पंडित नेहरूंचे खास मित्र, ज्यांनी मस्जिदीत जाऊन मतं मागायला नकार दिला

उत्तर प्रदेशात सध्या विधानसभेच्या निवडणूका सुरु आहेत. सध्या ३ टप्प्यातलं मतदान झालं असून आज मतदाराचा चौथा टप्पा आहे. अश्यात सगळ्या देशात युपी आणि यूपीतल्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरु आहे. तसही यूपीतलं राजकारण हे खऱ्या अर्थाने दिल्लीतलं राजकारण असतं असं म्हणतात. त्यात यूपीतला गाझीपूर नॅशनल लेव्हलचा विषय, कारण इथूनचं देशाला अनेक दिग्गज नेते मिळालेत. त्यातलंच एक नाव म्हणजे शौकतुल्लाह अन्सारी. 

शौकतुल्ला अन्सारी यांचा जन्म गाझीपूर मधला. अन्सारी यांच्या वडिलांची गणना शहरातील उच्चभ्रूंमध्ये व्हायची. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती, त्यामुळे अभ्यासासाठी त्यांनी फ्रान्स गाठले. पुढे त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्ते म्हणून त्यांनी असहकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. 

स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये त्यांची तुर्कीमधील अंकारा येथील भारतीय दूतावासात वाणिज्यदूत म्हणून नियुक्ती झाली. १९५२ साली डॉ. अन्सारी यांनी हैद्राबादच्या बिदरमधून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. संसद सदस्य म्हणून त्यांनी परराष्ट्र व्यवहारासाठी सल्लागार समितीवर काम केले. पुढे १९५४ ते १९५५ मध्ये  भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्रात गेले. 

हैदराबादमधील बिदर मतदारसंघातून खासदार झाल्यानंतर अन्सारी यांनी १९५७ ची निवडणूक यूपीच्या रसडा लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. पंडित नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अन्सारी हे नेहरूंचे अत्यंत जवळचे मित्र होते. असं म्हणतात, अन्सारी यांना त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून नेहरूंना मंत्री बनवायचे होते. 

१९५७ च्या या निवडणुकीत त्यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरजू पांडे हे रिंगणात होते. पांडे आयुष्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते. दरम्यान, शौकतुल्ला अन्सारी यांच्याबद्दलची खास गोष्ट म्हणजे त्यांची धर्मनिरपेक्षता. हे दाखवणारा एक किस्सा असा कि…

 अन्सारी एकदा त्यांच्या समर्थकांसह निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर पडले होते. शुक्रवार होता म्हणजे जुम्म्याचा दिवस. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जवळच्या मशिदीत अजान सुरू झाली. त्यामुळं मशिदीत जाऊन नमाज अदा करू, आणि तिथेच लोकांना आपल्या बाजूने मतदान  करायला सांगू असे त्यांच्यासोबतच्या मंडळींनी म्हंटल. 

पण यावर  अन्सारी म्हणाले, ‘आज जुम्म्याचा दिवस आहे. ते नमाज नक्कीच अदा करतील, पण मतांसाठी काहीही बोलणार नाही.’ समर्थकांना अन्सारी यांचं हे बोलणं आधी समजलं नाही. पण अन्सारी यांनी मस्जिदमध्ये जाऊन मतदान मागणं म्हणजे आपल्या धर्मनिरपेक्षतेचा आणि तत्त्वांचा अपमान आहे असं मानलं. 

दरम्यान, १९५७ च्या या निवडणुकीत अन्सारी यांच्या समर्थनार्थ जवाहरलाल नेहरूंनीही रसडा येथे निवडणूक सभेला संबोधित केले होते, परंतु काँग्रेसची जोरदार लाट, नेहरूंची जाहीर सभा एवढं असून सुद्धा अन्सारी यांना निवडणूक जिंकता आली नाही. आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे सरजू पांडे विजयी झाले. त्यानंतर नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांना ओडिशाचे राज्यपाल करण्यात आले. ओडिशात राहूनही ते गाझीपूरच्या विकासाशी संबंधित कामात रस घ्यायचे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.