कधीकाळी कोल्हापुरात पाळीव असलेला चित्ता ७० वर्षांनंतर भारतात परतणार आहे

भारतात कोण स्वतःला वाघ म्हणतो तर कोण स्वतःला सिंह. आपल्या आजूबाजूला देखील अशा वाघ-सिंहाची कमी नाहीये. आत्ता तर भाजपमध्ये देखील वाघांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दूसरीकडे गुजरातचे सिंह संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत.

आपला देश बहुतेक जगातला एकमेव देश असेल तिथं वाघ आणि सिंह त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सापडत असतील.

पण जंगलांच्या या दोन राजांचा स्वॅग ज्यांच्यापुढे फिका पडतो तो तो म्हणजे चित्ता.ताशी १२० किलोमीटरपर्यंत पळू शकणारा जगातल्या या सगळ्यात फास्ट प्राण्याची गुमनाम बादशहाची ऐट ना सिंहाला मॅच होते ना वाघाला.

आणि महत्वाचं म्हणजे कधीकाळी चित्तेसुद्धा भारतात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सापडत होते. मात्र पुढे मोठ्या प्रमाणात शिकार केली गेल्याने ते नामशेष झाले. मात्र आता या चित्यांची भारतात पुन्हा एंट्री होणार आहे. भारत सरकार या वर्षी ऑगस्टपर्यंत दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात चित्ते आणण्याच्या तयारीत आहे.

ऍक्शन प्लॅन फॉर इंट्रडक्शन ऑफ चित्ता इन इंडिया अंतर्गत भारतात चित्ते आणण्यात येणार आहेत.
प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत येत्या ५ वर्षात ५० चित्ते आणले जातील अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी  याआधी दिली होती.

मात्र आता लवकरच चित्ता मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात दिसणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. जर सरकारने आखलेला प्लॅन बरोबर गेला तर चित्यांची पहिली जोडी ऑगस्ट महिन्यात भारतात येण्याची शक्यता आहे.

15 ऑगस्टला देश स्वातंत्र्याचे ७५ वर्षे साजरी करत असताना चीत्यांचे दर्शन होण्याची देखील शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. 

चित्यांना ठेवण्यासाठी मध्य भारतातील सुमारे १० ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते त्यापैकी मध्य प्रदेशातील कुनो पालपूर हे चित्त्यांसाठी सर्वात योग्य अधिवास ठरेल असा निष्कर्ष काढण्यात आला.

 कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये सुमारे २१ चित्ते सामावून घेण्याची क्षमता असल्याचं सांगण्यात येतं.

तसं बघायला गेलं तर भारतातील चित्यांच्या जवळची प्रजात इराणमध्ये सापडते. पण तिथंच ते इतक्या कमी प्रमाणात आहेत की त्यांना भारतात आनणं शक्य नाहीये त्यामुळे थेट आफ्रिकेतून चित्ते भारतात आणले जाणार आहेत.त्यामुळं भारतात पुन्हा चित्ते दिसण्यास सुरवात होईल.

१९५२ नंतर भारतात एकही चित्ता सापडल्याची नोंद सापडत नाही.

ऐतिहासिक नोंदीनुसार भारतातील शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार १९४७ मध्ये कोरिया, मध्य प्रदेशातील महाराजा रामानुज प्रताप सिंग देव यांनी केली होती.

मुघलांच्या काळात देखील भारतात चित्ते मुबलक प्रमाणात होते. खरं तर मुघल सम्राट, अकबरकडे एकट्या 9,000 पेक्षा जास्त चित्ते होते. उच्चभ्रू आणि राजघराण्यातील लोक खेळ-शिकारासाठी प्राण्याची शिकार करत असत आणि वाघांच्या तुलनेत चित्ता हे सोपे शिकार होते. त्यामुळं चित्त्यांची संख्या भारतात झपाट्याने कमी होत गेली.

ब्रिटीश राजवटीत अतिशिकारामुळे हा प्राणी नामशेष झाला आणि तज्ज्ञांनी असं ही मत व्यक्त केलं आहे की चित्त्यांना जगण्यासाठी भारतात पुरेसा अधिवास आणि भक्ष्य देखील होते परंतु शिकारीमुळे हा प्राणी नामशेष झाला.

चित्यांचा विषय निघाला तर कधीकाळी कोल्हापुरात शिकारीसाठी पाळलेल्या चित्यांचा विषय आपसूकच येतो.

कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज, त्यांच्यानंतर राजाराम महाराजांनी चित्यांकडून शिकार करून घेण्याचा छंद जोपासला होता.
विशेषतः शाहू महाराजांच्या काळात चित्ता शिकार ज्यामध्ये चित्यांचा वापर करून काळविट, हरणं यांची शिकार केली जायची. पूर्वी चित्त्यांना शिकारीसाठी बैलगाडीतून नेले जाई. पण ही पद्धत तितकीशी सोयीस्कर नव्हती. त्यामुळे शाहू महाराजांनी खास चित्त्यांसाठी “ब्रेक” ही चार घोड्यांच्या गाडी बनवून घेतली होती.

विशेष म्हणजे चित्ते पाळण्यासाठी, त्यांना शिकारीचं प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापूरमध्ये विशिष्ट समुदायच होता.

त्यांना चित्तेवान असं म्हटलं जायचं.चित्त्यांच्या छाव्यांना पकडणे, त्यांना माणसाळविणे व विशिष्ट पद्धतीने प्रशिक्षण देणे यासाठी साधारण एक वर्षाचा कालावधी लागायचा.

हे चित्तेवाण देखील किती निष्णात होते याची माहित करवीर रियासत या एक पोस्टमध्ये मिळते.चित्त्याला हरणांच्या कळपातील काळवीट हेरुन फक्त त्याचीच शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जायचे. त्यातही ते काळवीट नर असेल तरच चित्त्याने त्याची शिकार करायची, मादीची शिकार केली जात नव्हती.

चुकून एखाद्या नवख्या चित्त्याने मादीची शिकार केलीच तर त्या दिवशी त्याला उपाशी राहण्याची शिक्षा दिली जायची.

हरणांच्या कळपातील काळवीट हेरुन त्याच्याच मागे धावणे व तेवढ्या वेळात ते काळवीट नर आहे की मादी हे ओळखणे आणि तो नर असेल तरच त्याची मान जबड्यात धरुन त्याला गतप्राण करणे हे चित्त्याचे काम असायचे. हरणांच्या कळपातील नेमके काळवीट कसे ओळखायचे, ते नर आहे कि मादी हे कसे ओळखायचे याचे खास प्रशिक्षण विशिष्ट पद्धतीने चित्त्याला दिले जायचे. यावरून आपल्याला चित्तेवाणांच्या स्किल्स कुठल्या दर्जाचे असतील याची आयडिया येते.

शिकारीसाठी शाहू महाराजांनी असे वीसहून अधिक चित्ते पाळले होते.

त्यांना ठेवण्यासाठी कोल्हापुरात चित्तेखानेही होते.पुढे राजाराम महाराजांनीही वीसभर चित्ते पाळले होते. राजाराम महाराजांनी आपल्या पित्याप्रमाणे प्राणीप्रेमाचा वारसा जपला होता. राजाराम महाराजांनंतर मात्र कोल्हापूरातून चित्ता हंटींग शिकार तंत्र लयाला.

आता जाता जाता काही गोष्टी त्यांच्यासाठी ज्यांना बिबट्यामधला आणि चित्यामधला फरक कळत नाही.
पाहिलं तर दोघांच्या साइझ आणि आकारवरूनच कळून येतं. चित्याचं शरीर लांबट आणि निमुळतं असतं. तर बिबट्या चित्यापेक्षा शरीरानं थोडा जाडसर आणि खुजा असतोय.

अजून एक म्हणजे त्यांच्या बॉडीवरील खुणा. चित्त्याच्या अंगावर भरीव ठिपके असतात तर बिबट्यांच्या अंगावर पोकळ गोलाकार ठिपके असतात. आणि बघता क्षणीच डोळ्यात भरणारा फरक म्हणजे चित्याच्या चेहऱ्यावर काळ्या अश्रूरेषा असतात तर बिबट्याच्या तोंडावर त्या नसतात.

अजूनही फरक कळला नसेल तर सरकार येत्या ५ वर्षात ५० चित्ते आणणार आहे तेव्हा ते आले की प्रत्यक्षातच बघा.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.