वुहान पाठोपाठ आता नागालॅन्डच्या वटवाघळांवर शंका घेतली जात आहे.

कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीबद्दल आता नवीन वाद उफाळून आला आहे. जगाने ‘कोरोनाच मूळ कुठलं?’ असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. भारतीय वैज्ञानिक संशोधनातं त्याचं रहस्य दडलंय असं सगळ्या जगाला वाटतंय. आणि यामुळंच भारत आता या वादाचा केंद्रबिंदू होण्याची शक्यता आहे.

कारण आहे,

बंगळुरुमधील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (एनसीबीएस) द्वारा नागालॅन्डच्या दुर्गम जंगलांमध्ये कोविडच्या बाबतीत संशयितांपैकी घातक विषाणूंच्या बॅट-टू-ह्युमन ट्रान्समिशनचा अभ्यास करण्यात आला आहे.

या अभ्यासासाठी एनसीबीएस बरोबर सिंगापूरमधील ड्यूक-एनएस मेडिकल स्कूल आणि युनिफॉर्मर्ड सर्व्हिसेस युनिव्हर्सिटी ऑफ़ हेल्थ सायन्सेस (यूएसयूएचएस) या संस्था भागीदार आहेत. या संस्थांना बॅट-टू-ह्युमन ट्रान्समिशनचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या डिफेन्स डिपार्टमेंटने फंडिंग केलं आहे.

या अभ्यासात वादग्रस्त काय आहे?

या अभ्यासाच्या सुरवातीच्या टप्प्यात एक रिसर्च पेपर प्रकाशित झाला होता. या पेपरच्या सह लेखकांपैकी ‘शी झेंगली’ या एक आहेत. ज्या ‘बॅट लेडी’ म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. वादग्रस्त अशा वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही) मध्ये शी झेंगली काम करत होत्या.  वुहानच्या इन्स्टिटयूट मध्ये काम करत असताना मार्च २०२० मध्ये शी म्हंटल्या होत्या की,

कोरोनाच्या विषाणूचा जो नवीन स्ट्रेन आला आहे तो वुहानच्या प्रयोगशाळेतल्या कोणत्याही जेनेटिक कोडशी मॅच होत नाही.

बंगरुळच्या एनसीबीएस इन्स्टिटयूटच्या मते, हा ‘ऑब्जार्वेशनल’ अभ्यास आहे. असं मानले जाते की नागालॅन्डमधील बॅट हार्वेस्ट्स म्हणजेच वटवाघळं पाळणं हाय रिस्क असू शकत. त्यामुळं झुनोटिक स्पिलओव्हर होऊ शकत.

झुनोटिक स्पिलओव्हर म्हणजे झोनोसिस. हा एक असा आजार आहे ज्याचा प्राण्यांपासून मनुष्यांत संसर्ग होऊ शकतो.

नागालॅन्ड मध्ये बॅट हार्वेस्टिंग का करतात ?

ऑक्टोबर महिन्यात नागालॅन्ड मध्ये एक यात्रा असते त्यावेळी  बॅट हार्वेस्टिंग करतात. त्यांच्यात महाराष्ट्रासारखं बकर कापत नाहीत. तर मांसासाठी वटवाघळांची शिकार केली जाते. आणि या काळात नागालॅन्डच्या लोकांमध्ये इबोला आणि सार्स सारख्या आजाराचा उद्रेक होतो. याचाच अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या संस्थेने बंगळूरच्या संस्थेला वित्तपुरवठा केला.

या अभ्यासासाठी फील्ड वर्क २०१७ साली करण्यात आलं. त्याचा रिपोर्ट ऑक्टोबर २०१९ मध्ये ‘पीएलओएस नेग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसिज’ या वैज्ञानिक जर्नलद्वारे पब्लिश करण्यात आला. आणि हा रिपोर्ट या अभ्यासाचा शेवट असल्याचे समजलं जात होतं.

पण विषय इथंच संपला नाही..

फेब्रुवारी २०२० मध्ये जगाला कोरोनाची भेट मिळाली. जेव्हा जग या व्हायरसशी लढण्यात मग्न होत तेव्हा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) स्वतःच नागालॅन्ड अभ्यासाचा गाजावाजा केला.

त्यापुढं जाऊन म्हणजेच १५ महिन्यांनंतर, आयसीएमआरने त्या अभ्यासाचा रिपोर्ट पब्लिक करायला विरोध केला. आणि या अभ्यासाचा फायनल रिजल्ट मिळाला नसून अभ्यास अजूनही चालू आहे, अशी उडवाउडवीची उत्तर दिली.

वुहानच्या बॅट लेडी बरोबर काम करण्याच्या प्रश्नावर अधिकारी म्हणाले की, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी सोबत आम्ही कधीही काम केले नाही. आम्हाला सिंगापूरमधील आमच्या सहकाऱ्यांकडून फक्त वुहानच्या लॅब मधून अभ्यासासाठी रीएजण्ट्स मिळाले आहेत. आणि असे रीएजण्ट्स जगभरातून खूप साऱ्या इन्स्टिटयूट कडून मिळतात.

म्हणजे डायरेक्ट युटर्नच मारला या लोकांनी.  

या अभ्यासात नक्की काय होत?

एनसीबीएस या बंगळूरच्या संस्थेच्या संशोधकांना अभ्यासासाठी म्यानमारच्या सीमेवर असलेल्या किफाइर जिल्ह्यातील मिमी नावाच्या एका लहानशा गावात नेण्यात आलं. तेथे, सरमती डोंगराच्या पायथ्याशी बोम्रर, लॉन्गफ्यूरी यिमचुंगी या जमाती राहतात.

मागच्या सात पिढ्यांपासून, बोम्रर जमाती प्रत्येक ऑक्टोबरमध्ये बॅट-हार्वेस्टिंग फेस्टिव्हल आयोजित करतात. तिथं असणाऱ्या संपूर्ण लेण्यांमध्ये धूर केला जातो. ज्यामुळं वटवाघळं पकडणं सोपं होत. कधीकधी वटवाघळं पकडताना ती या शिकाऱ्यांना चावतात. हेच कारण असू शकत की या लोकांमध्ये इबोला आणि सार्स हे विषाणू आढळतात.

हाच तो स्पिलओव्हर जो एनसीबीएसच्या अभ्यासाचा विषय होता.

एनसीबीएस २०१२ पासून या बॅट-टू-ह्युमन ट्रान्समिशनवर काम करत आहे. इकॉनॉमिक ऍण्ड पॉलिटिकल व्हीकलीच्या २०१५ च्या लेखानुसार, बोम्रर जमातीचा वटवाघळांच्या औषधी मूल्यांवर विश्वास आहे. त्यांच्या मते वटवाघळं खाण्याने अतिसार, शरीर दुखणे, कौमार्य वाढवणे यासारख्या आजारांवर उपचार होऊ शकतात.

२०१५ च्या इबोलाच्या उद्रेकानंतर मिमी गावात संशोधक अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. इबोला विषाणू बहुधा प्राण्याद्वारे, वटवाघळांमार्फत मानवाकडे आला असावा असे मानले जाते.

निश्चितपणे, नागालॅन्डच्या अभ्यासाचा कोविडच्या नव्या स्ट्रेनशी काही संबंध नव्हता. पण या अभ्यासात गुंतलेल्या सर्व वैज्ञानिकांकडून देण्यात येणारी उत्तर बघता सर्व जग या अभ्यासाकडे शंकेच्या नजरेने पाहू लागलंय.

हे ही वाचा भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.