ्युजी (२०००) एल ओ सी कारगिल (२००३) उमराव जान (२००६) हे त्यांच्या लेखणीतून उतरलेले चित्रपट प्रचंड गाजले. ऐंशीच्या दशकातील अभिनेत्री बिंदिया गोस्वामी चे सासरे होते. खरं तर ओ पी दत्ता यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. पण कुणालाही त्याची आठवण नाही. वयाच्या ९० व्या वर्षी ९ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज दिवाळीचा सण! पण ७२ वर्षापूर्वी पाकिस्तानात साजऱ्या झालेल्या या दिवाळीचा किस्सा तुम्हाला नक्कीच आनंद देवून जाईल.

-भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.