रेल्वेत बाथरूम सुरु करण्यामागे एका भारतीयाचं लेटर कारणीभूत होतं…..

भारतातल्या रेल्वेच्या बाथरूमचा खऱ्या अर्थाने वापर केला तो गँग्ज ऑफ वासेपूर मधल्या फैजल खानने. पण भारतातल्या रेल्वे बाथरूमचा विषय हा फार सेन्सिटिव्ह असतो, बाहेरून दार वाजवणाऱ्याचा एक वेगळा थाट आणि आतमध्ये विधीला बसलेल्या माणसाचा एक वेगळाच तरफडा असतो. हे घाईच आणि महत्वाचं काम रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना चांगलंच माहिती असेल. पण या रेल्वे बाथरूमचा शोध लागण्यास एका भारतीयाचं लेटर कारणीभूत होतं त्याबद्दलचा हा किस्सा.

भारतीय रेल्वेची सुरवात होऊन आज घडीला १७० वर्षे झाली आहेत. १६ एप्रिल १८५३ रोजी देशातली पहिली ट्रेन सुटली होती. पण चकित करणारी गोष्ट म्हणजे तब्बल ५६ वर्षे रेल्वेमध्ये टॉयलेट/बाथरूमची सोय नव्हती. १९१९ सालापर्यंत ट्रेन या विना टॉयलेट/बाथरूमच्याच धावत असायच्या. हीच पद्धत पुढेही चालूच राहिली असती पण एका भारतीयामुळे या प्रथेला आळा बसला. 

एकदम खतरनाक इंग्रजीमध्ये लिहिलेलं एक पत्र इंग्रजांच्या हाती लागलं नसतं तर रेल्वेत टॉयलेट बांधण्यातच आले नसते. या पत्रात लिहिलेली इंग्रजी इतकी जबरी होती कि ब्रिटिशाना त्यांच्या स्वतःच्या इंग्रजीवर शंका येऊ लागली होती. ओखिल चंद्र सेन नावाच्या एका प्रवाशाने आपली समस्या इंग्रजांना एका पत्राद्वारे कळवली होती.

२ जुलै १९०९ रोजी साहिबगंज रेल डिव्हिजन पश्चिम बंगालला त्यांनी एक पत्र लिहिलं आणि रेल्वेत टॉयलेट बसवण्याची विनंती केली होती. या पत्रात एका युनिक स्टाइलच्या इंग्रजीत लिहिलेलं होतं कि,

डियर सर मी एक प्रवासी रेल्वेने अहमदपूर स्टेशनला आलो, माझं पोट सुजल्याने ते दुखत होतं. मी शौचासाठी एका किनाऱ्यावर बसलो आणि त्याच वेळी गार्डने शिट्टी वाजवून ट्रेन जाऊ देण्याची घोषणा केली. मी एका हातात लोटा आणि एका हातात धोतर धरून ट्रेनच्या मागे पळत असताना प्लॅटफॉर्मवर पडलो.

माझं धोतर सुटलं आणि आणि मला तिथं उभे असल्येल्या सगळ्याच बायका पुरुषांसमोर शरमिंदा व्हावं लागलं. माझी रेल्वे निघून गेली आणि मला अहमदपूर स्टेशनलाच राहावं लागलं.

पुढे ओखिल चंद्र सेन गार्डवरचा राग काढताना लिहितात कि हि किती वाईट गोष्ट आहे कि एखादा यात्री शौच करण्यासाठी गेला आहे आणि त्याच्यासाठी गार्ड ट्रेन १ मिनिटभरही थांबवू शकत नाही. मी आपल्याला विनंती करतो कि त्या गार्डला दंड लावावा. नाहीतर मी गोष्ट सगळ्या पेपरांमध्ये जाहीर करून टाकील. आपला विश्वासू सेवक, ओखील चंद्र सेन. 

ओखिल चंद्र सेन यांचं हे दर्दभरं लेटर बघून रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेमध्ये टॉयलेट बनवायला सुरवात केली. ५० मैलांपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या रेल्वेच्या सगळ्या लोअर क्लास डब्यांमध्ये टॉयलेट बांधण्यात आली. एवढ्या अर्जंट कामासाठी अर्जन्टमधी टॉयलेटच बांधकाम सुरु करण्यात आलं. भलेही त्या पत्राच्या भाषेत चुका असेल पण त्याची भावना आणि त्यातली आर्तता रेल्वे अधिकाऱ्याना समजली आणि तेव्हापासून भारतात रेल्वेत टॉयलेट/बाथरूम सुरु करण्यात आलं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.