एका जर्मन ऑफिसराने हिटलरच्या टेबल खाली बॉम्ब लावला होता..

हिटलरने ज्या प्रकारे जर्मनीत ज्यू नागरिकांना संपवण्याचं कारस्थान सुरु केलं होतं ते तेव्हाच्या जर्मन नागरिकांना एखाद्या भयस्वप्नासारखं होतं. जर्मनीत घडणाऱ्या या हत्याकांडाने हिटरलची जगात क्रूरकर्मा म्हणून प्रतिमा तयार झाली होती. पण याच क्रूरकर्मा हिटलरला संपवण्याचा डाव एका हिट्लरच्याच सैन्यातील ऑफिसरने आखला होता. नक्की काय होता हा किस्सा जाणून घेऊया.

क्लाऊज वॉन स्टॉफनबर्ग हा प्रत्येकाला सहज ओळखू येईल असा होता. तो एक कॅथलिक, करिअर आर्मी अधिकारी होता. गडद केस, निळे डोळे असा तो दिसायला देखणा गडी होता पण १९४३ मध्ये ट्युनिशियामध्ये सेवा देताना स्टॉफनबर्ग गंभीर जखमी झाला. त्यात त्याचा उजवा हात, एक डोळा आणि डाव्या हाताची दोन बोटं निकामी झाली होती. 

स्टॉफनबर्ग हा देशासाठी प्राण गमवायला तयार असणारा गडी होता. कधी कधी त्याचा नाझी धोरणांना पाठिंबा असायचा पण युद्धातील प्रकार बघून त्याचा राजवटीला विरोध वाढू लागला होता.

लोकांवरील वाढते अत्याचार आणि जागतिक पातळीवर खराब होत चाललेली जर्मनीची इमेज यामुळे स्टॉफनबर्ग वैतागला होता.

हिटलरच्या अशा हानिकारक धोरणांमुळे स्टॉफनबर्गला भविष्याची जाणीव झाली होती. हिटलर हा किती क्रूर माणूस आहे याची त्याला कल्पना होती. ट्युनिशियाच्या हल्ल्यातून तो बराच होत होता तेव्हा तो जनरल हेनिंग वॉन ट्रेस्कॉ यांच्या नेतृत्वात हिट्लरवर हल्ला करण्याच्या गटाकडे गेला.

ज्या लोकांना हिटलरला ठार मारायचं होतं आणि नाझी राजवट उलथून टाकायची इच्छा होती अशा लोकांच्या गटाचा स्टॉफनबर्गप्रमुख बनला होता. हिटलरला मारायचे अनेक अयशस्वी प्रयत्न झाले होते. पण स्टॉफनबर्ग जर्मन रिप्लेसमेंट आर्मीच्या कमांडरसाठी चीफ ऑफ स्टाफ बनला. या पोस्टने त्याला थेट हिटलरपर्यंत प्रवेश दिला.    

२० जुलै १९४४ रोजी जर्मन सैन्य अधिकारी कर्नल क्लाऊज वॉन स्टॉफनबर्ग या धाडसी अधिकाऱ्याने जर्मनीचा हुकूमशहा एडॉल्फ हिटलरला मारण्याचा डाव आखला होता. काही महत्वाच्या अधिकाऱ्यांना घेऊन तो पूर्व प्रशियाच्या जंगलात असलेल्या मोठ्या सुरक्षा रक्षणालयात पोहचला. एडॉल्फ हिटलरला काहीही करून संपवणे हे त्याचं ध्येय होतं.

हिटलर मिटिंग सुरु करण्यासाठी आत येणार होता, दरवाजा बंद झाला पण अचानक पुन्हा दरवाजा उघडला आणि स्टॉफनबर्ग पळत पळत आत घुसला. त्याच्या हातात एक ब्रिफ सुटकेस होती. त्यात दोन बॉम्ब लपवण्यात आले होते. स्टॉफनबर्गने बॉम्ब हिटलरच्या टेबलाखाली लावले आणि तो बर्लिनला जाण्यासाठी निघाला. 

इकडे हिटलरची मिटिंग सुरु झाली. मिटिंग मध्यात असताना स्फोट झाला. पण इथं हिटलर वाचला कारण हिटलरच्या टेबलाखाली असलेली ती बॉम्ब सुटकेस हळूहळू मागे मागे सरकत गेली.

वेगळ्याच टेबलाखाली बॉम्ब फुटला, जाडजूड ट्राऊजर घातलेला हिटलर थोडाफार जखमी झाला. स्टॉफनबर्गला खात्री होती कि हिटलर मरण पावला असेल पण तो प्लॅन फसणार अशी शंकासुद्धा त्याच्या मनात येऊन गेली होती.

या स्फोटात चार जण मृत्युमुखी पडले पण हिटलर बचावला. हिटलरला संरक्षक कड करून बाजूला नेण्यात आलं. पण यातले सगळे आरोपी लगेचच पकडले गेले. जिथं हा हल्ला प्लॅन करण्यात आला होता त्या बर्लिन वॉर ऑफिसवर धाड पडली आणि सगळ्यांना अटक करण्यात आली. 

यातल्या सगळ्या आरोपीना मृत्युदंड देण्यात आलं. हे एक मोठं प्रकरण मानलं गेलं. २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी देण्यात आली.

क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्ग मात्र या घटनेमुळे चांगलाच चर्चेत राहिला. अनेक बाजूनी त्याला योग्य मानलं गेलं आणि दुसऱ्या बाजूने त्याच्यावर टीका सुद्धा झाली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.