अक्षय कुमारने रियल लाईफ हिरो बनत बुडणाऱ्या लारा दत्ताचे प्राण वाचवलेले…

सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी छोटे मोठे अपघात होत असतात. यातून बऱ्याचदा कलाकारांना थोडीफार दुखापत होते. पण बऱ्याचदा अपघाताची व्याप्ती मोठी असते. त्यातून बऱ्याचदा मृत्यू देखील होतात. अभिनेता संजय खान ज्या वेळी म्हैसूरला ‘द सोर्ड ऑफ टिपू सुलतान’ या मालिकेचे चित्रीकरण करत होता. ८ फेब्रुवारी १९८९ ला अचानक सेटला आग लागली आणि त्यामध्ये तब्बल ६२ लोकांचा मृत्यू झाला.

संजय खान अपघातात जायबंदी झाला होता.

पुढे त्याचे अनेक ऑपरेशन्स झाली आणि एका अर्थाने त्याच्या करिअरला तिथूनच खंड पडला. कमल हसन याच्या ‘इंडियन टू’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी एक क्रेन कोसळल्यामुळे तीन टेक्निशियनचा जागेवरच मृत्यू झाला होता आणि कमल हसन, काजल अग्रवाल, आणि दिग्दर्शक शंकर हे आश्चर्यकारकरीत्या बचावले होते. ‘

खाकी’ या २००४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ऐश्वर्या रॉय हिच्यावर अचानकपणे एक जीप येवून आदळल्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि पुढचे काही महिने तिचा मुक्काम हॉस्पिटलमध्ये होता. २०१३ सालच्या ‘शूट आऊट ऍट वडाला’ या चित्रपटात अजाणतेपणे अनिल कपूरच्या हातून जॉन अब्राहम वर जवळून बुलेट फायर करण्यात आली त्यात जॉन अब्राहमच्या मानेला इजा झाली होती.

१९८३ साली बेंगलोरच्या ‘कुली’ या चित्रपटाच्या सेट वरील अमिताभ बच्चन यांचा अपघात तर सर्वश्रुत आहे.

फार पूर्वी मेहबूब यांच्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटाच्या शूट भीषण आग लागली आणि त्या आगीत अभिनेत्री नर्गिस अडकली. पण सुनील दत्त ने मोठ्या धाडसाने त्या आगीत शिरून नर्गिसचे प्राण वाचवले होते. २००४ साली मणीरत्नम यांच्या ‘युवा’ चित्रपटाच्या शूट दरम्यान अभिनेता विवेक ओबेरॉय याची बाईक घसरल्यामुळे त्याच्या दोन्ही पायाला मोठी दुखापत झाली होती आणि त्यावेळी तो अक्षरशः मरता मरता वाचला होता.

१९९९ सालच्या ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अभिनेत्री महिमा चौधरी हिच्या चेहऱ्यात काचेचे तुकडे घुसले होते. ही झाली बॉलिवूडमधील काही गाजलेल्या अपघातांची झलक. असे अपघात हे कायमच होत असतात.

दिग्दर्शक राजकंवर २००३ साली त्यांच्या ‘अंदाज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दक्षिण आफ्रिकेत केप टाऊनला गेले होते. तिथे अक्षय कुमार आणि लारा दत्ता यांच्यावर एक गाणे चित्रित करण्यात येणार होते ‘रब्बा इश्क ना होवे’. या गाण्याची चित्रीकरण एका समुद्रात होणार होते. या समुद्रामध्ये एक रॉक होता; त्या रॉकवर या गाण्याचे चित्रीकरण होत होते.

गाण्याचे शूट सुरु झाले. समुद्राच्या फेसाळत्या लाटा येत होत्या. सर्व काही व्यवस्थित मस्त चालू होतं. परंतु अचानक समुद्राला भरती आली आणि मोठी लाट आल्यामुळे अक्षय कुमार आणि लारा दत्ता अक्षरशः समुद्रामध्ये फेकले गेले.

ही लाट इतकी भयानक होती की, अक्षय कुमार सारखा स्टंट मॅन देखील पाण्याच्या सोबत काही अंतर वाहून गेला. लारा दत्तला तर पोहता देखील येत नव्हते! त्यामुळे ती वेगाने समुद्राच्या आत खेचली जाऊ लागली. अक्षय कुमारला ज्यावेळेला हे लक्षात आले; त्यावेळी त्याने स्वतःला सावरले आणि पुन्हा पाण्यामध्ये घुसून लारा दत्तला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आणले.

रील लाईफ मधील हिरो रिअल लाईफ मध्ये देखील हिरो बनला आणि त्याने लारा दत्ताचे प्राण वाचवले.

यानंतर लारा दत्ता पाण्याला इतकी घाबरू लागली की तिने पुढचे सर्व शूटिंग चे शेड्यूल च रद्द केले आणि ते भारतात परत आले नंतर काही महिन्यांनी भारतातच या गाण्याचे शूट पूर्ण केले. निर्माता सुनील दर्शन आणि दिग्दर्शक राजकवर यांनी अक्षय कुमारचे मनापासून आभार मानले की त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या सहकलाकाराचे प्राण वाचवले!

जाता जाता: ‘अंदाज’ या चित्रपटातील आणखी एक गंमतीदार प्रसंग. प्रियांका चोप्रा आणि लारा दत्त या दोघींचा हा पहिलाच चित्रपट होता. प्रियांका मिस वर्ल्ड होती परंतु एका गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी तिला काही केल्या स्टेप्स जमत नव्हत्या. अक्षरशः चाळीस रिटेक घ्यावे लागले. शेवटी कंटाळून कोरिओग्राफर राजू खान म्हणाला,” नुसतं मिस वर्ल्ड असून चालत नाही.

डान्सच्या स्टेप्स देखील याव्या लागतात!” परंतु या वादाच्या वेळेलाच अचानक एक बातमी युनिटला कळाली त्यामुळे तणावाचे वातावरण निवळले आणि सर्वत्र आनंदाची लहर पसरली. ही बातमी होती ट्विंकल खन्ना हिच्या लेबर पेनची आणि दवाखान्यात ऍडमिट होण्याची. ट्विंकल खन्ना म्हणजे अक्षय कुमारची बायको. त्यामुळे अक्षय कुमार यांनी लगेच Pack up करून तो मुंबईला परतला नंतर या संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण मुंबईतच झाले!

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.