हे ९ वर्षांच पोरगं इंजिनिरिंग पास होणाराय, ते पण विदाऊट ATKT…
इथं भल्याभल्यांना इंजिनीअरींग झेपत नाही. एका विषयात आमचे पोरं इथं सतऱ्यांदा नापास होत्यात. कण्हत कुथत रट्टा मारत चार वर्षांचा इंजिनीअरींगचा अभ्यासक्रम सात-आठ वर्षात पुर्ण करून बेरोजगारांच्या भरतीत एकदाचे सामील होत्यात. कारण आमच्या पोरांसाठी इंजीनिअरींग लई अवघड आणि डोक्याला शाँट देणारा विषय.
पण भिडूनो, 9 वर्षाच्या एका बारक्या पोराला पुढच्या महिन्यात इंजिनीअरींगची पदवी मिळणार आहे. अन् तो जगातला सगऴ्यात कमी वयात डिग्री घेणारा विद्यार्थी ठरणार आहे.
तुम्ही म्हणतान कसं काय? जरा धीर धरा की. ते सांगतोत की, च्यायला शेवटच्या दिवशी परिक्षा फाँर्म भरणारे आपून. पेपर सुरू व्हायचा दहा मिनीटं अगोदर हाँल तिकीट घेऊन पेपरला बसणारे. शेजारी-पाजाऱ्याचा पेन घेऊन पांढरा पेपर थापा मारून काळा करणारे. पण इथं मात्र अजीबात दम काढत नाहीत.
तर मॅटर असा आहे,
बेल्जियम शहरात लाँरेंट सिमंस नावाचं 9 वर्षाचं पोरगं आहे. याच पोराला आइंडहोवन यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी (टीयूई) या विद्यापीठातून पुढच्या महिन्यात इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग या विषयाची डिग्री मिळणार आहे. म्हणजेच ते अवघ्या नवव्या वर्षी इंजिनीअरींगमध्ये पदवीधर होणार आहे.
लाॅरेंट सिमंसचा जन्म 2010 चा. त्याच्या वडिलांचं नाव एलेक्जेंडर सिमोंस तर आईचं नाव लिंडा. लाॅरेंट लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि तल्लख होता. सहाव्या वर्षी त्याला जेव्हा शाळेत घातलं तेव्हा त्यांची हुशारी पाहून शिक्षकही हैराण झाले.
लाॅरेंट बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा होता. शिकवलेली प्रत्येक गोष्ट तो लगेच समजून घ्यायचा. त्याची ही हुशारी ऐकून त्याचे आई-वडीलही आश्चर्यचकित झाले. त्याच्या सोबत शिकत असणाऱ्या मुलांपेक्षा लाॅरेंट कितीतरी पुढं गेला होता.
त्याची अभ्यास करण्याची पद्धत आणि समजून घेण्याची क्षमता पाहून एवढ्या कमी वयातही लॉरेंट ला आइंडहोवन प्रौद्योगिकी विश्वविद्यालयाने इंजिनीअरिंगचं शिक्षण घेण्याची परवानगी दिली.
इलेक्ट्रिक इंजिनीअरींग हा त्याचा आवडता विषय आहे. याच विषयात त्याने विद्यापीठात शिक्षण सुरू केलं. या विद्यापीठातही त्यानं मन लावून आपला अभ्यास केला आहे. अन् आपला अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. त्यामुळेच पुढच्या महिन्यात त्याला डिग्री मिऴणार आहे. तसंच तो जगामध्ये कमी वयात डिग्री मिऴवणारा विद्यार्थी ठरणार आहे.
त्याचे शिक्षक सांगतात की, लाँरेंट फक्त हुशारच नाही तर शांत आणि प्रेमळ आहे. त्यांची शिकण्याची जिद्द अफाट आहे. समजून घेण्याची क्षमता चांगली आहे. तो फक्त वाचत नाही किवा रट्टा मारत नाही तर प्रत्येक गोष्ट मन लावून समजून घेतो. त्यामुळे तरूण विद्यार्थ्यांसाठी तो एक प्रेरणास्रोत आहे.
त्याचे घरचे सांगतात की, लाॅरेंट फक्त अभ्यासच करत नाही तर भरपुर मस्ती सुद्धा करतो. त्याला खेळणे आवडत नाहीत. तो आपल्या आवडत्या कुत्र्यासोबत आपला वेळ घालतो. डिग्री भेटल्यावर लाॅरेंट मजा मस्ती करण्यासाठी जपानला फिरायला जाणार आहे.
इंजिनीअरींगची डिग्री मिळाल्यानंतर लाॅरेंटला इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये पीएचडी करायची आहे. त्याचसोबत तो मेडीकलच्या डिग्रीसाठी सुद्धा अॅडमिशन घेणार आहे.
लाॅरेंटची शिकण्याची जिद्द आणि चिकाटी पाहता आपल्या इथलंच्या पोरासोरांनी त्याचा आदर्श घ्यायला हवा. मोठं मोठी स्वप्नं पाहून ध्येय गाठायला हवीत.
हे ही वाच भिडू.
- भारतात औद्योगिक क्रांती करणाऱ्या जे.आर.डी टाटानांही इंजिनियरिंग करायला जमल नाही.
- पुराना मंदीर मधलं भूत खऱ्या आयुष्यात इंजिनियर होतं, तेही IIT पासआऊट.
- अमेरिकेच्या नाकावर टिच्चून मराठी माणसाने भारताचा पहिला सुपर कंप्युटर बनवला.