अंतुले विरुद्ध दि.बा.पाटील यांच्यात झालेली लढत रायगडवासी कधीच विसरणार नाहीत…

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. एक वादळी नेतृत्व. त्यांच्या निर्णयाचा झपाटा इतका विलक्षण असायचा की प्रशासनाला देखील त्यांच्या वेगाशी जुळवून घेईपर्यंत नाकी नऊ यायचं. अंतुलेंनी अनेक वर्षे खोळंबून पडलेल्या कोकणातल्या फायली एका झटक्यात पास केल्या.

रायगड जिल्ह्यात अनेक पूल उभारले, रस्ते बांधले, महामार्ग मोकळा केला. अडकून पडलेला विकास मार्गी लावला. प्रसंगी त्यांच्या कार्यशैलीला हुकूमशाही म्हटलं गेलं. टीकाकारांनी सुलतान अंतुले म्हणून त्यांच्यावर आरोप केले.

पण अंतुलेंनी याची पर्वा केली नाही. असं म्हणतात की मुख्यमंत्री असताना त्यांची गाडी इतकी सुसाट सुटली होती कि त्याचा ऍक्सीडेन्ट होणे साहजिक होते. तसंच घडलं. इंदिरा प्रतिष्ठानच्या सिमेंट घोटाळ्यात अंतुलेंच नाव आलं. त्यांच्या पक्षातल्याच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. अंतुलेंना राजीनामा द्यावा लागला..

संपूर्ण देशभरात पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्याला घोटाळ्याच्या आरोपामुळे पदच्च्युत व्हावे लागले होते. सर्वत्र चर्चा झाली. अंतुलेंच नाव बदनाम झालं.

पुढच्या दोनच वर्षात एकेकाळी इंदिरा गांधींच्या सर्वात विश्वासातले, संजय गांधींच्या गळ्यातले ताईत म्हणून ओळखले जाणारे अंतुले राजीव गांधींच्या हट्टामुळे काँग्रेस बाहेर गेले.

गोष्ट आहे १९८४ सालची. इंदिरा गांधींची हत्या झाली होती. राजीव गांधींच्या हातात काँग्रेसची सगळी सत्ता आली. सहानुभूतीच्या लाटेमुळे देशाचे भावी पंतप्रधान ते होणार याची सगळ्यांना खात्री होती. त्या निवडणुकीत राजीव गांधींनी दगड जरी उभे केले तरी ते निवडून आले. फक्त ज्या मोजक्या ठिकाणी निवडणुका रंगल्या त्यात होती महाराष्ट्रातल्या कुलाबा लोकसभा मतदारसंघातली सीट.

खरं तर हा अंतुलेंचा बालेकिल्ला. वसंतदादा पाटलांच्या आग्रहामुळे काँग्रेसने इथे तिकीट ए.टी.पाटील यांना दिले.

काहीच दिवसांपूर्वी या मतदारसंघातील उरण येथे २० हजार शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं. नवी मुंबईसाठी ज्यांच्या जागा घेतल्या असे शेतकरी शेकापच्या वतीने एकत्र झाले होते. विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांनी तुपुंज मिळालेला मोबदला स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हाचे पनवेलचे शेकाप आमदार दि.बा.पाटील हे या आंदोलनाचे नेतृत्व करत होते.

अगदी नगराध्यक्ष असतानाच्या काळापासून दि.बा.पाटील यांनी रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा दिला होता. खोती नष्ट करून कसणाऱ्या शेतकऱ्याच्या हक्काची जमीन त्याच्या नावावर व्हायला पाहिजे, अशी त्यांची आग्रही मागणी होती.

आमदार झाल्यानंतर तर त्यांच्या लढ्याची धार आणखी तीव्र झाली. 

आजच्या महाराष्ट्रामधील महसूल कायदा, कुळकायदा, सातबाराच्या उताऱ्यात तलाठ्याचे अधिकार काढून घेण्याचा कायदा, गर्भजल परीक्षेला विरोध करणारा कायदा, सिडकोसाठी शेतकऱ्याच्या जमिनी घेण्याचा कायदा, एमआयडीसीसाठी शेतकऱ्याच्या जमिनी वर्ग करण्याचा कायदा या आणि अशा बहुसंख्य पुरोगामी कायद्यांमधील बदल घडू शकला तो ‘दि. बा.’ यांच्या अनेक उपसूचनांमुळेचं.

दि. बा. यांनी काही काळ महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम केले. त्यावेळी सरकारशी कोणत्याही विषयात गरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी तडजोड करण्याची भूमिका ‘दि. बा.’ यांनी कधीच स्वीकारली नाही. 

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना नवी मुंबईच्या जमीन प्रश्नांवरून पोलीस प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष सुरु झाला. दि.बा.पाटलांनी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे भडकलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली. एसआरपीएफ चे जवान तैनात करण्यात आले. त्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले. कित्येकजण जखमी झाले. परिस्थिती चिघळली. विरोधी पक्ष नेते शरद पवार, समाजवादी नेत्या मृणाल गोरे व इतर नेत्यांना धरपकड करण्यात आली.

पनवेल उरणचा रस्ता सीलबंद करण्यात आला. कोणालाही तिथून प्रवेश देण्यास पोलिसांनी नकार दिला.  

अशातच माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना देखील पोलिसांनी अडवले. पण अंतुले आपल्या स्टाईलमध्ये गरजले,

 दम असेल तर मला अटक करून दाखवा.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना व त्यांच्या सोबत आलेल्या स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना जाऊ दिलं. पण कोणतंही प्रोटेक्शन देण्यात आलं नाही. न्हावा शेवा बंदराच्या जागेसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याना ते थेट जाऊन भेटले. इतर महाराष्ट्रात बदनाम झालेले अंतुले कोकणात मात्र कुलाबा जिल्ह्याच नाव बदलून छत्रपतींच्या रायगडाचं नाव देणारे सुपुत्र म्हणून अजूनही लोकप्रिय होते. 

अंतुलेंनी वसंतदादांची तक्रार करणारे खरमरीत पत्र पंतप्रधानांना पाठवलं.

आपल्याच पक्षातले नेते आपल्या विरुद्ध चालेल्या आंदोलनात मदत करत आहेत हे पाहून मुख्यमंत्री वसंतदादा यांचा पारा चढला होता पण ते काहीही करू शकत नव्हते. मात्र जेव्हा लोकसभा निवडणुका आल्या तेव्हा मात्र त्यांनी अंतुलेंच तिकीट कापून बदला घेतला. त्यांनी तिथले सीटिंग खासदार ए.टी.पाटील यांनाच पुन्हा उभं केलं.  

अंतुले भडकले. त्यांनी थेट अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दाखल केली. त्यांचे एकेकाळचे विरोधक असणारे शरद पवार त्यांचं कौतुक करू लागले. खुद्द दिल्लीतून चंद्रशेखर यांनी जनता दल अंतुलेंना  अशी घोषणा करू लागले. पण स्थानिक जनता नेत्यांनी त्यांना आवर घातला. 

त्यांचा एक जेष्ठ नेता म्हणाला,

“अगदी काही महिन्यांपूर्वीच अंतुलेंच्या भ्रष्टाचारावरून आपण काँग्रेसवर टीका करत होतो त्यांना पाठिंबा दिला तर लोक तोंडात शेण घालतील.”

अखेर त्यांचा प्लॅन बारगळला. अंतुलेंना मात्र आपल्या जनतेवर पूर्ण विश्वास होता. रायगडची जनता आपल्या लाडक्या लेकाला निवडणुकीला पाठिंबा देईल याची त्यांना खात्री होती. इंदिरा गांधींच्या मृत्यूमुळे आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुख्य लढत शेकापचे दि.बा.पाटील विरुद्ध अपक्ष बॅरिस्टर अंतुले अशी झाली.

पण अंतुलेंना अपेक्षा होती तस घडलं नाही. काँग्रेसच्या ए.टी. पाटलांनी त्यांची हक्काची मते खाल्ली. शेतकऱ्यांनी आंदोलनाचे नेते असलेल्या दि.बा.पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणलं. अंतुलेंना सर्वबत मोठा झटका बसला. पक्षापेक्षाही आपलं व्यक्तिमत्व मोठं असल्याचा त्यांचा अहंकार खाली आला. ते सक्रिय राजकारणातून बाहेर फेकल्याप्रमाणे झाले.

जायंट किलर म्हणून दि.बा.पाटील यांची प्रसिद्धी देशभरात झाली. काँग्रेसच्या लाटेत इतर पक्षांची धूळदाण झाली होती तेव्हा शेतकरी कामगार पक्षाचा हा खासदार अगदी ऐटीत संसदेत शिरला.

पुढच्या पाच वर्षात मात्र पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. लोकनेते वसंतदादांचा मृत्यू झाला. काँग्रेसने मधल्या काळात तीन मुख्यमंत्री बदलले. विरोधी पक्षात असलेले शरद पवार राजीव आग्रहाने काँग्रेस मध्ये आले. शिवसेना भाजप युती होऊन महाराष्ट्रात प्रबळ विरोधी पक्ष उभा राहत होता. विशेषतः कोकणात त्यांची ताकद वाढत होती. हे पाहून राजीव गांधींनी अंतुलेंना पुन्हा पक्षात घेतले.

१९८९ सालच्या लोकसभा निवडणुकीत बॅरिस्टर अंतुले पुन्हा दि.बा.पाटलांच्या विरोधात उभे राहिले. काँग्रेसने त्यांच्या प्रचारात कोणतीही कमतरता ठेवली नाही.

गेल्या वेळी प्रमाणे नवी मुंबईच्या शेतकऱ्यांचे आंदोलन पेटलेले नव्हते. दिबा पाटलांनी लोकसभेत शेतकऱ्यांचा प्रश्न उचलून धरणे अपेक्षित होते पण दुर्दैवाने ते हि अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. मतदारसंघात त्यांच्या बद्दल सुप्त विरोध जाणवू लागला होता. पक्के राजकारणी असलेल्या अंतुलेंनी याचा फायदा उठवायचं ठरवलं.

काँग्रेसचे कार्यकर्ते घरांच्या भिंतीवर घोषणा रंगवू लागले,

“हे पहा झोपलेत गाढ पाटील डी.बी. , कोकणासाठी ह्यांनी केले नाही काय बी” 

घोषणेच्या वर खटार्‍यात झोपलेल्या माणसाचे चित्र असायचे(शेकापची निशाणी खटारा होती).

अंतुलेंच्या या जोरदार प्रचाराचा परिणाम झाला. दि.बा.पाटलांची मते घटली नाहीत पण अंतुलेंनी मागच्या वेळपेक्षा तब्बल २ लाख मते जास्त घेतली. शेतकऱ्यांच्या लाडक्या दि.बा.पाटलांचा अनपेक्षित पराभव झाला. एकदा सत्तेत आल्यावर अंतुलेंनी खासदारकीची हॅट्रिक केली. दि.बाना पुन्हा खासदार बनता आले नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.