४०० कोटीची उलाढाल करणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता शेतकरी भिडू….

मुळशी तालुक्यात राहणारे ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकरी पॅटर्न काय असतो हे सगळ्या भारताला दाखवून दिलं. एका ऑफिसबॉयची नोकरी ते ४०० कोटींची आर्थिक उलाढाल इथपर्यंत या शेतकऱ्याने मजल मारून शेतकरी काय काय करू शकतो हे दाखवून दिलं. आज या यशस्वी शेतकऱ्याचा प्रवास आपण जाणून घेऊ.

पुण्यातल्या मुळशी तालुक्यात ज्ञानेश्वर बोडके हे वडिलांबरोबर पारंपरिक भातशेती करायचे. शेतीवर पूर्ण कुटुंब अवलंबून होत आणि शेतीतून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्याने ज्ञानेश्वर बोडके यांनी शेती सोडली आणि एका ऑफिसात ऑफिसबॉय म्हणून १२०० रु महिन्याच्या नोकरीवर रुजू झाले. हि नोकरी म्हणजे सकाळी ६ ते रात्रीचे ११ अशा वेळेची होती. हि नोकरी करत असताना शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना कायम वाटायचं.

नोकरी करत असताना एका पेपरमध्ये त्यांनी सांगलीच्या एका शेतकऱ्याची यशोगाथा वाचली आणि त्याने प्रेरित होऊन ते त्या शेतकऱ्याला भेटले. नोकरी सोडून पुन्हा शेती करण्याचं ठरवलं, वडिलांना सांगितलं तर वडील नाराज झाले कारण जोवर ज्ञानेश्वर बोडके नोकरी करत होते तोवर घर व्यवस्थित चालत होतं. वडिलांनी सांगितलं कि,

नोकरी सोडण्याआधी लग्न करून घे नंतर शेती करतोय असं कळलं तर कोणी पोरगी देणार नाही.

पॉलिहाऊसमध्ये फुलांची शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. फ्लोरिकल्चरसाठी आवश्यक असलेलं मार्केटच ज्ञान आणि आधुनिक शेतीच प्रशिक्षण त्यांनी घेतलं. फुलांची शेती करताना सगळ्यात आधी मार्केटची पुरेपूर माहिती असावी या धोरणाने ते शेती करू लागले. फुलांचं मार्केटिंग दिल्लीत चांगलं आहे याचा अंदाज घेऊन त्यांनी १० गुंठ्यावर साडेबारा लाख रुपयांचा प्रोजेक्ट त्यांनी तयार केला. बँकेतून १० लाख रुपयांचं कर्ज घेतलं.

शेतामध्ये कार्नेशन जातीच्या फुलांची लागवड केली कारण त्यावेळी मुंबई, पुणे आणि दिल्ली या भागात कार्नेशन जातीच्या फुलांना जास्त मागणी होती. काही दिवसांनी फुलांची काढणी झाली त्या फुलांची उत्तम पॅकिंग केली आणि झेलम एक्क्सप्रेसने दिल्लीला ती फुलं पाठवली. दोन दिवसांनी ज्ञानेश्वर बोडके यांना फोन आला कि फुलांची क्वालिटी उत्तम आहे , पाहिजे तर आत्ताच ऍडव्हान्स देतो पण फुलं इतर कोणाला देऊ नका.

कधी दिल्ली आणि रेल्वे न पाहणाऱ्या ज्ञानेश्वर बोडके यांचा माल लगोलग खपून पुढची ऑर्डरही त्यांना मिळाली होती. पुढे या फुलशेतीतुन त्यांनी बँकेचं दहा लाखांचं कर्ज केवळ एका वर्षात फेडलं.

इतर शेतकऱ्यांच्या शेतावरही ते नेमाने जाऊ लागले. तिथली परिस्थिती बघून त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू लागले. त्यांच्या एक लक्षात आलं कि इतरांच्या शेतावर जाऊन जाऊन आपण स्वतःच्या शेताकडे दुर्लक्ष करत आहोत. मग त्यांनी त्यांच्या ओळखीतल्या अकरा शेतकऱ्यांना घेऊन

अभिनव फार्मर्स क्लब

उभारला. या अकरा शेतकऱ्यांना त्यांनी जबाबदाऱ्या वाटून दिल्या, दोन शेतकरी मार्केटिंग सांभाळू लागले, दोन शेतकरी ग्रोविंग सांभाळू लागले आणि दोन लोकं ट्रान्सपोर्ट सांभाळू लागले.

११ लोकांना सोबत घेऊन अगदी उत्तमरीत्या त्यांनी काम सुरु केलं , ज्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी २५-३० हजार रुपये मिळायचे त्यांना आता ४-५ लाख रुपयांपर्यंत फायदा होऊ लागला. यामुळं बाकीचे शेतकरीही ज्ञानेश्वर बोडके यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या क्लबमध्ये सामील झाले. आणि बघता बघता या शेतकऱ्यांचा ३०५ जणांचा ग्रुप तयार झाला.

या शेतकऱ्यांना मार्केटिंग आणि शेतीमध्ये काही अडचण येऊ नये आणि किती दिवस दुचाक्या पळवायच्या म्हणून त्यांनी एकाच दिवशी ३०५ मारुती ८०० गाड्या घेतल्या. या प्रकरणाची बरीच चर्चा त्यावेळेला झाली. शेतकऱ्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणात संघटन बघून नाबार्डने राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला.

पुढे त्यांनी एक्झॉटिक शेती करण्याकडे आपला मोर्चा वळवला यात ब्रोकोली, चायनीज कॅबेज अशा नवीन भाज्यांचं उत्पादन घेण्याचं ठरवलं. सगळ्यात आधी त्यांनी मोठमोठे हॉटेल्स आणि मॉल्स यांच्याशी टाय अप केलं आणि भाज्यांची लागवड सुरु केली. यामध्ये त्यांनी एक मोठा बदल केला कि या भाज्यांना त्यांनी एकही केमिकल वापरलं नाही. आधीच फुलांना केमिकल वापरून झालं होत आणि भाजी खातात आणि त्यावर फवारले केमिकल शरीराला घटक असतात त्यामुळे विषमुक्त शेती असा नवीन प्रयोग त्यांनी केला.

या प्रकारच्या शेतीने त्यांचं उत्पादन दुप्पट केलं. मग यांच्याबरोबरच दूध, धान्य आणि फळं यांचं उत्पादन करून व्यवस्थित पॅकिंग आणि ग्रिडींग करून ते थेट ग्राहकांपर्यंत पोहचवायचं त्यांनी सुरु केलं. यासाठी लागणार मनुष्यबळ त्यांच्याकडे नव्हतं मग त्यांनी ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांशी बोलणी करून या महिलांना हाताशी धरून पॅकिंग आणि ग्रिडींग सुरु केलं.

मुंबईच्या आयआयटीने त्यांना मार्केटिंगसाठी एक ऍप बनवून दिली आणि त्यांची मुलगी ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट असून त्या भारतातल्या ३२०० मुलींना घेऊन या ग्रुपचं ऍपवर मार्केटिंग करतात. दीड लाख देशी गायींपासून मिळणारं ए-टू हे दूध ते घरोघरी पोहचवतात. एका अभिनव फार्मर्स ग्रुपमुळे सुमारे पाच लाख लोकांना रोजगार मिळाला. दहा लाखांपासून सुरु झालेली हि उलाढाल आज ४०० कोटींच्या घरात आहे.

त्यांची हि शेती हिंजवडी परिसरातल्या आयटी परिसरात मोठमोठ्या बिल्डिंगच्या आजूबाजूला विखुरलेली आहे. स्वतः शरद पवार त्यांच्या शेतावर दोनदा येऊन गेले होते.

शेतीला सिरियसली घेतलं तर जगणं बदलतं हा होरा असलेल्या ज्ञानेश्वर बोडके यांनी हि विक्रमी उलाढाल घडवून आणून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीकडे वळण्यास सांगितलं.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.