एका सामान्य तरुणाने बीआरए टोळीच्या म्होरक्याची हत्या घडवून आणली होती.

सामान्य माणूस आपल्या रोजच्या रटाळ जगण्याला कितीही कंटाळला असला तरी त्याच्या इगोचा प्रश्न आला कि त्याच्यातला सिंह जागा होतो. आजचा किस्साही असाच आहे. एका पंचवीस वर्षाच्या तरुणाने मुंबईतल्या टॉपच्या टोळीचा महत्वाचा माणूस थेट तुरुंगात घुसून मारला होता.

ऐंशीच्या दशकात मुंबई अंडरवर्ल्डवर सत्ता गाजवण्याचा अनेकजण प्रयत्न करत होते. एस पूल टोळीला संपवून बीआरए टोळी आणि दाऊद टोळी एकत्र येण्याचा प्रयत्न करत होती मात्र काहीतरी कारणाने त्यांचं मित्रत्व बिघडून त्यांनी शत्रुत्व पत्करलं. बीआरए टोळी म्हणजे बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी या तिघांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून स्थापन झाली. हि टोळी स्थापन करणारा बाबू रेशीम सगळ्यात मोठा होता. मुंबईत त्याची चांगलीच दहशत होती.

बाबू रेशीम हा माजगाव डॉकमध्ये कामगारांचा नेता होता. बीआरए टोळीचा तो सगळ्यात अनुभवी माणूस होता. टोळी शांत कशी ठेवायची , टोळी वाढवण्यापासून ते एखादी टोळी संपवण्यापर्यंत सगळी माहिती बाबू रेशीम सांगायचा. दगडी चाळ हे बीआरए टोळीचं मुख्यालय होतं.

बाबू रेशीमचा अतिआत्मविश्वास त्याची हत्या होण्यास कारणीभूत ठरला. नक्की काय घडलं होतं –

भायखळ्यातील कंजारवाडा भागात बाबू रेशीम एक दिवस फिरत असताना त्याला एक स्त्री अंघोळ करताना दिसली. वस्तीतील पुरेसा आडोसा नसलेल्या तोडक्यामोडक्या जागेत ती स्त्री अंघोळ करत होती. बाबू रेशीम तिच्याकडे आकर्षित झाला. आपलं वर्चस्व असल्याने ती स्त्री आपल्याला प्रतिसाद देईल असं मनात येऊन त्याने त्या स्त्रीच्या अंगावर हात टाकला. त्या स्त्रीने छेड काढली म्हणून सगळीकडे आरोळ्या ठोकल्या त्याला विरोध करायचा प्रयत्न केला. त्या भागातली बरीचशी लोकं तिथं जमा झाली आणि ते दृश्य पाहून बाबू रेशीमला मारायला धावली. इतका मोठा जमाव बघून जीव वाचवण्यासाठी बाऊ रेशीमने तिथून पळ काढला.

ह्या प्रकारची तक्रार घेऊन तिथली लोकं थेट दगडी चाळीत पोहचली आणि अरुण गवळीकडे दाद मागू लागली. अरुण गवळीने प्रकरणाचा अंदाज घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. बाबू रेशीम टोळीचा म्होरक्या असल्याने तो त्याला काहीच बोलू शकत नव्हता. लोकं मात्र ऐकायला तयार नव्हती. बाबू रेशीम मात्र तिथे अधिकच चेवाने भांडू लागला. अरुण गवळीने दोघांना शांततेत प्रकरण मिटवा म्हणून सांगितलं . पण हा बाबू रेशीम त्या तक्रार  करणाऱ्या लोकांना उद्धट उत्तरं देऊन त्यांना शिवीगाळ करत होता.

ज्यावेळी बाबू रेशीम त्या लोकांना शिव्या देत होता त्याला प्रत्युत्तर म्हणून त्या लोकांमधला एक पंचवीस वर्षाचा तरुण विजय उतेकर हा अधिकच रागाने बोलू लागला. विजय उतेकरचा तो आवेश पाहून बाबू रेशीम चिडला आणि त्याने विजयची कॉलर पकडून त्याच्या फाडफाड करत दोन चार कानशिलात लगावल्या.

महिलेची छेड काढून वर इतक्या माणसांदेखत मारहाण केली म्हणून विजय उतेकरचा स्वाभिमान दुखावला. अरुण गवळीने तात्पुरतं ते प्रकरण मिटवल आणि किरकोळ गोष्ट म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं.

विजय उतेकरने शपथ घेतली कि काहीही झालं तरी मी बाबू रेशीमला संपवणारचं. 

विजय उतेकर मात्र सुडाने पेटला होता. काहीही करून त्याला बाबुला संपवायचं होतं. इगो दुखावला गेल्याने विजय संतापला होता. एकदा एका दारूच्या गुत्त्यावर बाबू रेशीम बसलेला असताना अचानकपणे तिथे विजय आला आणि त्याने बाबू रेशीमवर गोळीबार केला. बाबू रेशीम अचानक झालेल्या हल्ल्याने बाबू गडबडून गेला आणि तो तिथून कसाबसा वाचला आणि पसार झाला. विजय उतेकर मात्र बाबू रेशीमच्या मागे हात धुवून लागला होता. जिथे जिथे बाबू रेशीम दिसेल तिथं तिथं तो त्याला मारण्यासाठी टपलेला असायचा.

बाबू रेशीमची दहशत घेण्याऐवजी बाबू रेशीमनेच विजय ऊतेकरची दहशत घेतली. विजयच्या भीतीने बाबू रेशीमने एक किरकोळ गुन्हा केला आणि जेल हि सगळ्यात सुरक्षित जागा आहे म्हणून तिथेच तो जाऊन बसला. विजय ऊतेकरला हि बातमी कळाली. त्याने बाबू रेशीमला संपवण्याचा प्लॅन तयार केला. रात्रीच्या दीड वाजता दोन चार जण घेऊन तो जेकब सर्कलच्या परिसरात जिथं बाबू जेरबंद केला गेलेला होता तिथं टेहळणी करू लागला. त्याच्या एका पिशवीत काही वस्तू होत्या आणि सोबत एक हातोडा होता.

प्रवेशद्वारावरच्या पोलिसाला विजयने सांगितलं कि बाबू रेशीमने दारू मागवली आहे त्याला ती द्यायची आहे. पोलिसांनी परवानगी नाकारून त्याला तिथून बाहेर काढलं. या अपमानाने विजय भडकला त्याने पोलीस स्टेशनच्या फाटकाजवळ सुरुंग लावले आणि प्रवेशद्वार उडवून लावलं. सगळीकडे पळापळ झाली. विजयने पोलिसांना हुलकावणी देत तो कोठडीच्या जवळ आला.

बाहेरची गडबड बघून बाबुला वाटलं त्याच्या टोळीतील लोकं त्याला सोडवायला आली आहेत कि काय म्हणून बाबू खुश झाला पण समोर बघितलं तर विजय उतेकर उभा. बाबू रेशीमची भीतीने गाळण उडाली तो कोठडीत लपण्यासाठी पळू लागला. विजयने त्याला बघितल्याबरोबर त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. बाबू जागेवरच मरण पावला, पण विजय ऊतेकरचा बदला पूर्ण झाला नव्हता त्याने कुलूप तोडून कोठडीत प्रवेश केला आणि पडलेल्या बाबू रेशीमच्या डोक्यात त्याने हातोड्याचे घाव घालण्यास सुरवात केली. प्रत्येक घावाला तो बाबूच्या कानात ओरडून सांगत होता कि, 

विजय उतेकर नाव आहे माझं,  विजय उतेकर…..

बाबूच्या डोक्याचा चिखल करूनच तो बाहेर आला आणि आपल्या साथीदारांसह तिथून पसार झाला.

तुरुंगात येऊन एकजण कैद्याची इतकी भीषण हत्या करतो, पोलिसांना मारहाण करतो यावरून पोलिसांची भरपूर नाचक्की झाली. पोलीस डिपार्टमेंट विजय उतेकरला पकडण्यासाठी जय्यत तयारीने काम करते. दादरमधल्या एका हॉटेलमध्ये विजय उतेकर बसला आहे अशी बातमी पोलिसांना कळते आणि साध्या वेशात दोन पोलीस जाऊन  करतात यात तो मरण पावतो आणि  स्फोटकं सापडतात.

विजय उतेकरसारख्या एका सामान्य माणसाने एका टोळीच्या म्होरक्याला गारद केल्याने सगळीकडे या प्रकरणाची चर्चा झाली.

हे हि वाच भिडू :

2 Comments
  1. DC says

    Everything is fales. Kahihi mahit nastana man ghadan kahani lihili ahe. Tumhala satya janun ghyaych asel tar ya kadhi byculla la ani check kara satya kay ahe te.

Leave A Reply

Your email address will not be published.