दुसऱ्या महायुद्धात तीन वेगवेगळ्या देशांकडून लढलेला एकमेव सैनिक !

D Day,६ जून १९४४ दुसऱ्या महायुद्धाचे फासे पलटवून जर्मनीच्या शेवटाची सुरुवात झाली तो दिवस. अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्य फ्रान्समधल्या नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर उतरले. समुद्रावरच्या बीचपोस्ट वरून होणाऱ्या मशीन गनच्या प्रचंड माऱ्यात काहींनी किनारा गाठला. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल. फक्त इच्छाशक्ती आणि संख्याबळ या दोनच गोष्टी त्यांच्या बाजूने होत्या. त्याच्याच जोरावर त्यांनी चिवट झुंज दिली आणि नॉर्मंडीच्या मुख्य भूमीपर्यंत ते यशस्वीपणे पोचले. या ५०-१०० मीटर च्या बीचवर हजारो अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्य मारले गेले.
त्यामुळे मुख्यभूमीपर्यंत जिवंत पोचलेले सैन्य सुडाने पेटले होते. समोर येणाऱ्या प्रत्येक जर्मन सैन्याला गोळी घालत ते पुढे निघाले. शरणागती पत्करण्यासाठी आलेल्या जर्मनांना सुद्धा सरळ गोळ्या घालून संपवले गेले. त्याच वेळी अमेरिकन पॅराट्रूपर्स च्या एका तुकडीसमोर काही जर्मन सैनिकांनी शरणागती पत्करली. या सैनिकांमध्ये त्यांना एक जपानी सैनिक त्यांना दिसला. पण खरंतर तो जपानी नव्हता.
तो होता कोरियन वंशाचा यांग क्योंगजंग !
कोरिया, एक असा देश ज्याचा दुसऱ्या महायुद्धाशी तसा काहीच संबंध नव्हता. आणि असा हा कोरियन यांग, हा दुसऱ्या महायुद्धात जपान, रशिया आणि जर्मनी या तीन देशांकडून लढला आणि तसा तो एकमेव सैनिक होता.
यांग अठरा वर्षाचा असताना जपानच्या सैन्याने त्याला ताब्यात घेतले आणि सक्तीने आपल्या सैन्यात भरती करवून घेतले.(कोरियावर तेव्हा जपानचे राज्य होते) जपान आणि सोविएत रशिया यांच्यात झालेल्या खालकीन गोल च्या लढाईत जपानचा पराभव करून सोविएत रशिया हजारो युद्धकैदी ताब्यात घेतले त्यामध्ये एक होता यांग क्योंगजंग. त्यानंतर यांगची रवानगी रशियन श्रमछावणीत झाली.
खरंतर युद्धकैद्यांना आपल्या देशाच्या सैन्यातून लढवायला कुठलाही देश तयार नसतो पण दुसऱ्या महायुद्धाची परिस्थितीच अशी बिकट होती आणि मनुष्यहानीचे आकडेच एवढे प्रचंड होते कि त्यांनी युद्धकैद्यांना देखील रणांगणात उतरवले. १९४३ मध्ये रशियाच्या पूर्व सीमेवर आताच्या खार्कोव्ह मध्ये झालेल्या लढाईत जर्मनीने सोविएत रशियाला हरवले व मोठ्या प्रमाणात युद्धकैद्यांना ताब्यात घेतले ज्यामध्ये यांग होता.
जर्मनीलाही एव्हाना उतरती कळा लागली होती, त्यांनी यांगला आपल्या पूर्व सीमेवर फ्रान्समध्ये पाठवले. जिथे अखेर नॉर्मंडीच्या लढाईत अमेरिकन सैन्याने त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या नशिबाचे फेरे संपले. युद्धाशी काहीच संबंध नसलेला यांग जपान, सोविएत रशिया आणि जर्मनी या तीन देशांकडून लढला.
आणि ज्या युद्धात जवळजवळ ६ कोटी लोक मारले गेले त्यातून तो सहीसलामत बाहेर पडला. युद्धकैदी म्हणून अमेरिकेला नेलेल्या यांग ला युद्धानंतर सोडून देण्यात आले. यांग ने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले व तो अमेरिकेत इलियोनोई प्रांतात स्थायिक झाला. १९९२ मध्ये त्याने तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला.
-
भिडू रणजीत यादव.
chaan lihalyes ranjit… asach vachniya tujhya kadun milo ..