या कारणामुळे इंदिरा गांधी यांच्या समाधीवर शिळा ठेवण्यात आली आहे
इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी यांचं स्मृतिस्थळ जर तुम्ही पाहिलं तर, तिथे कोणत्याही प्रकारची समाधी किंवा स्मारक बांधलेल दिसत नाही. त्याऐवजी फक्त एक मोठा दगड उभा करून ठेवला दिसतो.
पण असं का? इंदिरा गांधी इतक्या मोठ्या नेत्या होत्या परंतु त्यांचं स्मारक बांधण्याऐवजी हा दगड तिथे का ठेवण्यात आला?
तर यामागचं कारण आहे इंदिरा गांधी यांचं व्यक्तिमत्व…
इंदिरा गांधी या अतिशय निर्भीड आणि खमक्या स्वभावाच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातं होत्या. परदेशात भारताने ताठ मानेने आणि अभिमानाने उभे राहावे हा त्यांनीच घालून दिलेला धडा मानला जातो. देशात राजवाड्यांचे तनखे बंद करण्यापासून शेजारील बांग्लादेशाची निर्मिती करण्यापर्यंत इंदिरा गांधी यांनी अनेक महत्वाचे निर्णय अगदी खंबीरपणे घेतले होते.
त्यांचं व्यक्तिमत्व लोखंडासारखं मजबूत आणि दगडासारखं स्थिर होतं त्यामुळे त्यांचं स्मारक बनवतांना याच गोष्टींचा विचार करण्यात आला. त्यांच्या स्मारकाला शक्ती स्थळ असं नाव देण्यात आलं आणि यावर साजेशी अशी सुंदर आणि विशाल लोहयुक्त शिळा ठेवण्याची संकल्पना मांडण्यात आली. लागलीच केंद्र सरकारने सुद्धा ही कल्पना मान्य केली.
मात्र कल्पना जरी मान्य झाली असली तरी अशी लोहयुक्त शिळा आणायची कुठून असा प्रश्न स्मारक समितीपुढे होता.
तेव्हा या स्मारकासाठी लागणारी शिळा शोधण्यासाठी देशात लोहखनिजाचे भंडार असलेल्या ओडिशा राज्यातील लोखंडाच्या खाणींची निवड करण्यात आली. जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे तत्कालीन महानिर्देशक सॅलेन मुखर्जी यांच्याकडे ही शिळा शोधण्याची जबादारी देण्यात आली.
मुखर्जी यांनी ओडिशाच्या उत्तरेला असलेल्या रोऊरकेला शहरापासून १०० किमी लांबीवर असलेल्या बरसुआन लोह खाणीची निवड केली. त्यानंतर रोऊरकेला स्टील प्लॅन्टचे निवृत्त महानिर्देशक रमेश चंद्र मोहंती आणि सॅलेन मुखर्जी यांनी मिळून या शिळेचा शोध घ्यायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी हजारो दगडं शोधली पण शेवटी एका शिळेवर त्यांचं एकमत झालं.
दोघांचं एकमत झालेल्या या शिळेमध्ये काही वैशिष्ठ्य आहेत.
२५ टन वजनाची ही शिळा भव्य आकाराची आहे. या शिळेचा आकार नैसर्गिक रित्या हाताच्या पंजासारखा दिसतो. जेस्पर कॅटेगिरीमध्ये असलेल्या या शिळेत लोखंडाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिचा रंग लाल आहे. तसेच या शिळेवर जॅकहॅमर ड्रिलिंगमुळे छोटे छोटे छिद्र पडले आहेत, जे इंदिरा गांधी यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्यांची आठवण करून देतात.
निवडण्यात आलेली ही शिळा इंदिरा गांधी यांचे विश्वासू पुपुल जयकर यांना दाखवण्यात आली. शिळेला बघून त्यांनी सुद्धा परवानगी दिली. त्यानंतर या शिळेला जसंच्या तसं दिल्लीला पोहचवण्यासाठी प्रवास सुरु झाला.
पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता.
बरसूआ खान ही डोंगराळ भागात आहे त्यामुळे या शिळेला डोंगरावरून खाली घाटामध्ये उतरवण्यामध्ये चांगलीच दमछाक झाली. डोंगराळ खाणीपासून घाटापर्यंतचा १० किमी रस्त्यावरची पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर ही शिळा खाली घाटात उतरवण्यात आली. घाटात पोहोचलेल्या या शिळेला क्रेनच्या साहाय्याने एका ट्रेलरवर चढवण्यात आलं.
ट्रेलरच्या माध्यमातून ही शिळा १०० किमी दूर असलेल्या रोऊरकेला शहरात पोहोचली. तिथून ही शिळा दिल्लीला पोहोचवण्यासाठी एक स्पेशल ट्रेन तयार ठेवण्यात आली होती. त्यानंतर ट्रेलरवरून ही शिळा पुन्हा क्रेनने ट्रेनवर लोड करण्यात आली. या स्पेशल ट्रेनला कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही कारणाने थांबवण्यात येऊ नये यासाठी, स्पेशल रूट क्लियरन्स देण्यात आलं होतं. यासाठी प्रत्येक स्टेशनवर रेल्वेच्या रूटची काळजी घेण्यात आली.
रोऊरकेला ते दिल्ली असा १ हजार ४३६ किमी लांबीचा अखंड प्रवास करून अखेर ही शिळा दिल्लीला पोहोचवण्यात आली आणि इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळावर उभ्या स्थितीत ठेवण्यात आली. तेव्हापासून ही शिळा इंदिरा गांधी यांच्या खंबीर व्यक्तिमत्वाचं प्रतीक म्हणून शक्ति स्थळावर उभी आहे.
हे ही वाच भिडू
- आणीबाणीला विरोध करणाऱ्या दुर्गाबाईंना इंदिरा गांधींनी पद्मश्री देऊ केला होता..
- देशात फक्त ६ जणांना ठाऊक होतं, इंदिरा गांधी अणुचाचणी करणार आहेत..
- इंदिरा गांधी म्हणाल्या, “गरीब असलो म्हणून काय झालं फॉरेन मध्ये नेहमी ताठ मानेनेच राहायचं.”