बारमधली आशिकी असो किंवा ट्रॅक्टरवर वाजणारा राझ, नव्वदीची पिढी त्यांना विसरणार नाही..

आजही कधी रानात गेल्यावर नांगरणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर राज, धडकन, दिवाना या सिनेमांची गाणी वाजत असतात तेव्हा या गाण्यांचे संगीतकार नदीम-श्रवण हटकून आठवतात. अक्षरशः गाण्यात जीव ओतला असावा इतकं मेलडीयस म्युझिक. ९०च्या दशकात जितके चित्रपट हिट झाले त्याला कारण म्हणजे नदीम-श्रवण या जोडीचं म्युझिक होतं. मुंबई अंडरवर्ल्डच्या संपर्कात आल्याने हि जोडी तुटली. नदीम-श्रवण या जोडीतील श्रवण कुमार राठोड यांचं आज निधन झालं.

श्रवण कुमार राठोड यांचा जन्म १३ नोव्हेम्बर १९५४ साली झाला. त्यांचे वडील हे शास्त्रीय संगीतातले पारंगत पंडित होते. धृपद या गायन प्रकाराचा बादशहा म्हणून त्यांची ओळख होती. वडिलांमुळे साहजिकच घरात सांगीतिक वातावरण होतं. श्रवण कुमार यांनी वयाच्या आठव्या वर्षी तबला शिकला. श्रवण कुमार यांचे दोन भाऊ सुद्धा गायक आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांचं मोठं नाव आहे ते म्हणजे रूप कुमार राठोड आणि विनोद राठोड.

श्रवण कुमार राठोड यांना मुझिकचं वेड लहानपणापासून होतं. आरडी बर्मन आणि कल्याणजी-आनंदजी यांच्या रेकॉर्डिंग ते तासंतास ऐकत बसत. डोक्यात कायम संगीत बनवण्याचं काम चालू असायचं. नदीम-श्रवण हि जोडी कशी बनली याचा पण एक भारी किस्सा आहे.

श्रवण कुमार यांच्या वडिलांकडे हरीश नावाचा एक मुलगा संगीत शिकायला यायचा. एकदा त्याच्या कॉलेजमध्ये गाण्याची स्पर्धा होती आणि त्याने त्या स्पर्धेत भाग घेतलेला होता. तेव्हा त्याने श्रवण कुमार यांना गाणं कसं गातो ते बघायला या म्हणून सांगितलं. प्रशिक्षक म्हणून श्रवण कुमार गेले तेव्हा तिथे नदीम बसलेले होते तेही अर्थात प्रशिक्षक म्हणूनच आले होते. तिथून त्या दोघांची ओळख झाली , संगीत क्षेत्रात काम करण्याची दोघांची इच्छा होती , तिथून त्यांचे विचार पटले.

नदीम श्रवण या जोडीने पहिल्यांदा शास्त्रीय संगीतातील वाद्यांचा अत्यंत चतुराईने वापर करून अजरामर संगीत निर्मिती केली. बासरी, सितार आणि शेहनाई सारख्या वाद्यांचा उपयोग त्यांनी त्यांच्या जवळपास सगळ्याच गाण्यात केला. आधुनिकतेकडे जाताना आपल्या मूळ वाद्यांचा विसर पडता कामा नये अशी या जोडीची भावना होती.

बराच काळ ते वेगवेगळ्या गाण्यांवर काम करत राहिले. त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो भोजपुरी चित्रपटातून. कशी हिले पटना हिले हे या जोडीचं पहिलं गाणं जे मन्ना डे यांनी गायलं होतं. मैने जिना सिख लिया हा या जोडीचा पहिला चित्रपट मात्र गाणी तितकी चालली नाही. पुढे बराच काळ छोटेमोठे प्रोजेक्ट ते करत राहिले.

नदीम- श्रवण या जोडीचं पहिलं गाणं चित्रपटात येऊन थोडेफार नाही तर पार १७ वर्ष उलटून गेली होती. सततच्या स्ट्रगलला वैतागून नदीमने श्रवणला सांगितलं कि,

तू तुझा गाण्यातला स्ट्रगल चालू ठेव , मी आता वर्ष दीड वर्ष माझा कपड्याचा बिझनेस वाढवतो मग पुढे नशिबात असेल तेव्हा आपण आपली गाणी चित्रपटात आणूच.

नदीम-श्रवण हि जोडी चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी ३००-४०० गाणी तयार करून बसलेली होती. दिग्दर्शकाकडे जेव्हा हि जोडी गाणी घेऊन जायची तेव्हा दिग्दर्शक त्यांना सांगायचं कि तुमचं म्युझिक हे मॅच्युअर नाही, अनु मलिक सारखं संगीत बनवा. यावर हि जोडी पारच नाराज झाली.

एका चित्रपटात अनुराधा पौडवाल यांनी नदीम-श्रवण यांचं गाणं गायलं आणि त्यांना ते इतकं आवडलं कि त्यांनी गुलशन कुमार यांच्याकडे या जोडीची शिफारस केली. गुलशन कुमार यांच्या ओळखीने हि जोडी महेश भट यांना सहज म्हणून भेटायला गेली आणि त्यांनी काही ऐकवली. त्यातली चार गाणी महेश भटांना प्रचंड आवडली ती गाणी होती,

नजर के सामने जिगर के पास…

धीरे धीरे से मेरी जिंदगीमें आना…

दिल हे के मानता नहीं…

में दुनिया भुला दूंगा ‘तेरी चाहत में…….

महेश भटांनी तिथेच घोषणा केली कि आपल्या चित्रपटात हि गाणी असतील आणि पिच्चरचं नाव असेल आशिकी……..

चित्रपट प्रदर्शित झाला आणि जिकडे तिकडे नदीम-श्रवणची गाणी वाजू लागली. या जोडीने राजा हिंदुस्थानी हा चित्रपट संगीतबद्ध केला. यातील सगळीच गाणी प्रचंड हिट झाली. आये हो मेरी जिंदगीमें, पूछो जरा पूछो, तेरे इश्क में नाचेंगे अशी तुफान हिट गाणी दिली. या चित्रपटातील परदेसी परदेसी जाना नही हे गाणं तरुणाईने चांगलंच डोक्यावर घेतलं, आजही हे गाणं बऱ्याचशा दारूच्या दुकानात वाजतं.

९०च्या दशकातील म्युझिकल हिट्स देणारी एकमेव जोडी म्हणजे नदीम-श्रवण.

राज, सडक, साजन, दिलवाले, फुल और कांटे अशा अनेक चित्रपटांना त्यांनी यादगार म्युझिक दिलं. केवळ संगीत दिग्दर्शक नदीम-श्रावण आहेत म्हणून निर्माते चित्रपटांच्या ऑफर त्यांना देऊ लागले.

त्यांच्या प्रत्येक सिनेमात कुमार सानूचा आवाज असायचा. कुमार सानू, उदित नारायण, अलका याद्निक, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम या नव्वदच्या दशकातल्या सगळ्या तरुण गायकांना नदीम श्रवण या संगीतकारांनी समोर आणलं.

पुढे गुलशन कुमारच्या हत्येमध्ये नदीम यांचा हात आहे म्हणून बोभाटा झाला आणि हि जोडी काही काळानंतर तुटली. मात्र त्यांची गाणी आजही लोकांच्या तोंडावर आहेत.

या जोडीतील श्रवणकुमार राठोड यांचं आज करोनामुळे निधन झाले.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.