गोव्याच्या कानाकोपऱ्यात सिनेमा पोचविणाऱ्या अवलियाची गोष्ट !
वक्त के हाथो इंसान सिर्फ कठपुतली है, जब तक आँखो मे रोशनी रहेगी मै काम करता रहूंगा….
चंदेरी पडद्यावर झळकण्यासाठीच्या त्याच्या इच्छेने त्याची नाळ कायमची चित्रपटसृष्टीशी जोडली. अमिताभ, दादा कोंडके, भगवान दादा, जितेंद्र यासारख्या लोकांना तो जसे तसे व्यासपीठावर मिमिक्रीच्या स्वरूपात साकारू लागला, हिरोंमागच्या गर्दीत तो काम करून लागला पण नशिबाने लॉरेन्स विल्सनला त्या गर्दीतून प्रमुख भूमिकेत आणलेच नाही. दोन दशके जिवाच्या मुंबईत नशीब आजमावून तो एक चित्रपट प्रोजेक्टर घेऊन गोव्यात आला आणि गोव्याच्या घराघरांत त्याने दादा कोंडके, श्रीराम लागू, भगवान दादांसारखी माणसे पोचवली.
मराठी, हिंदी, कोकणी चित्रपट गोव्याच्या खेडोपाड्यात दाखवून या माणसाने गोमन्तकीयांना चित्रपटाच्या दुनियेशी जोडले.
लॉरेन्सकडे 1970 सालापासूनचे रशियन, जर्मन, अमेरिकन, डेन्मार्क, स्विर्त्झंलंड, भारतासह विविध देशातील टप्प्याटप्याने आधुनिक स्वरूपात आलेले दहापेक्षा जास्त प्रोजेक्टर आहेत. 1970 ते 90 या कालावधीतील तीन जुने कॅमेरे आणि 4 स्लाइड प्रोजेक्टर आहेत. याव्यतिरिक्त जुन्या चित्रपटांचे पोस्टर, अभिनेत्यांचे फोटो आणि चित्रपटांशी निगडित अनेक आठवणींचा संग्रह तर त्याच्याकडेच आहेच पण तो स्वतः एक चालताबोलता सिनेमाचा इतिहासच आहे.
“वक्त के हाथो इंसान सिर्फ कठपुतली है, जब तक आँखो मे रोशनी रहेगी मै काम करता रहूंगा”..
भगवानदादांचा हा डायलॉग म्हणतच लॉरेन्स स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगतो. “सिनेमाने हमको नही अपनाया, तो क्या हुआ हमने सिनेमाका साथ नही छोडा और ना कभी छोडेंगे”…याच सकारात्मक आविर्भावात तो गोव्यात 60 एमएमचा प्रोजेक्टर घेऊन आला होता. नंतर नवे प्रोजेक्टर येत गेले तो स्वतःसह कुटुंबांच्या पोटावर प्रसंगी पाय आणून त्या प्रोजेक्टरना लोकांना सिनेमा दाखविण्यासाठी विकत घेऊ लागला.
आता सिनेमा फक्त थिएटरमध्ये, मोबाईलवर तर टीव्हीवरही दिसतो आणि नवा प्रोजेक्टर विकत घेण्याइतके पैसे माझ्याकडे नाहीत आणि ते समाधानही मला मिळणार नाही. कारण तेव्हा ‘डिंग डॉंग डिंग’वर माधुरी थिरकल्यानंतर गावातल्या प्रत्येक मुलीला मी माधुरी व्हाव असं वाटायच….
अमिताभ जेव्हा ‘अरे वो जुम्मा…मेरी जानेमन’ म्हणायचा तेव्हा तो हजारो गरीबांच प्रतिनिधित्व करायचा..
आता सिनेमात या गोष्टी नाहीत.
हे ही वाचा –
- प्रत्येकाचा एक खास सिनेमा असावा अन सॉंग ऑफ लाईफ सुद्धा !!!
- या मराठी कलाकाराने केला होता भारतीय सिनेमाच्या इतिहासातील पहिला डबल रोल !!!
- एकविसाव्या शतकाची भाषा जाणणारा गीतकार.
“माझ्या चित्रपटाला पाहून बायका शिव्या देतात पण ज्यादिवशी रागाने पडद्यावर चप्पल पडेल त्या दिवशी मी खरा अभिनेता” असे म्हणणारे निळूजींसारखे लोक नाहीत. सिनेमाने मला भिकारी करून सोडलं…अशी टिप्पणी माझ्यामागे लोक करतात, पण मला त्याचे वाईट वाटत नाही कारण मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करीत राहणार आहे “क्योंकी पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’. असे लॉरेन्स सांगतो.
खिशात पैशाची जमापुंजी नसली तरी त्याच्याजवळ असणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन पाहावयास येणाऱ्या प्रत्येकाला तो चित्रपटाच्या प्रवासाबाबत भरभरून सांगतो आणि परिस्थितीबाबत विचारणा केली असता, “माझ्या आयुष्यात काही नाही…गोव्याच्या बाजारपेठेत मासे विकून मला पैसे पुरवणारी बायको हल्ली अंथरुणावर असल्याचे सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी येते.
त्याला पाहिलं की वाटतं…’वेडाला सीमा नसते’.