३४ वर्ष झाली पण आजही गुलजारांचा हा सिनेमा रिलीझ झालेला नाही…

सिनेमा बनतो. सेन्सॉर बोर्डाकडे पाठवला जातो. तिकडून संमती मिळाली कि मग टेरीटरी वाईज सिनेमा रिलीजची प्रक्रिया सुरु होते. हा ट्रेंड किती तरी वर्षे चालू आहे. पण कधी कधी कधी एखादी कलाकृती रसिकांपर्यंत पोचतच नाही. असाच काहीसा प्रकार ख्यातनाम दिग्दर्शक गुलजार यांचा ‘लिबास’ या १९८८ सालच्या चित्रपटाबाबत झाला. 

’लिबास’ सिनेमा आजतागायत प्रदर्शितच होवू शकला नाही.

काय कारण आहे या मागे? १९८७ साली गुलजारचा क्लसिक ’इजाजत’ प्रदर्शित झाला. या ‘इजाजत‘ ने क्लास ऑडियन्स मनोमन सुखावले. यात्तील ‘कतरा कतरा जीने दो ..’ या गाण्यात आशाच्या स्वराचा पंचमने केलेला अफलातून वापर भल्याभल्यांना चकीत करून गेला. 

‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है…’ हे गाणे जेव्हा गुलजारने पंचमला दाखविले तेव्हा तो म्हणाला, “उद्या तू मला टाईम्स ऑफ इंडियाची हेडलाईन संगीतबध्द करायला सांगशील!” पण जेव्हा हे गाणं बनलं तेव्हा क्लासिक दर्जाचे बनले.

याच काळात ते विकास मोहन यांच्या ’लिबास’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत होते. या सिनेमात शबाना आजमी, नसिरूद्दीन शाह, राज बब्बर अशी तगडी स्टार कास्ट होती. कथा गुलजार यांच्या ’रावीपार’ या कथा संग्रहातील होती. या कथेचे नाव होते ‘सीमा’. आर डी बर्मन यांचे संगीत होते. यातील अप्रतिम गाणी मात्र रसिकांपुढे आली. 

दुर्दैव हे की गुलजार आणि आर डी यांचा एकत्रित असा हा शेवटचा सिनेमा ठरला. यात लताचे अतिशय अप्रतिम असे गाणे जे आजही लोकप्रिय आहे ’सीली हवा छू गयी सीला बदन छील गया’ यात लता -सुरेश वाडकर यांचे ’खामोश सा अफसाना पानी से लिखा होता’ हे अतिशय सुरीले युगल गीत होते.

’फिर किसी शाख ने’ हे लताचे सोलो आणि ’क्या बुरा है क्या भला है’ हे लता-पंचमचे अगदी अप्रतिम जमून आले होते. अतिशय उच्च कलात्मक मूल्य असलेल्या दर्जाची गुलजार यांची काव्य रचना आणि पंचमदांचे मेलडीयस संगीत यावरून चित्रपत किती तरल आणि भावोत्कट असेल याचा अंदाज येतो.

चित्रपटात पती – पत्नी जे स्वत: नाट्यसृष्टीशी निगडीत आहेत यांची कहाणी होती. कथेत ट्विस्ट तेंव्हा येतो ज्यावेळी पतीचा मित्र तिच्या आयुष्यात येतो. संसारात आलेल्या या वादळा्ने तिघांचे भावविश्व उध्वस्त होते. कुटुंबाची अदृष्य चौकट, त्यातून निर्माण होणारी बंधने, भावनांचा कोंडमारा यातून कथा फुलत जाते. या कथेचा क्लाय मॅक्स काय असावा यावर निर्माते विकास मोहन आणि गुलजार यांच्यात मतभेद होते.

गुलजारांनी त्यांना पटेल असा कथेचा शेवट केला. संघर्षाची ठिणगी नेमकी इथेच पडली असावी. या सार्‍याचा परीपाक सिनेमाच्या प्रदर्शनावर झाला. आणि सिनेमा प्रदर्शितच झाला नाही. नव्वदच्या दशकात बंगलोर येथील चित्रपट महोत्सवात हा सिनेमा दाखविला जाणार होता पण ऐन वेळी निर्मात्याने त्याचे प्रदर्शन रोखले.

काही वर्षा पूर्वी गोव्याला आय एफ एफ आय (इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ इंडीया) मध्ये मात्र हा सिनेमा दाखविण्यात आला. ज्यांना हा सिनेमा पाहण्याचे सौभाग्य लाभले त्या सर्वांनी एकमुखाने याची प्रशंसा केलीय. निर्मात्याला अंधारात ठेवून हा प्रकार झाल्याने आता त्यांची न्यायालयीन लढाई चालू आहे.या सर्व प्रकारात रसिक मात्र नाहक एका चांगल्या कलाकृतीला मुकले आहेत. त्यातील गाणी आणि यूट्यूब वरील सिनेमाचे ट्रेलर यावर रसिकांना तहान भागवावी लागत्येय.

कुणी सांगावे सर्व काही सुरळीत झाले तर गुलजारचा हा चित्रपट प्रदर्शितही होईल आणि हिट ही होईल कारण गुलजार टच मुव्ही कधीच कालबाह्य होत नाहीत!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.