ते महाराष्ट्राचे ९ दिवसाचे मुख्यमंत्री होते.

अहो मला रस्त्यावरुन आणून यशवंतरावांनी मंत्रीमंडळात बसवलं आहे. उद्या पुन्हा रस्त्यावर जायची वेळ आली तर मग कशाला वाईट वाटेल?

सिंहासनमधल्या डिकास्टा सारखा हा डॉयलॉग. आठवतोय न कामगार नेता डिकास्टाचा डॉयलॉग. तो कांताला म्हणतो,

“अरे हा डिकास्टा दुकानाच्या फळीवर झोपलाय, स्टेशनच्या नळावर त्यानं अंघोळ केलेय, भेळपुरीवर दिवस काढलेत सोन्याचा चमचा घेवून जन्माला आलेला बुर्झ्वा कामगार पुढारी नाय हा. वेळ आली ना तर परत तसच जगू.” 

त्याच कॉन्फिडन्सने मला यशवंतरावांनी रस्त्यावरून आणून मंत्रीमंडळात बसवलं आहे, उद्या पुन्हा रस्त्यावर जायची वेळ आली तर कशाला वाईट वाट्टेल अस म्हणणारा महाराष्ट्रात एक नेता होता.

सुदैवाने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि दुर्दैवाने ते हंगामी होते. आणि त्यांचा काळखंड देखील फक्त नऊ दिवसाचा होता. पी.के. सावंत म्हणल्यानंतर अनेकांना ते आठवतात दापोलीत असणाऱ्या पी.के. तथा बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठामुळे.

पी.के.सावंत कोकणातले. आधुनिक परशुराम असा त्यांचा गौरवपुर्ण उल्लेख केला जात असे. एक शाळा मास्तर म्हणून आपल्या आयुष्याची कारकिर्द सुरु करणारा हा मास्तर. त्यांनी पुढे वकिलीचं शिक्षण घेतलं. आपल्या वकिलीच्या जोरावर या माणसाने “इंटक” अर्थात इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेसच्या संघटनेच्या बांधणीत महत्वाचं योगदान दिलं. 

या संघटनेच्या जोरावरच कॉंग्रेसकडून निवडणुक लढवली व पहिल्यांदा लोकप्रतिनिधी या नात्याने नगरसेवक म्हणून निवडून आले. 

साधारण नगरसेवक झाल्यानंतर माणूस काय करतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण पी.के. वेगळे होते. वेगळ्या माणसांच्या वेगळ्या गोष्टी असतात. मुंबईच्या महानगरपालिकेत निवडुन आल्यानंतर नगरसेवकांसाठी खास प्रशिक्षण वर्ग त्यांनी राबवले होते. सर्व पक्षीय नगरसेवकांना एकत्र घेवून अर्ज कसा करावा? प्रश्न कसे उपस्थित करावे? चर्चेत मुद्दे कसे मांडावेत? असे प्रश्न ते घेत असत. 

कदाचित भारतीय राजकारणाच्या इतिहासात अशा प्रकारचे क्लासेस घेणारे ते एकमेव नगरसेवक असावेत.

असा माणूस फक्त नगरसेवक म्हणून राहता नये हे तेव्हाच्या कॉंग्रेसने जाणलं. यातूनच त्यांना वेंगुर्ला मधून आमदार म्हणून निवडुन आणण्याचा निर्धार करण्यात आला. ते १९५२ च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडुन आले पुढे संसदिय सचिव म्हणून कामकाज करु लागले. 

याच दरम्यान यशवंतराव चव्हाणांची अभ्यासू नजर या माणसावर रोखली गेली. पुढे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. असा माणूस आपल्या मंत्रीमंडळात असावा म्हणून यशवंतरावांनी ते आमदार नसताना त्यांचा समावेश महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळात केला. 

पी.के. सावंत यांच्याकडे कृषी खाते, गृह खाते अशी महत्वाची खाती होती. या खात्यांचा कारभार करताना त्यांनी राहूरी, अकोले येथील कृषी विद्यापीठांची निर्मीती केली. ग्रामविकासासाठी महत्वपुर्ण ठरणाऱ्या योजनांची बैठक त्यांच्याच काळात मांडण्यात आली. त्यांनी कामे तर भरपूर केली पण इथे सांगण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे सत्तेचा मोह. 

पी.के. सावंत यांची कारकिर्द इंटक मधून सुरू झाली होती.

राज्याच्या मंत्रीमंडळात असताना इंटकच्या अध्यक्षांच निधन झालं. या कारणामुळे राज्यातील मंत्रीपदाचा राजीनामा देवून इंटकची जबाबदारी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

त्यांचा हा निर्णय यशवंतराव चव्हाणांच्या कानावर गेला तेव्हा यशवंतरावांनी त्यांची मनधरणी केली. तुलनेनं मंत्रीपद कितीतरी मोठ्ठ होतं पण संघटनेचा प्रश्न म्हणून ते मंत्रीपदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. यशवंतराव चव्हाणांनी मात्र त्यांची मनधरणी करुन त्यांना आपल्या पदावर कायम राहण्याची विनंती केली. या घटनेची दूसरी बाजू म्हणजे कोणत्याही प्रकारे त्यांना अभ्यासू मंत्री गमवायचा नव्हता. 

पुढे मारूतराव कन्नमवार यांचे निधन झाले त्यावेळी हंगामी मुख्यमंत्री म्हणून त्यांना तात्काळ जबाबदारी स्वीकारण्यास सांगण्यात आलं. पुढच्या नऊ दिवसातच त्यांना या पदाचा कार्यभार वसंतराव नाईक यांच्याकडे सुपुर्त करावा लागला. कोणताही मोह न ठेवता हा नेता नऊ दिवसाच्या कार्यभारातून मोकळा झाला.

२५.११.१९६३ ते ४.१२.१९६४ हा त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार. आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदांची यादी पहात असताना तीन नंबरवर कधीकधी हंगामी म्हणून त्यांचा उल्लेख केला देखील जातो. सध्या मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले नाही म्हणून व्हायरल होणाऱ्या लिस्टमध्ये देखील यांच नाव असत.

वास्तविक कोणत्याही एका जातीचा म्हणून महाराष्ट्राच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी आजवर काम केलं नाही ही समाधानाची गोष्ट, पण हंगामी असणाऱ्या पीके सावंत यांना “त्या” व्हायरल लिस्टमध्ये मुख्यमंत्री म्हणून स्थान दिलं जातं हे हि चांगलच आहे म्हणा. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.