एका साध्या मॅकेनिकने जगातली सगळ्यात मोठी मोटार कंपनी बनवली होती….

होंडाच्या गाडीवर आपण फक्त पेंडीचं पोतं लादून नेलं, पोरींना फिरवून आणलं, ४ जणांना बसवून चौबल सीट फिरलो पण होंडा काय मनातून उतरली नाही. म्हणजे होंडाची क्रेझ खेडोपाड्यात तर होतीच पण शहरात गुळगुळीत असणाऱ्या रस्त्यांवर ती दिमाखात मिरवायची. होंडा बनण्याची प्रोसेस सुद्धा जब्राट होती. हि होंडा एकेकाळी लोकांची शान होती, तर जाणून घेऊया या होंडाचा उगम कसा झाला.

सुशीरो होंडा या भिडूने होंडा गाडीचा शोध लावला. १७ नोव्हेंबर १९०६ रोजी जपानमधल्या एका लहानश्या खेड्यात सुशीरो होंडाचा जन्म झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती. सुशीरो होंडाचे वडील एक लोहार होते. ते जुन्या तुटलेल्या फुटलेल्या सायकली रिपेअर करून विकायचे. सुरवातीला सुशीरो होंडाला दुकानातल्या अवजारांशी खेळायचा नाद होता. वडिलांना तो मदतसुद्धा करायचा. 

घरचं वातावरण बघून सुशीरो होंडाला अभ्यासाचं वावडं होतं. त्यामुळे १९२२ साली म्हणजे वयाच्या १६ व्या वर्षी या पठ्याने शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला. शिक्षण सोडल्यावर एके दिवशी सुशीरो होंडाने पेपरमध्ये आर्ट शोकाई नावाची जाहिरात पाहिली. काम मिळेल या आशेने तो त्या पत्त्यावर टोकियोला जाऊन पोहचला.

तिथं त्याला काम मिळालं खरं पण सुशीरो होंडाचं वय पाहून त्याला फक्त तू इथं साफसफाई कर म्हणून सांगण्यात आलं. सुशीरो होंडाने कंपनीच्या अधिकाऱ्याला विनंती केली कि मला मेकॅनिकल मध्ये काम करू द्या, तेव्हा त्या अधिकाऱ्याने दुसऱ्या ठिकाणी होंडाला पाठवलं तिथे रेसिंग कार बनवण्याचं काम चालायचं. तिथेही सुशीरो होंडा लवकर ते काम शिकला. काही महिन्यातच तो एक उत्तम मॅकेनिक बनला. 

त्यावर्षीच्या रेसिंग कार रेसमध्ये जी कार जिंकलेली होती ती कार बनवली होती सुशीरो होंडाने. होंडाने कंपनीला भरपूर प्रसिद्ध केलं आणि भरपूर पैसेसुद्धा मिळवून दिले.पुढे एक स्पेशल कंपनी होंडाला सांभाळायला देण्यात आली. पण होंडा कंपनीला सोडून घरी निघून आला.

घरी आल्यावर होंडाने स्वतःची कंपनी सुरु केली. इथं तो मोठमोठ्या कंपन्यांना पिस्टन रिंग विकू लागला. टोयोटा कंपनीने होंडाची ऑर्डर स्वीकारायला सुरवात केली होती. पण एका रेसमध्ये भाग घेतल्यावर ऍक्सिडंट मध्ये होंडा डेंजर जखमी झाला. त्यात तो पूर्ण ३ महिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. पण हॉस्पिटलमध्ये असताना त्याला कळलं कि त्याने बनवलेल्या पिस्टन रिंगची लोकप्रियता कमी झाली आहे. टोयोटाने ऑर्डर घेणं बंद केलं. 

होंडा डिप्रेशनमध्ये गेला होता. पण काहीतरी तोडगा काढावा म्हणून तो धडपड करत होता. परत त्याने  पिस्टन रिंग विकायला सुरवात केली खरी पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याच्या कंपनीवर बॉम्ब पडला आणि कंपनी नष्ट झाली. पण युद्ध संपल्यावर होंडाने कंपनीचं उरलेलं सगळं सामान विकून टाकलं आणि नवीन कंपनी उभारली.

होंडा टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूट नावाने नवीन कंपनी सुरु झाली. युद्धामुळे जपानमध्येही मोठं नुकसान झालं होतं. लोकं पायी किंवा सायकलवर फिरत होते.

यावरून होंडाला एक आयडिया सुचली आणि त्याने एका सायकलला होंडा कंपनीचं इंजिन लावलं. लोकांना होंडाची हि कल्पना चांगलीच आवडली. लोकांनी पटपट या सायकली विकत घेतल्या. सुरवातीला या बाईकची किंमत फक्त १५०० रुपये होती.

पुढे कंपनीचं नाव होंडा मोटर कंपनी झालं. पुढे होंडाने बाईकसुद्धा बाजारात उतरवली. १९६१ पासून होंडा दर महिन्याला १ लाख बाईक बनवू लागली. पुढे हे इतकं पसरलं कि महिन्याला १० लाख बाईक तयार होऊ लागल्या. जपानची अर्थव्यवस्था होंडामुळे सुधारली आणि होंडाने कार सुद्धा बाजारात उतरवल्या. हिरो सोबत त्यांची काहीकाळ पार्टनरशिप चालली पण टिकू शकली नाही. 

होंडा इतकं लोकप्रिय होण्याचं कारण काय होतं तर सुशीरो होंडा हे स्वतः कर्मचाऱ्यांबरोबर काम करत असे. इतक्या जबरदस्त यशानंतर ५ ऑगस्ट १९९१ रोजी सुशीरो होंडाचं निधन झालं. मात्र साध्या गॅरेजमध्ये पाहिलेलं त्याच स्वप्न त्याला आणि त्याच्या नावाला जगभर फेमस करून गेलं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.