अमिताभ बच्चनच्या एका विनंतीमुळं शशी कपूरच्या इज्जतीचा कचरा होता होता राहिला…

ख्यातनाम पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या स्वराने आणि गीताने रसिकांवर फार मोठी जादू करून ठेवली आहे. आज रफीला आपल्यातून जाऊन चाळीस वर्षाचा कालावधी जरी लोटला असला तरी रफीची गाणी आजच्या तरुण पिढीला देखील मोहून टाकतात. 

रफी गायक म्हणून जितके श्रेष्ठ होते तिचकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त माणूस म्हणून ते ग्रेट होते!

त्यांच्या या माणुसकीचे अनेक किस्से आपल्याला संगीताच्या दुनियेतील व्यक्तींकडून वेळोवेळी ऐकावयास मिळतात. यातून रफीच्या माणूस म्हणून असलेल्या हिमालयीन उंचीची साक्ष रसिकांना मिळते. अडचणीत असलेल्या प्रत्येकाच्या मदतीला ते धावून जात असंत. आपल्या पोझिशन चा कर्तृत्वाचा बडेजाव त्यांनी कधीच दाखवला नाअहीए.

हा किस्सा १९७७  सालचा आहे. त्यावेळी शशि कपूर ने पुन्हा एकदा पृथ्वी थिएटर्स चे पुनर्जीवन केले होते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून त्याने पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

या कार्यक्रमाला चित्रपट कलावंतांसोबतच संगीत क्षेत्रातील दिग्गजांना देखील शशी कपूर ने आमंत्रित केले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांनी उदंड पाठिंबा दिला होता आणि या कार्यक्रमाचे तिकीट विक्री आठवडाभर आधीच संपली होती! सर्व रसिकांमध्ये या कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता होती. 

पहिल्या दिवशी अमिताभ बच्चन, रेखा , रणधीर कपूर, शबाना आजमी आणि मोहम्मद रफी यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाचा खरा हुकमी एक्का होता मोहम्मद रफी. कारण त्याच्या स्वराने संपूर्ण कार्यक्रमात प्रचंड दाद मिळवली होती. रसिक रफीला एका मागोमाग एक गीतांची फर्माईश करत होते. आणि रफी देखील त्यांची आवड पुरवत होता. ती रजनी गाजवली रफीने. शशी कपूर देखील खूष होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी रफी मुंबईला जाण्यासाठी सिलिगुडी एअरपोर्टवर गेले. आता शशी कपूरला उत्सुकता होती दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची. या दिवशी गायिका सुलक्षणा पंडित येणार होती.

मोहम्मद रफी एअरपोर्टला रवाना झाले आणि इकडे शशी कपूरला एक बातमी कळाली; सुलक्षणा पंडित काही कार्यक्रमाला येऊ शकत नाही!

आता हवालदील होण्याची पाळी शशी कपूरची होती. कारण कार्यक्रमाची संपूर्ण तिकीट विक्री झाली होती. सुलक्षणा पंडितचे त्या काळात मोठे नाव होते. रसिक तिचे गाणे ऐकायला देखील उत्सुक होते. पण काही कारणामुळे ती कार्यक्रमाला येऊ शकणार नव्हती. आता काय करायचे? हा मोठा प्रश्न होता. 

रफी देखील एअरपोर्टवर जाऊन पोहोचले होते. शशी कपूर आणि अमिताभ बच्चन सोबत चर्चा केली. त्यावेळी दोघांनी असे ठरवले की अमिताभ बच्चन ताबडतोब विमानतळावर जायचे आणि रफीला विनंती करून पुन्हा एकदा आजच्या दिवशी सिलीगुडी च्या कार्यक्रमासाठी ठेवून घ्यायचे. 

वेळ कमी होती. प्रसंग बाका होता. त्यामुळे ताबडतोब अमिताभ बच्चन विमानतळाकडे रवाना झाले. विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की रफी ऑलरेडी विमानात जाऊन बसले आहेत आणि विमानाचे दारे देखील बंद झालेले आहेत. हे विमान कुठल्याही क्षणी हवेत झेप घेणार आहे. अमिताभ बच्चन यांनी ताबडतोब एअरपोर्ट अथोरिटीजला जाऊन विनंती केली आणि काही क्षणासाठी विमानाचे उड्डाण थांबवा असे सांगितले.

एअरपोर्ट अथोरिटी अर्थातच ऐकायला तयार नव्हते.

परंतु अमिताभ बच्चन यांनी खूप विनंती केल्यानंतर त्यांनी परवानगी दिली.अमिताभ बच्चन ताबडतोब विमानात पोहोचले आणि रफीला उभ्या उभ्याच सर्व प्रसंग सांगितला. रफीने शांतपणे ऐकून घेतले काहीही न बोलता ते उठले. आपली हॅन्डबॅग हातात घेतली आणि अमिताभ बच्चनला म्हणाले ,”चला!”

अमिताभ बच्चन आणि रफी दोघेही विमानतळाच्या बाहेर आले आणि थोड्याच वेळात ते कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले. शशी कपूरच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. कारण आपल्या पित्याच्या स्मृती प्रित्यर्थ त्याने पुन्हा एकदा पृथ्वी थियेटर च्या कार्यक्रमाला सुरुवात केली होती आणि या कार्यक्रमाला सुलक्षणा पंडित येणार नसल्याने मोठा बाकाप्रसंगी निर्माण झाला होता.

परंतु रफी यांनी काहीही कुरबुर न करता विमानातून उतरून पुन्हा एकदा कार्यक्रमाला आले. त्या दिवशी पुन्हा सिलिगुडी वासियांनी रफीच्या आवाजाची नजाकत अनुभवली. कार्यक्रम सक्सेसफुल झाला तो केवळ रफी मुळे!

– भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.