शेतकऱ्याची कमाल : ५ लाखांचे सॅनिटायझेशन टनेल आठ हजारात बनवून दाखवले

दिवसरात्र लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कार्यरत आहेत. काही पोलीस बांधवांना कोरोनाची लागण झाल्याचं देखील स्पष्ट झालं. कर्तव्य श्रेष्ठ असणारे पोलीस बांधव स्वत:च आरोग्य धोक्यात घालून आपलं कर्तव्य पुर्ण करत आहेत.

हे करत असताना प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पोलीसांच्या आरोग्याचा.

असाच प्रश्न पुण्याचे झोन पाच चे DCP सुहास बावचे यांना पडला होता. पोलीसांचे योग्य पद्धतीने सॅनिटायझेशन व्हायला हवे म्हणून त्यांनी प्रयत्न करण्यास सुरवात केली. आरोग्यविषयक कोणकोणत्या उपाययोजना अंमलात आणता येतील याचा विचार ते करत होते तेव्हा, सॅनिटायझर बोगदा अर्थात  Disinfection Tunnels ची संकल्पना समोर आली.

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असे टनेल सुरु केल्यास पोलीस कर्मचाऱ्यांचे किमान सॅनिटायझेशन होवून शकेल हा विचार समोर आला.

DCP सुहास बावचे यांनी असे Disinfection Tunnels बनवणाऱ्या कंपन्यांसोबत संपर्क साधला. अशा प्रकारचे टनेल अर्थात बोगदे उभा करण्यासाठी किती खर्च येईल याची माहिती घेण्यात आली. वेगवेगळ्या कंपन्यांनी आपआपले कोटेशन त्यांना पाठवले.

त्यांची किंमत ३ लाखांपासून ते ५ लाख इतकी होती. इतक्या मोठ्या रक्कमेतून पुणे शहरात ठिकठिकाणी टनेल उभा करणं अशक्य कोटीतील गोष्ट होती. त्यातही एक टनेल उभा करण्याचा कालावधी साधारण आठ दिवसांचा सांगण्यात आला होता.

एकीकडे करोनाचे संकट गडद होत असताना वेळ खूप महत्वाची गोष्ट ठरत आहे. आठ दिवस आणि त्यासंबधित असणारे पाच लाख ही विचार करायला लावणारी गोष्ट होती.

अशा वेळी DCP सुहास बावचे यांना आठवले ते म्हणजे आपले कॉलेजचे मित्र रमेश हिरवे. रमेश हिरवे हे अहमदनगरमध्ये कृषी सल्ला देणारी माऊली फार्मा नावाच्या कंपनीचा कारभार पाहतात. शेतकऱ्यांना शेतीपुरक सल्ले देणारे प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. DCP सुहास बावचे व रमेश हिरवे हे दोघेही Msc ॲग्री चे मित्र.

05f561cc 7a30 4116 a61c e778f11ea6a4

सुहास बावचे यांनी फोन करुन रमेश हिरवे यांना आपली अडचण सांगितली. पॉलिहाऊसमध्ये ज्या पद्धतीने झाडांसाठी सॅनिटायझेशन केले जाते त्याचप्रमाणे याठिकाणी काही करता येवू शकेल का याबाबत चर्चा झाली. रमेश हिरवे यांनी होकार दर्शवला.

दिनांक ४ एप्रिल रोजी रमेश हिरवे अहमदनगरहून पुण्यात आले.

PVC पाईप्स, फॉगर आणि बॅटरीवर आधारीत उपकराणांसह प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली. मोठमोठ्या कंपन्यांनी सॅनिटायझरच्या बोगद्याची किंमत पाच लाख सांगितली होती तर त्यासाठी आठवडाभराचा वेळ मागून घेतला होता. पण रमेश हिरवे कामाला लागले आणि,

अवघ्या साडेआठ हजारात व दिड तासात हे टनेल उभारण्यात आले.

या टनेलचा सांगाडा हा PVC पाईप्स, फ्लेक्स बोर्ड वर आधारीत करण्यात आला. प्रत्यक्षात पहिले मॉडेल उभा करण्यासाठी साडेआठ हजाराहून कमी खर्च झाला. कारण अनेक विक्रेत्यांनी हे सामान खूप कमी खर्चात उपलब्ध करुन दिले. रमेश हिरवे यांनी टनेलसाठी लागणाऱ्या उपकरणांची बाजारातील किंमत काढली तेव्हा हा खर्च साडेआठ हजार इतका आला.

म्हणजेच दहा हजारांच्या आत राज्यभरात अशा प्रकारचे सॅनिटायझर टनेल निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला.

यामध्ये राज्याच्या आरोग्य विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणारी औषधे वापरून पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझ करण्यात येवू लागले. सर्वसामान्य व्यक्तिंसाठी व मार्केटयार्ड परिसरात वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी असे टनेल निर्माण करण्यात आले. मार्केटयार्ड परिसरात असणाऱ्या वीस फुट रुंद व वीस फुट उंच टनेलसाठी तीस हजारांचा खर्च आला.

त्यानंतर रमेश हिरवे यांना राज्यभरातून फोन येवू लागले. ठिकठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी व प्रशासनाने असे टनेल उभा करण्यास सुरवात केली. जिथे अडचण येईल तिथून रमेश हिरवे यांना फोन येवू लागले. आजही रमेश हिरवे राज्यभरासह देशभरातून आलेल्या फोनला उत्तर देवून कशाप्रकारे सॅनिटायझेशन टनेल कमी खर्चा तयार करता येवू शकतो हे सांगतात.

बोलभिडूने त्यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, 

आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कितीही झालं तरी हा कोरोना ‘व्हायरस’  आहे. अतिसुक्ष्म असल्याने कोणताच सॅनिटायझर टनेल १०० टक्के खात्री देवू शकत नाही. वारंवार सॅनिटायझरने हात धुणे, कान, नाक, डोळे यांना हात न लावणे व आरोग्य खात्यांमार्फत दिलेल्या सुचनांचे पालन करुनच आपण या कोरोना व्हायरसचा पुर्णपणे प्रतिकार करु शकतो. 

प्रशासनात राहून लोकांच्या भल्याचा विचार करुन काम करणारे DCP सुहास बावचे व रमेश हिरवे व त्यांच्यासह हे काम पुर्णत्वास घेवून गेलेल्या त्यांच्या सहकार्यांचे बोलभिडू मार्फत मनपुर्वक अभिनंदन ! 

रमेश हिरवे यांचा संपर्क :

7e6d7dbc 43b8 4657 8c42 49900fe37ce7

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.