ऐंशीत पंच्याऐंशी.. मायकल ड्रायवरचा सुसाट प्रवास…

‘मैं बचपन से ही ड्रायव्हर बननां चाहतां थां’ असं काही ते बोलल्याचं आमच्या ऐकण्यात नाही. तरिही ते बचपन से ड्रायव्हर आहेत. वयाची ८४ वर्ष त्यांनी ड्रायव्हिंग करण्यातच घालवली आहेत. त्यांचं आजचं वय १०३ वर्षे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी ब्रिटीश सैन्याची सेवा केलीये आणि तेव्हापासून आजतागायत ते ड्रायव्हिंग करताहेत. आम्ही तुम्हाला सांगतोय कर्नाटकातील मंगलोरमधील मायकेल डिसुझा यांची गोष्ट.

१६ ऑक्टोबर १९१४ रोजी उटीमध्ये चार्लसन आणि मेरी डिसुझा या दांपत्याच्या पोटी जन्मलेलं हे बाळ. वयाच्या १८ व्या वर्षी सर्वप्रथम वडिलांची ट्रक त्यांनी चालवली आणि तिथूनच हा सिलसिला सुरु झाला, जो आजपर्यंत थांबायला तयार नाहीये. त्याच वर्षी म्हणजे १९३२ मध्ये ते ब्रिटीश सैन्यात ड्रायव्हर म्हणून भरती झाले आणि पुढील १० वर्षे त्यांनी तिथं काम पाहिलं. पुढे लग्नानंतर ते आधी मैसूरला आणि मग मंगलोरला स्थलांतरित झाले. समाजकार्य विभागात कार्यरत असताना त्यांनी ट्रक, ट्रॅक्टर आणि रोड रोलर सुद्धा चालवले.

वयाच्या साठीनंतर जिथं सामान्य माणसाला निवृत्तीचे वेध लागतात, तिथं हा अवलिया गेली ८५ वर्षे ड्रायव्हिंग करतोय. देशातील रस्त्यावरील सर्वाधिक वयाच्या ड्रायव्हर्सपैकी एक म्हणून ते ओळखले जातात. विशेष म्हणजे आजही ते तेवढ्याच सफाईदारपणे मंगलोरच्या रस्त्यावर गाडी चालवतात. ८५ वर्षाच्या ड्रायव्हिंग कारकिर्दीत फक्त एकदाच सीट बेल्ट न घालता गाडी चालवल्यामुळे त्यांना दंड आकारण्यात आला. तेव्हाही त्यांचं वय आणि ड्रायव्हिंगचा अनुभव लक्षात घेऊन आरटीओ अधिकाऱ्याने त्यांच्याकडून दंड न घेता, स्वतःच तो भरून त्यांना सोडून दिलं.

konkancatholic

तुम्हा-आम्हाला गाड्यांच्या ज्या ब्रॅण्डची भुरळ असते, त्यातल्या बहुतेक सर्व ब्रॅण्डच्या गाड्या त्यांनी चालवून झाल्यात. १९५९ सालानंतर ते सातत्याने त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स अपडेट करत आहेत. आता तर आर.टी.ओ. अधिकाऱ्याने देखील त्यांना ‘लाइफ टाईम’ व्हॅलीडिटीसह लायसन्स बनवून देण्याची तयारी दर्शवल्याचं ते हसत हसत सांगतात.

बरं हा माणूस काही जगण्याची भ्रांत म्हणून ड्रायव्हिंग करत नाही, तर ड्रायव्हिंग हे या माणसाचं पॅशन आहे. ड्रायव्हिंग केल्याशिवाय हा माणूस जिवंत नाही राहू शकत. जोपर्यंत आपल्या परतीच्या प्रवासासाठीची गाडी येणार नाही, तोपर्यंत आपण ड्रायव्हिंग करतंच राहू, असा संकल्पच मायकेल यांनी सोडलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.