लोखंडवाला शूटआउट करणाऱ्या ऑफिसरमुळे देशभरात एटीएसची सुरवात झाली..

१६ नोव्हेम्बर १९९१. स्थळ लोखंडवाला कॉम्प्लेक्स मुंबई

इतरांसाठी नेहमी सारखा दिवस होता पण लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये  राहणाऱ्यांना जाणवलं कि आज काहीतरी वेगळे घडत होते. तेथे युनिफॉर्ममधल्या आणि साध्या वेषातल्या मंडळींचा वावरही वाढला होता. खास पोलीस कमांडो हातात मोठमोठ्या गन्स घेऊन स्वाती बिल्डिंगच्या दिशेने निघाले होते.

पोलिसांना आत शिरताच एक जीप आणि मारुती कार दिसली. यातील एका गाडीचे रजिस्ट्रेशन गुजरातमधले होते तर एका गाडीचे मध्य प्रदेशातले होते. पोलिसांना खात्री झाली होती की या ठिकाणी आपले सावज लपले आहे.

मग एंट्री झाली पोलिस अधिकारी ए. ए. खान यांची. 

आफताब अहमद खान हे १९६३ सालच्या आयपीएस महाराष्ट्र केडरचे ऑफिसर.  त्यांनी जुन्नरच्या डिवायएसपी पदापासून सुरवात केली होती ते मुंबई पोलीसचे डीसीपी, ठाण्याचे ऍडिशनल कमिशनर, सीआरपीएफ पंजाबचे डीआयजी, मुंबई क्राईम ब्रांचचे सीपी आणि सध्या स्टेट इंटेलिजन्स ब्युरोचे डीआयजी या पदावर होते.

धाडसी व जाँबाज अधिकारी अशी त्यांची ओळख होती. त्यांचं खबऱ्यांचं नेत्रावरक तगडं होतं. अशाच एका खबरीने त्यांना टीप दिली होती की डी गॅंगचे माया डोळस, शार्प शुटर दिलीप बुवा असे एकूण सात गँगस्टर तिथे लपले आहेत.

ए.ए.खान यांनी  घटनास्थळी पोहचून स्वाती बिल्डिंग भोवती चक्रव्युव्ह रचला, अधिकाऱ्यांना, कमांडोजना त्यांच्या जागा आखून दिल्या.

अनेक मर्डर, खंडणीची प्रकरणे नावावर असलेला माया डोळस मुंबई पोलिसांच्या हिटलिस्ट वर मोस्ट वॉन्डेट होता. त्याला अटक देखील करण्यात आली होती मात्र त्याने पोलिसांना गुंगारा देऊन यशस्वी पलायन केले होते. तब्बल ९६ दिवस तो पोलिसांपासून लपून होता. तो याच बिल्डिंगमध्ये आहे आणि तिथूनच खंडणीसाठी धमक्या देत आहे, अशी पक्की माहिती पोलिसांकडे होती.

पोलिसांनी सर्व रहिवाशांना घराचे दरवाजे बंद करून घेण्याच्या सूचना दिल्या. कोणाला फोनही करू नका, असे सांगितले. माया डोळसला शरण येण्याचे आवाहन करण्यात आले.

पण मायाने उलट पोलिसांवर गोळीबार केला. यामुळे त्याचं नेमकं लोकेशन ए.ए.खान यांच्या लक्षात आलं.  त्यांनी मायाला ‘हथियार नीचे डालके सरेंडर हो जाओ, हम तुम्हे नही मारेंगे’ असे सांगितले. पण त्याने त्याला प्रतिसाद न देता उलट बिल्डिंग मध्ये शिरलेल्या कमांडोज आणि पोलिसांवर गोळ्या झाडल्या.

माया डोळस काही न ऐकता पोलिसांवर गोळ्या चालवण्याचे आदेश आपल्या साथीदारांना देत होता. फ्लॅटच्या बाहेरून देखील गोळ्या झाडल्या जात आहेत, हे लक्षात आल्यावर ए.ए.खान यांचे कमांडोज थेट गच्चीवर गेले आणि तिथून त्यांनी खालच्या मजल्यावर हल्ला केला.

पोलिसांवर  जिन्यातून गोळ्या झाडल्या गेल्या. पण बुलेटप्रुफ जॅकेटमुळे ते बचावले. त्यांनी गोळ्या झाडणाऱ्या दोघा गँगस्टरना ठार केले. आणि फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत माया डोळस एके-४७ रायफल घेऊनच बसला होता.

पोलिसांनी शिताफीने त्याच्यावर फायरिंग केले आणि माया डोळसचा खात्मा केला. हेच ते सुप्रसिद्ध लोखंडवाला शूट आउट. पोलिसांनी दिवसाढवळ्या नागरी वस्तीमध्ये केलेल्या या कारवाईच कौतुक देखील झालं आणि टीका देखील झाली. या शूट आउट मागे दाऊद इब्राहिमचा हात आहे असं देखील बोललं गेलं.

मात्र या लोखंडवाला शूटआऊट मुळे एक गोष्ट झाली, मुंबई पोलिसानी अंडरवर्ल्डची दहशत मोडून काढण्यास सुरवात केली आहे हे सिद्ध झालं होतं.

हे केलं होतं ए.ए.खान यांच्या अँटी टेररिस्ट स्क्वाडने.

मुंबईत संघटित गुन्हेगारी तिच्या शिखरावर होती. दुबईत बसलेल्या दाऊद इब्राहिम पासून ते गल्लीतल्या छोट्या मोठ्या भाई पर्यंत प्रत्येकजण आपल्या टोळ्या करून दहशत पसरवत होता. सुरवातीला सुऱ्या कोयत्याने भांडणारे हे गँगस्टर आता एके ४७ सारख्या बंदुका वापरू लागले होते. जुन्या झालेल्या बंदुका घेऊन पोलीस याच्याशी कितपत लढा देणार हा प्रश्न होता.

यातूनच ए.ए.खान यांनी दहशतवाद विरोधी पथकाच्या स्थापनेची मागणी केली.

ए.ए.खान हे खलिस्तानी चळवळ ऐन भरात होती तेव्हा पंजाबमध्ये सीआरपीएफच्या जवानांसोबत तिथे पोस्टिंगला होते. या काळात दहशतवाद कसा फोफावतो हे त्यांनी पाहिलं होतं. पाकिस्तानी आयएसआयच्या फंडिंगमुळे मुंबईच्या अंडरवर्ल्डची वाटचाल देखील त्याच दिशेने चालली होती. याला रोखायचा झालं तर मुंबई पोलिसांची देखील हत्यारबंद टीम असणे हि काळाची गरज होती.

ए.ए.खान यांनी अमेरिकेच्या लॉस एंजलिस पोलीस डिपार्टमेंट (एल.ए.पी.डी.) ची Special Weapons & Tactics टीम म्हणजेच SWAT चं काम पाहिलं होतं. त्यांनी तत्कालीन सरकारकडे मुंबईमध्ये देखील एक कमांडो टीम पाहिजे यासाठी पाठपुरावा केला. अखेर डिसेंबर १९९० मध्ये याला हिरवा कंदील मिळाला.

याला नाव देण्यात आलं एटीएस. (दहशतवाद विरोधी पथक)

महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात, उत्तरप्रदेश,केरळ, बिहार या राज्यातही एटीएसचे स्थापना करण्यात आली. ए.ए.खान यांनी स्वतः अत्यंत कार्यक्षम आणि धाडसी अधिकारी शोधून त्यांची हि टीम तयार केली. त्यांना खडतर प्रशिक्षण देण्यात आले. कोणतेही संकट आले तर त्याला सामोरे जाण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्यासाठी लागणारे सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

लोखंडवाला शूटआऊट नंतर मात्र या एटीएस वर प्रचंड टीका झाली. त्यांना बरखास्त देखील करण्यात आले. पण १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर एटीएसचे महत्व ओळखून त्यांची पुनर्र्चना करण्यात आली.

तेव्हा पासून गेली अनेक वर्षे एटीएसची टीम देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राण पणाला लावून लढत आहे. आटा पर्यंत या स्क्वाडच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पराक्रमासाठी २७ गॅलंट्री अवॉर्ड मिळाले आहेत. २००८ सालच्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी एटीएस सर्वात आघाडीवर होती मात्र याच हल्ल्यात महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Kunal shahuraje says

    मुंबईत आजपर्यंत जितकेही encountr झाले त्यात दाऊद चा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसा भाग होता?

Leave A Reply

Your email address will not be published.