बाळासाहेब म्हणायचे मुंबई काय धर्मशाळा लागून गेली काय? कुणीही येतं अन सेटल होतं

महाविकास आघाडीची स्थापना झाली तशी राजकीय वादळांना आमंत्रण मिळालं. भाजपला थेट नकार देत शिवसेनेने युती तोडली तर अजित पवारांनी भाजपला गुलीगत धोका देत आघाडी सरकार स्थापन केले. आणि राज्यात ईडीचे एपिसोड सुरु झाले. सद्या देखील तेच चालूये, काल ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. 

चालू असलेली कारवाई हि राजकीय सुडबुद्धी असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय.  याच कारवाईचा निषेध आणि महाविकास आघाडीची एकजूट म्हणून आज महाविकास आघाडीकडून मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे जवळपास सगळे नेते, मंत्री, आमदार सहभागी झाले आहेत.

महाविकास आघाडीचे एकजुटीचे आंदोलन सुरु असतांना, बाकी पक्षाचे नेते होते पण शिवसेनेचा एकही बडा चेहरा या आंदोलनात नव्हता. यातले बडे चेहेरे असू शकत होते ते म्हणजे संजय राऊत, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे. हे सर्वजण उत्तर-प्रदेशमध्ये प्रचार दौऱ्यावर गेलेले आहेत.

होय, उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उत्तर प्रदेशातील डुमारियागंजमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत असतांना युपी,बिहारच्या नागरिकांना आवाहन करत एक विधान केलं आहे ते म्हणजे,

 “उत्तर भारतीयांची जबाबदारी आमची आहे”.

आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणतात ‘ये खतरे में है, वो खतरे में है’. हे सत्य नसून कुणालाही कसलाही धोका नाही, ही रामाची भूमी आहे. त्यामुळे मुंबईमध्ये उत्तर प्रदेशाचे कितीतरी नागरिक  मुंबईत मुंबईकर म्हणून राहत आहेत. त्यांच्या विकासाची आणि त्यांना आपुलकीने वागवण्याची जबाबदारी आमची आहे. 

यावेळेस त्यांनी कोरोनाकाळात भाजपने कसं युपी आणि बिहारच्या नागरिकांना, मजुरांना एकटं सोडलं याची आठवण करून दिली. ‘यावेळेस त्यांनी आठवणीने हे देखील सांगितले कि, बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत आले आहेत की, शासन हे धर्मासाठी नव्हे तर शासन हे जनतेसाठी असते.  राजकारण करायचे असेल तर ते लोकांसाठी करा, समाजासाठी करा राजकारण नाही पण समाजसेवा नक्की करा. 

हे सगळं सांगण्याचं निमित्त म्हणजे आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या “उत्तर भारतीय म्हणजे आमची जबाबदारी आहे”, या वक्तव्यानंतर, सगळीकडे आता आदित्य ठाकरेंच्या विधानाचा आणि आजोबा म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तर भारतीयांसाठी संबंधित असलेल्या विचारांचा संबंध लावला जातोय.

एकीकडे आदित्य ठाकरे म्हणतायेत कि, उत्तर भारतीय आमची जबाबदारी आहे तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे याच उत्तर भारतीयांबाबत विशेषत: उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या लोकांबद्दल आगपाखड करत असत. परराज्यांतून येणाऱ्या नागरिकांसाठी बाळासाहेब ठाकरे अतिशय कडक शब्द वापरायचे. खास करून यूपी-बिहारच्या लोकांना ते  ‘भैय्या’ या शब्दाने हाक मारायचे.

२००८ ची घटना आहे जेंव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी आणि अमराठी वादाला तोंड फोडल्याच्या दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या आगीत उडी घेतली होती. तेंव्हा ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संपादकीयमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी बिहारींसाठी ‘शेणाचा किडा’ ‘एक बिहारी सौ बिमारी’ अशा संज्ञा वापरल्या होत्या.

बिहारचे खासदार प्रभुनाथ सिंह यांचे उदाहरण देत त्यांनी बिहारच्या खासदारांवर निशाणा साधला होता की, बिहारच्या खासदारांवर न्यायालयात अनेक फौजदारी खटले प्रलंबित असून अशा लोकांकडून आम्हाला काही एक शिकण्याची गरज नाहीये. बिहार हे देशातील सर्वात मागासलेले राज्य कारण तेथील  राजकारण्यांनी स्वतःच्या राज्यासाठी काहीही केलेलं नाहीये. तसेच त्यांनी बिहारमधून येणाऱ्या मजुरांमुळे महाराष्ट्राप्रमाणेच पंजाबचे लोकं देखील नाराज असल्याचं मत व्यक्त केलं होतं..

तेंव्हा तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी बाळासाहेबांच्या या वक्तव्याला विरोध करत उत्तर दिले होते कि, बाळासाहेब ठाकरेंचे हे वक्तव्य जनविरोधी असून बिहारचे जे लोकं मुंबईत राहतात ते तिथेच राहतील. त्याचबरोबर आणखी लोकांना मुंबईत पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

मार्च २०१० ची गोष्ट आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण यांनी वक्तव्य केलेलं कि, “मुंबईत कोणीही राहू शकतो”. यानंतर अपेक्षित अशीच प्रतिक्रिया सामनामध्ये उमटली होती, दरम्यान बाळासाहेबांनी सामनात लिहिलेले कि, ‘मुंबई काय धर्मशाळा लागून गेली आहे काय ? कुणीही येतं अन इथेच स्थायिक होतं. बाहेरील लोकांना येण्यापासून रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे परमिट प्रणाली लागू करणे’ असं मत व्यक्त केलं होतं.

साहजिकच आहे बाळासाहेबांचे उत्तर भारतीयांबाबत असलेले हे मतं लक्षात घेता शिवसेनेची जरी भूमिका आपल्याला माहिती असेल तरी आत्ता आदित्य ठाकरेंचे विधान हे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी पूरक असेच आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.