असं एक राज्य जिथल्या लोकांनी भारत पण चालवला आणि पाकिस्तान सुद्धा…

पंजाबमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलंय. राज्यातील विधानसभेच्या ११७ जागांसाठी येत्या २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. आणि त्याच्या पुढच्याच महिन्यात १० मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी जय्यत तयारी सुरु केलीये.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच यावेळी अटीतटीचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. कारण १९४७ नंतर बहुतेक वेळा राज्यात काँग्रेसचाच बोलबाला राहिलाय. पण काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पंजाबमध्ये यावेळी परिस्थिती मात्र बदललेली पाहायला मिळतेय. कारण काँग्रेसची पक्षांतर भांडण इतकी वाढली कि निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रीच बदलावा लागला.

त्यात शेतकरी आंदोलनामुळे भाजपला चांगलाच फटका बसलाय, महत्वाचं म्हणजे एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर पडलंय, आणि या सगळ्याचा फायदा घेत आम आदमी पक्ष राज्यातला मोठा पक्ष म्हणून समोर यायला सुरुवात झालीये. त्यात शेतकरी संघटना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात त्यामुळे यंदाची हि लढत पंचकोनी झालीये. 

आता निवडणूक म्हंटल कि, उमेदवार, प्रचार, रॅली आणि तिथले किस्से हे नेहमी चर्चेचा विषय असतात. तसं पंजाब हे नेहमीच चर्चेत असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. त्यात नुकताच झालेल्या शेतकरी आंदोलनामुळे तर जगभरात पंजाबचाच डंका होता.

आता पंजाब जितकं सांस्कृतिक दृष्ट्या चर्चेत असतं तितकं राजकीय दृष्ट्या सुद्धा. अशीच पंजाबची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पंजाब एकमेव असं राज्य आहे ज्यानं भारताला पंतप्रधान आणि राष्ट्रपती असे दोन्ही महत्वाचे राज्यकर्ते दिलेतच, पण आपल्या शेजारच्या पाकिस्तानला सुद्धा पंतप्रधान आणि राष्ट्रपती मिळवून दिलेत. 

म्हणजे आपण भारताबद्दल बोलायचं झालं तर, १९८२ ते १९८७ पर्यंत ज्ञानी झैल सिंग हे देशाचे राष्ट्रपती होते. त्यांचा कार्यकाळात चर्चेत राहिला तो ऑपरेशन ब्लु स्टार, इंदिरा गांधींची हत्या आणि शीख विरोधी दंग्यांमुळं. ते एकमेव शीख राष्ट्रपती देशाला मिळाले होते.

तर पंजाबमधून पंतप्रधान पदावर बसलेलं चर्चेतलं नाव म्हणजे मनमोहन सिंग. ज्यांचा कार्यकाळ मोठा वादग्रस्त राहिला. त्यांचा मूळ जन्म हा गाहचा, हा भाग सध्या पाकिस्तान अधिकृत पंजाबमध्ये आहे. २००४ ते २०१४ पर्यंत दोन वेळा ते देशाचे पंतप्रधान बनले.

तर पाकिस्तान विषयी बोलायचे झाले तर तिथले माजी राष्ट्रपती मोहम्मद जिया उल हक. ते मूळचे पंजाबच्या जालंधर भागाचे १९२४ साली त्यांचा जन्म झाला. पण ज्यावेळी देशाची फाळणी झाली त्यांनी भारतात न राहता पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. पुढे १९७८ ते १९८८ पर्यंत ते पाकिस्तानचे राष्ट्रपती होते .

आणि पाकिस्तानचे सध्याचे वादग्रस्त पंतप्रधान इम्रान खान हे सुद्धा पंजाबचेच. त्यांचाही संबंध जालंधर भागाशी आहे. पण विभाजनावेळी जेव्हा जनतेला पाकिस्तान कि भारत असा पर्याय देण्यात आला होता तेव्हा त्यांच्या कुटुंबाने जालंधर सोडून पाकिस्तानच्या लाहोरमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. इम्रान हे पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचे कॅप्टन सुद्धा राहिले आहेत. आणि सध्या २०१८ पासून ते पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळत आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.