अंतुलेंनी राष्ट्रवादीच्या तटकरेंच्या पराभवासाठी आकाशपाताळ एक केलं…

ज्यांच्या प्रखर काँग्रेस निष्ठेविषयी मनात शंका येणं हा गुन्हा वाटावा, असे असंख्य ज्येष्ठ नेते देशात होवून गेले. यात अत्यंत सन्मानाने नाव घ्यावं लागतं ते बॅ. ए. आर. अंतुले यांचे. सुरुवातीला आमदार, महाराष्ट्र मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, चार वेळा लोकसभा खासदार, दोन वेळा राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री अशी अनेक चढत्या क्रमांकाची पद भूषवण्याची संधी अंतुले यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मिळाली.

एकमेव १९९९ सालचा औरंगाबादचा अपवाद वगळता अंतुले यांनी या सगळ्या राजकीय लढाया रायगडच्या मातीत लढल्या. ते देखील आयुष्यभर शेकाप सारख्या पक्षाच्या विरोधात काम करुन त्यांनी आपलं हे कॉंग्रेसी राजकारण जिवंत ठेवलं होतं. वाढवलं होतं. १९८४ साली अंतर्गत राजकारणामुळे राजीव गांधी यांनी त्यांच तिकीट कापलं होतं मात्र १९८९ ला राजीव गांधींनीच त्यांना स्वतःहून तिकीट दिलं होतं.

पण अशा या अंतुलेंनीच एकदा कॉंग्रेसच्या विरोधात जाऊन शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. आणि प्रचार देखील केला होता.

देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वर्षात म्हणजे १९४८ साली शंकरराव मोरे, केशवराव जेधे, जवळकर, उस्मानाबादचे भाई उद्धवराव पाटील अशा ताज्या दमाच्या तरुणांनी स्थापन केलेल्या शेकापने अवघ्या थोड्या कालावधीत काँग्रेसला टक्कर देण्यापर्यंत मजल मारली होती. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शेकापलाच स्थान मिळाले होते.

याच काळात रायगड जिल्ह्यात या पक्षाने आपली पाळेमुळे घट्ट रुजवली. डी. एन. आणि पी. एन. या पाटील बंधूंनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाखेरीज अन्य कोणाकडे सत्ता जाणार नाही, याची अगदी व्यवस्थित तरतुद करुन ठेवली होती. त्यामुळे श्रीवर्धनसारख्या एखादा अपवाद वगळता जिल्ह्यात आमदार शेकापचे, रायगड जिल्हा परिषद याच पक्षाच्या ताब्यात आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि अन्य छोटया- मोठ्या संस्थाही शेतकरी कामगार पक्षाकडेच असायच्या. पण या साऱ्या वातावरणात संपूर्ण जिल्ह्यात शेकाप विरोधात एकांडी शिलेदारी करीत लढले ते फक्त बॅरिस्टर ए. आर. अंतुले.

लोकांना एकत्र करून श्रमदानातून सावित्री नदीवर  जेटीची उभारणे, श्रमदानातून आजूबाजूच्या खेडयातपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्त्यांची बांधणी करण्यासारखे उपक्रम राबवून अंतुले यांनी काँग्रेसच्या मागे जनशक्ती उभी करण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न  केला. या ताकतीच्या जोरावरच अंतुले यांनी १९८९ ते १९९६ अशा सलग तीन लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला हादरा दिला. शेकापच्या अनेक मान्यवर नेत्यांचा त्यांनी वेळोवेळी रायगडच्या भूमीत पराभव केला.

२००४ च्या निवडणुकीत अंतुले पुन्हा विजयी झाले. २००९ ला अंतुले पराभूत झाले पण त्यांनी जवळपास २ लाख ६७ हजार मत घेतली होती. त्यामुळेच रायगड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ बनला होता.

पण २०१४ मध्ये मात्र हा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडण्यात आला. नेमका याच गोष्टीला अंतुले यांनी विरोध केला होता. ही जागा काँग्रेसची आहे कॉंग्रेस पक्षानेच ती लढवावी असा त्यांचा आग्रह होता.

पण अखेर राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे यांनी इथून अर्ज भरला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील याच अंतर्गत मतभेदामुळे अंतुले यांनी त्यावेळी शेकापला पाठिंबा जाहिर केला.

त्यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी शेकापने रमेश कदम यांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. पण कदम यांच्या प्रचाराची सर्व धुरा बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पाठिंब्यावर असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. शेकापच्या प्रचारसभा, बॅनर्स, प्रचार साहित्यावर अंतुले यांचे फोटो झळकले होते.

एवढचं नाही तर रमेश कदम यांना मत द्या असं आवाहन करणारं अंतुले यांचं पत्र शेकापनं प्रसिद्ध केलं होतं. यात अंतुलेंनी तटकरेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. तटकरे यांच्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी त्यांची संपत्त्ती किती होती आणि आज त्यांची संपत्ती किती आहे? ही संपत्ती आली कुठून? माझा फायदा आणि गैरफायदा घेऊन नंतर पाठीत खंजीर खुपसणाऱ्या तटकरेंना दिल्लीत पाठवणार का? असं अंतुलेंनी या पत्रात विचारलं होतं. भ्रष्टाचारामुळे रायगडचं मत बदनाम करू नका. आपले मत रमेश कदम यांना द्या, असं आवहन अंतुले यांनी पत्रातून केलं होतं.

सोबतच अंतुले यांच्या सविस्तर मुलाखतीची सीडी शेकापने तयार केली होती. गावागावात जाऊन, प्रचार सभांमधून ही सीडी दाखवली जायची. या मुलाखतींमध्ये अंतुले हे सुनील तटकरे, शरद पवार आणि सोनिया गांधींविरोधात उघड टीका करत असल्याचं दिसून आलं होतं.

अखेरीस निकाल लागला तेव्हा अवघ्या दोन हजार मतांनी शिवसेनेचे अनंत गिते निवडून आले होते. अनंत गिते यांना ३ लाख ९६ हजार १७८, तर सुनील तटकरे यांना ३ लाख ९४ हजार ६८, आणि शेकापच्या रमेश कदमांना १ लाख २९ हजार मतं मिळाली होती. गिते यांना एकूण मतदानापैकी ४०.११ टक्के, तर तटकरे यांना ३९.८९ टक्के मतदान झालं होतं.

मात्र त्यानंतर २०१९ च्या निवडणूकीत मात्र इथून सुनिल तटकरे निवडून गेले आहेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.