गलवानच्या हद्दीत घुसताना चिन्यांना आता दहा वेळा विचार करावा लागेल !

गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीला आज एक वर्ष पूर्ण झालंय. मागच्या वर्षी १५ जूनला चीनच्या सैनिकांनी गस्तीच्या वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती.

या झटापटीत भारताचे २० सैनिक शहीद झाले होते, तर चीनने केवळ चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचं कबूल केलं होतं. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सध्या सीमेवर शांतता आहे आणि सैनिक मागे घेण्याचं काम सुरु आहे. पण वातावरण अजूनही गढुळच आहे.

याला कारण चीनने आजवर जेवढी आश्वासनं दिली त्याच्याविरोधात जाऊन हिंसक कारवाया केल्या आहेत.

या हिंसेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबद्दल अद्याप ही संदिग्धता आहे. भूतकाळात वळून पाहताना असे दिसते की हा नियोजित हल्ला नव्हता तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर जे घडलं त्याचा परिपाक होता. या हिंसाचारासाठी दोन्ही बाजूंनी एकमेकांना दोष देण्यात आले. पण इथं एक गोष्ट अधोरेखित होते.

ती म्हणजे LAC  क्रॉस करून भारतीय हद्दीत येण्याचा चिनी सैन्याला कोणताच अधिकार नव्हता.

१९७५ नंतरचा हा पहिलाच हिंसक संघर्ष होता. या संघर्षापूर्वी सीमेच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केल्याने आणि पॅंगोंग त्सो भागात झालेल्या चकमकींमुळे संपूर्ण जगाला असं वाटत होत की, या दोन आशियाई महासत्ता आता युद्धच करणार.

त्यापुढं जाऊन युद्ध होणार असं टेन्शन सर्वसामान्य लोकांना ही यायला लागल होतं. याच कारण ही तसचं होत, ते म्हणजे  जिथं वाद सुरु होता त्या भागाचे कमर्शियल सॅटेलाईट फोटो यायला सुरुवात झाली होती. आणि माध्यमं त्या फोटोंचं विश्लेषण करून नॅशनल टेलिव्हिजन वर बातम्या देत होते.

तर दुसरीकडं सरकारने मात्र आपल्या बाजूने फारच कमी माहिती दिली होती. काय चाललंय कळायला मार्ग नव्हता.

अशातच जुलै २०२० च्या सुरुवातीला, दोन्ही बाजूंच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये चर्चा झाली. आणि अशी माहिती समोर आली कि, दोन्ही बाजूंचे सैनिक गलवान क्लॅश पॉईंटच्या १.५ किमी मागे घेण्यात आले आहेत.

ऑगस्ट २०२० च्या उत्तरार्धात भारतीय सैन्याने पॅंगोंग त्सो शेजारील कैलास हाइट्स ताब्यात घेतल्यावर तणाव पुन्हा वाढला होता. कारण तिथून भारतीय सैन्य स्पॅन्गुर त्सो या चिनी पोजीशनवर नजर ठेवू शकत होते. काही ठिकाणी वॉर्निंग शॉर्ट्स फायर करण्यात आले. पण प्रकरण शारीरिक हिंसाचारापर्यंत गेलं नाही.

सप्टेंबर २०२० पासून दोन्ही बाजूला थोडी शांतता आहे. पॅंगोंग त्सो क्षेत्रातला हा संघर्ष टाळण्यासाठी   दोन्ही बाजूंनी बोलणी सुरु केली.

अमेरिका, रशियाने बघ्याची भूमिका घेतली..

कोरोनाच्या काळात सुरु असलेला हा चीन्यांचा तमाशा खरं तर दुसऱ्याच कारणासाठी होता. खरं तर त्या दरम्यानच अमेरिका आणि चीन या जगातील दोन प्रमुख राष्ट्रांमध्ये कलह सुरु होते. यावर अनेक तज्ञांचे मत होते की LAC वर चिनी हल्ल्यामागील कारण म्हणजे भारत आणि अमेरिकेमधील वाढती मैत्री आणि लष्करी सहकार्य आहे.

तदनंतर जेव्हा ट्रम्प प्रशासनाने चीन्यांच्या विरोधात मोहीम उघडली तेव्हा अमेरिकी अधिकाऱ्यांनी लडाखचा मुद्दा पण उचलून धरला. तत्कालीन राज्यमंत्री माईक पोम्पीओ यांनी चीन सरकारवर लडाखमध्ये “अविश्वसनीय आक्रमक कृती” केल्याचा आरोप केला आणि असे म्हटले की चीनचे अनेक देशांसोबत सीमा विवाद आहेत.

पण अमेरिकन तज्ज्ञ जेफ स्मिथच्या म्हणण्यानुसार,

भारताने अमेरिकेला बोलताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. कारण चीन-अमेरिकेचे शत्रुत्व जगजाहीर आहे. पण या शत्रुत्वामुळे भारत ही या संघर्षात ओढला गेलाय असा चिनी प्रोपोगंडा सुरु होता. आणि या चीनी स्टोरीला बळकटी मिळू नये. जेणेकरून भारतीय जनमानसात भारतीय सरकारची प्रतिमा मालिन होईल.

रशियाने या वादात आपली भूमिका संयमित ठेवली. गलवान हिंसाचाराच्या अवघ्या एका आठवड्यानंतर रशिया-चीन-भारत व्हर्च्युअल बैठक झाली. नंतर माध्यमांशी बोलताना रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की,

परस्पर वाद सोडविण्यासाठी चीन आणि भारताला कोणत्याही मदतीची गरज नाही.

आणि हे बोलून रशियाने अमेरिकेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात ‘चीनी निर्भरता’ ऐवजी ‘आत्मनिर्भर’तेची मागणी जोर धरू लागली. पण उलटं व्यापार वाढलाच होता.

पूर्व लडाखमधील संघर्षाचा परिणाम भारत-चीन व्यापारावर दिसलाच नाही. २०२० मध्ये चीनमधील भारतीय निर्यातीत १०% वाढ झाली आणि निर्यात $ २०.८६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोचली. २०२१ च्या पहिल्या ५ महिन्यांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापारात ७०.१ टक्क्यांनी वाढ होऊन ती ४८.१६  अब्ज डॉलर्सवर गेली. हे स्पष्ट झालं की गलवान हिंसाचारानंतर चीन-भारत व्यापारात काहीच घट झाली नाही.

अमेरिका रशियाने हात वर केल्यावर भारताने आपली सुरक्षा वाढवण्यावर भर दिला.

सैन्यदलातल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितलं, “सैन्य म्हणून अधिक सक्षम होण्यासाठी गलवान खोऱ्यातला अनुभव महत्वाचा ठरतोय. गलवान खोऱ्यातील हिंसेनंतर उत्तरेकडील सीमेवर राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणं महत्वाचं आहे. आणि याबाबत सैन्याला नवीन दृष्टिकोन मिळाला. चीननेही उंचावरील क्षेत्रातील अनेक भागात आपलं सैन्य वाढवल्याचंही आम्हाला समजलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या तीन दलांमधील ताळमेळ आणि एकजूट वाढण्यावर भर दिला.LAC वरील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय सुरक्षा नियोजकांना चीनच्या संभाव्य अतिरेकी कारवायांच्या दृष्टिकोनातून रणनीती आखणे व दीर्घकालीन उद्दीष्टांचे पुनर्वापर करण्यास मदत झाली.

दोन्ही देशांवर अजूनही अविश्वासाचे ढग आहेत. पण भारत पूर्व लडाख आण अन्य क्षेत्रात LAC जवळ कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. सैन्य आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्या. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने फेब्रुवारी महिन्यात पँगाँग तलावाच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील किनाऱ्यावरुन सैनिक आणि शस्त्र हटवण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

पण तरीही शस्त्र आणि सैन्यबळ वाढविण्यात येत आहे हे ही तितकंच खरं आहे.

हे ही वाचा भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.