पाठीवर सिमेंटच्या पोती वाहून राजकारणात आले, सिमेंटच्या घोटाळ्यामुळेच मुख्यमंत्रीपद गेलं

अब्दुल रहमान अंतुले हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर उभा राहतो भारतातला पहिला मोठा घोटाळा आणि त्यात राजीनामा द्यावा लागलेला मुख्यमंत्री. पण अंतुलेंची ओळख फक्त एवढी नाही.

कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं आंबेत. समुद्राची खाडी, अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेलं सुंदर गाव. इथल्याच एका गरीब मुस्लिम कुटुंबात अब्दुल रहमान अंतुले जन्मले. दारिद्र्याचे चटके सोसूनही शिक्षणाची जिद्द त्यांची कमी झाली नाही. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईला अंजुमन इस्लाम शाळेत प्रवेश घेतला. कॉलेजदेखील मुंबईतच झालं.

तो काळ स्वातंत्र्यलढ्याने भारावलेला काळ होता. आबालवृद्ध स्त्री पुरुष या लढ्यात उतरले होते. गांधीजींच्या चरखा चला के आझादी लेंगेची स्वप्न प्रत्येकाला आपलीशी वाटत होती. अंतुले यापासून वेगळे नव्हते.

मुंबईत शिकत असताना आजूबाजूला होत असलेली स्थित्यंतरे ते अनुभवत होते. राजकारणात समाजकारणात काही तरी करायची खुमखुमी अगदी पहिल्यापासून होती. याची सुरवात गावातच केली.

झालं असं होतं आंबेतला सुंदर समुद्र किनारा होता मात्र तिथे बोटी लावण्यासाठी धक्का नव्हता. त्यामुळं बोट मालक तसंच नागरिकांचीही मोठी पंचाईत होत होती. यावर उपाय म्हणून अंतुले यांनी लोकांच्या कडून वर्गणी गोळा करून धक्का बांधायचं ठरवलं. गावातले मित्रमंडळ त्यांच्या मदतीला आलं.

अख्ख गावच गरीब होतं, वर्गणी देऊन देऊन किती देणार पण अंतुलेंकडे चिकाटी मोठी होती. त्यांनी प्रत्येकाकडून १ रुपया ते ५ रुपये अशी वर्गणी गोळा केली. ज्यांना पैसे देता येत नाहीत त्यांना श्रमदान करायला लावलं. हे सगळं करणारा अब्दुल रहमान अंतुले वय असेल फक्त सतरा अठरा.

त्यांच्या संघटन कौशल्यामुळ संपूर्ण गाव कामाला लागलं. स्वतः अंतुलेंनी देखील पाठीवर सिमेंटची गोणी उचलून बांधकामाच्या ठिकाणी आणली. आंबत येथे धक्का उभा राहिला. हे बांधकाम म्हणजे सार्वजनिक जीवनाची सुरवात होती.

तो पर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. गाव पातळीवर, तालुका पातळीवर काम करू लागले. अत्यंत कमी वयात त्यांचा राजकारणात प्रवेश झाला होता.

१९५२ साली देशाची पहिली लोकसभा निवडणूक जाहीर झाली. तेव्हा त्यांच्या कुलाबा मतदारसंघातुन जेष्ठ अर्थतज्ज्ञ चिंतामणराव देशमुख निवडणुकीस उभारले होते. अंतुले यांनी त्यांचा जोरदार प्रचार केला. चिंतामणराव देशमुख निवडून आले, पुढे देशाचे अर्थमंत्री बनले. त्यांना प्रचारावेळी काम करणारा हा चलाख तरतरीत तरुण नजरेत भरला. त्यांनी दिल्लीच्या श्रेष्ठींपर्यंत त्यांचं नाव पोहचवलं.

पुढे बॅरिस्टर व्हायचं या जिद्दीने अब्दुल रहमान अंतुले यांनी इंग्लंडच्या लिंकनइन मध्ये ऍडमिशन मिळवलं. लॉच शिक्षण पूर्ण करता करता लंडनमध्ये राहून त्यांनी आपलं राजकीय चळवळीचं  काम चालूच ठेवलं.

लंडनमध्ये असताना गांधीजींच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण असलेल्या एका पुस्तकाच प्रकाशन झालं, याचा विरोध म्हणून अंतुले यांनी मोठं आंदोलन उभारलं. या आंदोलनाची चर्चा भारतापर्यंत जाऊन पोहचली. भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांची सुपुत्री इंदिरा गांधी लंडनला आल्या होत्या तेव्हा त्यांनी अंतुले यांची भेट घेतली होती.

राजकीय दबदबा मोठा करूनच अंतुले भारतात परत आले आणि फक्त २७-२८ वर्षाचे असताना थेट काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीवर निवडले गेले. दिल्लीमध्ये कष्टाने, आपल्या चातुर्याने त्यांनी खास स्थान निर्माण केलं.

हे चाललं असताना त्यांनी गावाकडे काम करणे देखील सुरूच ठेवले होते, कुलाबा जिल्ह्यात रस्ते  पूल बांधणे, गावोगावी एसटी बस सुरु करणे अशी अनेक कामे त्यांच्याकाळात झाली. शेकापचं प्राबल्य असलेल्या या भागात त्यांनी खेडोपाडी काँग्रेसला नेऊन पोहचवलं.

याच बक्षीस म्हणून त्यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष बनवण्यात आलं. त्यांनी केलेल्या मेहनतीला फळ आले. १९६२ला अंतुले विधानसभेवर निवडून आले. सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकल्यावर वसंतराव नाईकांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं.

पुढे अंतुले राज्यसभेच्या मार्फत राष्ट्रीय राजकारणात गेले. आणीबाणी नंतर जेव्हा काँग्रेस फुटली, तेव्हा इंदिरा गांधी यांच्या पाठीशी राहणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये अंतुलेंचा समावेश होत होता. त्यांच्याच घराला ऑफिस बनवून इंदिरा काँग्रेस सुरु झाली. संजय गांधींचे ते खास बनले.

पुढे जनता पक्षाचे सरकार उलथवून इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. या अखंड निष्ठेचं फळ म्हणून अंतुलेंना मुख्यमंत्रीपद मिळालं. अल्प काळात त्यांनी ते गाजवलं देखील. त्यांचा झपाटा प्रचंड होता. त्यांनी सुरु केलेली संजय गांधी निराधार योजना असो किंवा कुलाबा जिल्ह्याचे नाव रायगड करणे असो, अंतुलेंच्या निर्णयक्षमतेची चर्चा देशपातळी वर होत होती.

एका फटक्यात कर्जमाफीचा तडकपडकी निर्णय घेणारा हा मुख्यमंत्री पुढे मात्र एका मोठ्या घोटाळ्यात अडकला.  

इंडियन एक्स्प्रेसच्या अरुण शौरी यांनी एक बातमी लावून संपूर्ण देशावर बॉम्ब टाकला होता. यात आरोप होते की मुख्यमंत्री अंतुले यांनी ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ स्थापन केली,  याच्या मार्फत अनेक कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात सिमेंटचा पुरवठा करण्याच्या बदल्यात निधी गोळा केला.

त्यावेळी सिमेंटची खरेदी-विक्री राज्य शासनाच्या आखत्यारीत येत असे. याच गोष्टीचा फायदा उचलत अंतुलेंनी प्रतिष्ठानला निधी पुरवणाऱ्या कंत्राटदारांना सिमेंटची उपलब्धता करून देताना त्यांच्यावर मेहेरनजर होईल, याची काळजी घेतली होती. अनेक कंत्राटदारांना त्यांच्या नवीन प्रकल्पांना मंजुरी मिळवताना देखील फायदा मिळवून देण्यात आला होता.

हाच तो कुप्रसिद्ध सिमेंट घोटाळा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकतो ही पहिलीच घटना होती. इंदिरा गांधींनी अंतुलेंना राजीनामा द्यायला लावला. अंतुलेंच्या राजकीय कारकिर्दीवर लगाम बसला.

पुढे त्यांच्यावर अनेक खटले चालले, त्यात ते निर्दोष ही सुटले पण त्यांच्यावरचा सिमेंट घोटाळ्याचा ठपका कधी मिटला नाही. ज्या सिमेंटची गोणी उचलून त्यांनी राजकारणात पाऊल टाकलं त्याच सिमेंटच्या घोटाळ्याने त्यांची राजकीय कारकीर्द खचवून टाकली.

पुढे ते मनमोहन सिंग यांच्या काळात केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री बनले पण पूर्वीचा जोश आणि कामाचा झपाटा वयोमानामुळे उरला नव्हता. मुख्यमंत्रीपदाने त्यांच्यापासून कायमची हुलकावणी दिली होती. २ डिसेंबर २०१४ साली त्यांचे निधन झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.